Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

परांजपे ‘मातोश्री’वर जाणार कधी?
ठाणे/ प्रतिनिधी

 

ठाण्यासारखा २५ वर्षे जपलेला बालेकिल्ला ढासळल्याने शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ठाण्याची जागा गमावली तरी मनसेच्या झंझावातातही कल्याणची सुभेदारी आनंद परांजपे यांनी राखली आहे. अर्थात या घडीला परांजपे यांच्या विजयापेक्षा ठाण्यातील पराभवाचा प्रभाव जिल्ह्यातील संघटनेवर अधिक आहे. परिणामी, ठाणे गमावल्यावर कोणत्या तोंडाने मातोश्रीवर जायचे, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना सतावत असल्याने परांजपे यांचीही मातोश्री भेट लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या राज्यभरातील विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर हजेरी लावून शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेतले. त्याचे छायाचित्र ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाले आहे, पण त्यात आनंद परांजपे मात्र नाहीत!
दरवेळेला कोणतीही निवडणूकजिंकली की, लगेच विजयी उमेदवारांना घेऊन मातोश्रीवर जाण्याची प्रथा शिवसेनेत आहे. शक्य झाल्यास निकाल जाहीर झाल्यावर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तरी ‘मातोश्री’ला सेना नेते विजयी उमेदवाराबरोबर जातात.
१६ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ठाण्यातून सेनेचा उमेदवार पडला तरी कल्याणची जागाजिंकल्याने आनंद परांजपे यांना घेऊन ‘मातोश्री’वर जाणे क्रमप्राप्त होते. मात्र ठाण्याच्या पराभवाचा धक्का पचवू न शकलेल्या सेनेच्या नेत्यांनी आनंद परांजपे यांच्यासोबत जाण्याचे टाळले. शनिवारी निकाल जाहीर झाले आणि रविवार गेला तरी आनंद परांजपे यांना घेऊन ‘मातोश्री’वर आशीर्वाद घेण्यासाठी जाण्याची हिंमत जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाली नाही, याची कुजबूज सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.
ठाण्याच्या जागेचे तिकीट एकनाथ शिंदे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विजय चौगुले यांच्यासाठी खास मागून घेतले. तुम्ही सांगता तो उमेदवार देतो, आता जिंकून आणण्याची जबाबदारी तुमची, असा इशारा त्यावेळी देण्यात आला होता. अंबरनाथला पोटनिवडणुकीत ज्यावेळी सेनेचा उमेदवार पडला, त्यावेळी जिल्हाप्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथचे नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले व शिवसेना अंबरनाथ अध्यक्ष अरविंद वाळेकर या दोघांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता. आता हाच न्याय ठाण्याची लोकसभेची जागा गमावल्याने ‘मातोश्री’ लावणार का, असा सवाल नाराज शिवसैनिक करीत आहेत. विजय चौगुले यांना तिकीट दिल्याने आधीच नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांना ठाण्याची जागा सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या हट्टी स्वभावामुळे गमावल्याचे दुख आहे. शिवसेनेचे ठाणे ही बिरुदावली परत मिळवायची असेल तर ‘मातोश्री’ला या पराभवाचा गांभीर्याने विचार करावा लागेल, नाहीतर आमच्यासारखे सच्चे शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या एका जेष्ठ नगरसेवकाने दिला.
वास्तविक मनसेने लावलेल्या सुरुंगात शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांची धूळधाण होत असताना आनंद परांजपे यांनी वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराबरोबर लढत देऊन कल्याणचा गड शाबूत ठेवला. त्यामुळे ‘मातोश्री’वरदेखील आनंद परांजपे यांच्या विजयाचे कौतुक आहे, मात्र ठाण्याची हक्काची जागा गमावल्याने ‘मातोश्री’ नाराज झाली असेल, या भीतीपोटीच ठाण्यातील सेनेचे स्थानिक नेते ‘मातोश्री’ला जाण्याचे टाळत असल्याची जोरदार चर्चा ठाण्यात आहे. खासदार आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्री’वर सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मातोश्री’वरून वेळ न मिळाल्याने आमच्या भेटीस उशीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारच्या निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोमवारी संध्याकाळपर्यंत सेनेचे परांजपे ‘मातोश्री’वर गेले नव्हते.