Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

क्रीडा

उपान्त्य फेरीपूर्वी मोठी खेळी साकारायची आहे - सेहवाग
ब्लूमफोन्टन, १८ मे / पीटीआय

इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागवर त्याची बॅट अद्याप रूसली आहे. या स्पर्धेत अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या वीरेंद्र सेहवागला उपांत्य फेरीपूर्वी सूर गवसण्याची आशा आहे. सेहवागच्या बॅटमधून धावा होत नसल्या तरी त्याच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ मात्र इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

बंगळुरूला दिल्ली जिंकावीच लागेल
जोहान्सबर्ग, १८ मे/ पीटीआय

दिल्ल डेअरडेव्हिल्सने उपान्त्य फेरीतील स्थान पक्के केले असले तरी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला अंतिम चार संघांमध्ये जागा मिळविण्यासाठी उद्याचा सामना जिंकावाच लागेल. सहा विजयांसह बंगळुरूचे १२ गुण असून उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना उद्या दिल्लीविरूद्धच्या लढतीमध्ये विजय साकारावा लागेल, नाही तर त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागेल आणि राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
या दोन्हीही संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीने बंगळुरूला सहा विकेट्सने सहज पराभूत केले होते. या गोष्टीचाच बदला घेण्यासाठी अनिल कुंबळेचा बंगळुरू संघ आतूर असेल.

दिल्ली शायनिंग!
ब्लूमफोन्टन, १८ मे/ पीटीआय
अ‍ॅबी डी’व्हिलिअर्सने झळकाविलेल्या तडाखेबज नाबाद ७९ धावा आणि अमित मिश्रा, आविष्कार साळवी व परवेझ महारुफ यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्सचा १४ धावांनी पराभूत केला. या पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे.

हॅट्ट्रिकपेक्षा संघ विजयी झाल्याचा आनंद मोठा- युवराज
जोहान्सबर्ग, १८ मे, वृत्तसंस्था

हॅट्ट्रिक मिळण्याचा आनंद मोठा असला तरी आमचा संघ विजयी झाल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठा आहे, अशी प्रतिक्रिया किंग्ज पंजाब इलेव्हन संघाचा कर्णधार युवराज सिंग याने व्यक्त केली आहे. डेक्कन चार्जर्सविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात युवराजच्या हॅट्ट्रिकमुळे किंग्ज पंजाबने एका धावेने सनसनाटी विजय मिळविला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील युवराजची ही दुसरी हॅट्ट्रिक होती. या विजयाने किंग्ज पंजाबच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.

कोलकाताची चेन्नईवर सात विकेट्सनी मात
सेंचुरियन, १८ मे / वृत्तसंस्था

सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला आपल्या शेवटून दुसऱ्या सामन्यात मात्र लय सापडली आणि त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नईला सात विकेट्सनी पराभूत करण्याची करामत केली. कोलकाताचा मालक असलेल्या शाहरुखच्या चेहऱ्यावर या विजयामुळे हास्य विलसले असेल. चेन्नईने २० षटकांत १८८ धावांपर्यंत मजल मारल्यामुळे कोलकाताला पुन्हा एकदा पराभवाचाच चेहरा पाहावा लागणार की काय, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती, पण ब्रेन्डर मॅकक्युलमच्या ८१ धावा, ब्रॅड हॉजची ७१ धावांची तर वृद्धिमान साहाच्या जिगरबाज २५ धावा यामुळे कोलकाता संघाने केवळ तीन फलंदाज गमावून निर्धारित लक्ष्य गाठले.

अमित सिंगला तात्पुरता दिलासा
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अमित सिंग याच्या गोलंदाजीची शैली वादग्रस्त नसल्याचा निर्वाळा आयपीएलच्या तांत्रिक समितीने देत त्याला तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळेच काल दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या लढतीसाठी त्याचा राजस्थान रॉयल्स संघात समावेश करण्यात आला. मात्र पुन्हा त्याची गोलंदाजी संशयास्पद वाटली तर मात्र वर्षभर त्याला खेळता येणार नाही. गेल्या आठवडय़ात किम्बर्ली येथील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत पंच डॅरिल हार्पर आणि के. हरिहरन यांनी त्याची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यामुळे अमितच्या गोलंदाजीची ‘बायोमेकॅनिकल टेस्ट’ करण्यात आली. त्या वेळी मात्र त्याचा खास चेंडू, धिमा, ऑफ ब्रेक, ऑफ कटर आणि लेग कटर हे चारही चेंडू आयसीसीच्या वैध चेंडूच्या व्याख्येत बसणारेच असल्याचा निर्वाळा आयपीएलच्या तांत्रिक समितीने दिला आहे. या अहवालाच्या बळावरच अमित सिंगला संघात ठेवण्याची परवानगी राजस्थान रॉयल्सचा मिळाली आहे.

आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात विजेंदरसह ११ खेळाडू
नवी दिल्ली, १८ मे / पीटीआय

चीनमधील झुहै येथे ५ ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताच्या ११ सदस्यीय संघात बीजिंग ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग, विश्व युवा अजिंक्यवीर टी. ननावसिंग व ऑलिम्पिकपटू जितेंदरसिंग यांची निवड झाली आहे.
विजेंदरसिंगने चेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या युरोपियन ग्रां प्रि स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिकनंतर त्याने एका मोठय़ा स्पर्धेत पदक पटकाविण्याची ही पहिलीच वेळ होती.

इंग्लंडचा विंडिजला व्हाईट वॉश
जेम्स अ‍ॅन्डरनचे सामन्यात नऊ बळी

चेस्टरले स्ट्रीट, १७ मे/ पीटीआय

येथील कसोटी ८३ धावांनी सहज जिंकून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इग्लंडने वेस्ट इंडिजला २-० असा व्हाईट वॉश दिला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसनने सामन्यात नऊ विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडीत संघाला सहज विजय मिळवून दिला. या नेत्रदिपक कामगिरीमुळेच त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

रिझव्‍‌र्ह बँक आंतर विभाग क्रिकेट : पी. अ‍ॅण्ड एस. ओ. अजिंक्य
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आंतर विभाग क्रिकेट स्पर्धेत पी. अ‍ॅण्ड एस. ओ. (प्रोटोकॉल अ‍ॅण्ड सिक्युरिटी ऑफीस संघ अजिंक्य ठरला. अंतिम फेरीत त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स संघावर १० धावांनी सनसनाटी विजय मिळविला. केवळ सहा धावांत तीन बळी मिळविणारा विनोद कदम हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून त्याचीच निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राजेश मानेला तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून राजेश पालांडे यांना गौरविण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर श्रीमती उषा थोरात आणि दीपक सिंघल (चीफ जनरल मॅनेजर, एच. आर. डी. डी.) व शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. आर. बी. आय. कर्मचारी संघटनेचे अ. भा. सचिव अजित सुभेदार हेदेखील या वेळी उपस्थित होते. रिझव्‍‌र्ह बँकेतील १८ विभाग संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

मुष्टियुद्धातील नव्या नियमामुळे तंदुरुस्तीची परीक्षाच- विजेंदर
दोन मिनिटांच्या चार फेऱ्यांऐवजी आता तीन मिनिटांच्या तीन फेऱ्या

नवी दिल्ली, १८ मे / पीटीआय

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुष्टियुद्धाच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे यापुढे मुष्टियोद्धय़ांच्या तंदुरूस्तीची परीक्षा लागणार असून दमदार खेळाडूच बॉक्सिंग रिंगमध्ये तग धरू शकतील, असे मत भारताचा स्टार मुष्टियोद्धा व बीजिंग ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग याने व्यक्त केले आहे.

हॉकीपटू फेलिक्स अल्फॉन्सो यांचे निधन
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

मुंबईचे साठच्या दशकामध्ये राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले फेलिक्स अल्फॉन्सो यांचे शनिवारी मध्यरात्री गोवा मुक्कामी दु:खद निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. डाव्या बगलेवर विंगर म्हणून खेळलेल्या अल्फॉन्सो यांनी साठच्या दशकामध्ये त्या काळी नावाजलेल्या ल्युसिटनियन्स या क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. १९६६ साली ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दाखल झाले. साधारणपणे दीड दशक त्यांनी बँकेसाठी मैदान गाजविले. अल्फॉन्सो हे चांगले फुटबॉलपटूही होते. याशिवाय ते दोन्ही खेळांचे प्रथम दर्जाचे पंच म्हणून त्यांच्या नंतरच्या पिढीला ज्ञात होते. त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या हॉकी संघाला मार्गदर्शन केले. त्यांचे पार्थिव गोव्याहून मुंबईला आणण्यात आले व दादरच्या पोर्तुगीज चर्चमध्ये त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्टेट बँकेतील कैक माजी क्रीडापटू व त्यांचे समकालीन या वेळी निरोप देण्यास उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारी समितीची चौवार्षिक निवडणूक २१ जूनला
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनची सन २००९ ते २०१३ या कालावधीकरिता कार्यकारी समितीची चौवार्षिक निवडणूक संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह २१ जून रोजी संघटनेच्या वांद्रे कार्यालयात सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज वांद्रे कार्यालयातून २० मेपासून सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत नियमित सुरू राहील. निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र देसाई आणि शशिकांत राऊत हे काम पाहतील. तरी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्था प्रतिनिधींनी सायंकाळी वांद्रे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुहास कदम यांनी केले आहे.

भुतिया एएफसी चषक स्पध्रेतील लढतीला मुकणार?
कोलकाता, १७ मे / पीटीआय

बायच्युंग भुतिया आणि मोहन बगान यांच्यातील वादावर अद्याप कोणताही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे मंगळवारी एएफसी चषक फुटबॉल स्पध्रेतील सिरियाच्या अल करमाहविरुद्धच्या लढतीला भारतीय कर्णधार भुतिया मुकण्याची चिन्हे दिसत आहे. १४ मे रोजी भुतियाविरुद्ध मोहन बगानने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अनेक प्रशिक्षण सत्रे आणि जलपायगुरी येथील प्रदर्शनीय लढत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय टाळणाऱ्या भुतियाला याबाबतचे स्पष्टीकरण करण्यासाठी मोहन बगानने ४८ तासांची डेडलाइन दिली होती.

लोणावळ्यात मास्टर्स कप क्रिकेट
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

आगरी कोळी समाज मंडळातर्फे प्रतिवर्षांप्रमाणे ४० वर्षांवरील मास्टर्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोणावळा येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २२ मे रोजी नवनिर्वाचित खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते होईल. या स्पर्धेत शिंपोली, मालवणी, एकसर, कांदरपाडा, दहिसर, मिरा, पांजु, घोडबंदर, भाईंदर आदि विभागातील संघांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे असल्यास अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांच्याशी ९८२०२८६८९० किंवा सचिव नरेंद्र किणी यांच्याशी ९८७०४५५६५१ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारी समितीची निवडणूक २१ जूनला
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनची सन २००९ ते २०१३ या कालावधीकरिता कार्यकारी समितीची चौवार्षिक निवडणूक संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह २१ जून रोजी संघटनेच्या वांद्रे कार्यालयात सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज वांद्रे कार्यालयातून २० मेपासून सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत नियमित सुरू राहील. निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र देसाई आणि शशिकांत राऊत हे काम पाहतील. तरी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्था प्रतिनिधींनी सायंकाळी वांद्रे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुहास कदम यांनी केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँक आंतर विभाग क्रिकेट : पी. अ‍ॅण्ड एस. ओ. अजिंक्य
मुंबई, १८ मे / क्री. प्र.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आंतर विभाग क्रिकेट स्पर्धेत पी. अ‍ॅण्ड एस. ओ. (प्रोटोकॉल अ‍ॅण्ड सिक्युरिटी ऑफीस संघ अजिंक्य ठरला. अंतिम फेरीत त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स संघावर १० धावांनी सनसनाटी विजय मिळविला. केवळ सहा धावांत तीन बळी मिळविणारा विनोद कदम हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून त्याचीच निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राजेश मानेला तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून राजेश पालांडे यांना गौरविण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर श्रीमती उषा थोरात आणि दीपक सिंघल (चीफ जनरल मॅनेजर, एच. आर. डी. डी.) व शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. आर. बी. आय. कर्मचारी संघटनेचे अ. भा. सचिव अजित सुभेदार हेदेखील या वेळी उपस्थित होते. रिझव्‍‌र्ह बँकेतील १८ विभाग संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.