Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दोन डझन विधानसभांमध्ये आघाडीमुळे युतीच्या नाकी ‘नऊ’!
दिलीप शिंदे

 

ठाणे जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल नऊ मतदारसंघांत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मताधिक्य मिळाले असून, शिवसेना-भाजप युतीला केवळ नऊ मतदारसंघांत आपले वर्चस्व टिकवून ठेवता आले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकप आणि कुणबी सेनेला प्रत्येकी एका मतदारसंघात आघाडी मिळाली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंगाने युती आणि आघाडी यांचे चिंतन सुरू झाले आहे.
चार लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी सहा, काँग्रेस तीन, शिवसेना सहा, भाजप तीन, मनसे एक, माकप एक, कुणबी सेना एक आणि बहुजन विकास आघाडीने तीन विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळविले आहे. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीची आखणी पक्षापक्षांमध्ये होऊ लागली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि शिवसेनेला दोन विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. त्यात राष्ट्रवादीला बेलापूर (१९,३९५), ऐरोली (१४,१३७), मीरा-भाईंदर (२२,८९१), ओवळा-माजिवडा (८१५८) आणि शिवसेनेला नौपाडा (३,३०४), कोपरी-पाचपाखाडी (८,७५९) अशी आघाडी मिळाली. नौपाडा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मनसेला ४१ हजार २४३ आणि राष्ट्रवादीला ४० हजार ७५४ मते मिळाली. या मतदारसंघात सेना उपनेते अनंत तरे, राजन विचारे आणि भाजपचे संजय केळकर, शहर अध्यक्ष संजय वाघुलेंसारखे दिग्गज नेते असताना चौगुले यांना अल्प आघाडी मिळाली. मागील निवडणुकीत ४९ हजार मतांची आघाडी होती. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची व्यूहरचना, काँग्रेसचे सहकार्य आणि मनसेची मुसंडी यामुळे ठाण्यात सेनेची आघाडी नगण्य झाली. ओवळा-माजिवडामध्ये राष्ट्रवादीला आघाडी मिळविता आली.
शिवसेनेशी जवळीक असलेल्या कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरशीची ठरलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी बाजी मारली. या मतदारसंघातील सहापैकी तीन काँग्रेस आणि भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विश्वनाथ पाटील यांना प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला शहापूर (२,३३३), भिवंडी पश्चिम (२९,७५०), भिवंडी पूर्व (१७,७९६), भाजपला मुरबाड (१,१८१) आणि विश्वनाथ पाटील यांना भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात (२,६४१) मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण पश्चिममधून ३४० मतांची आघाडी मिळाल्याने भाजपला धक्का बसला. शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण पश्चिममधून भाजपचे जगन्नाथ पाटील यांना किरकोळ आघाडी मिळविता आली. सहाही मतदारसंघांत भाजपची पीछेहाट झाली. कल्याणमध्ये मनसेने बाजी मारल्याने युतीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात आगरी सेनेचे राजाराम साळवी यांनी भिवंडीत भाजपऐवजी विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा दिला. मनसेच्या डी.के. म्हात्रे यांना मिळालेल्या मतांमुळे शिवसेना आमदार योगेश पाटील यांची कुचंबणा झाली आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने लाखभर मते घेऊनही शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी बाजी मारली. सहा विधानसभा मतदारसंघांतील मतांची आकडेवारी पाहिल्यास तीन-तीन मतदारसंघांतून दोघांनाही आघाडी मिळाली आहे. मात्र पोटनिवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही आनंद परांजपे यांच्या मदतीला डोंबिवली आणि कल्याणकर मतदार धावून गेले आहेत. परांजपे यांना कल्याण पूर्व (३,२३५), डोंबिवली (१९,३३६) आणि कल्याण ग्रामीणमध्ये (१८,०५६) मतांची आघाडी मिळाली, तर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना अंबरनाथ (१,२४२) उल्हासनगर (२,५९१) आणि मुंब्रा-कळवा (१५,७९८) मतांची आघाडी मिळाली. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे, उल्हासनगरचे आमदार पप्पू कलानी आणि लोकभारतीचे साई बलराम असे दिग्गज नेते असताना या मतदारसंघातून नावापुरत्या मिळालेल्या आघाडीने डावखरे यांचा घात केला. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांची ताकद सेनेला कल्याण ग्रामीणमधून १८ हजार ५६ची आघाडी मिळवून देण्यास साह्णाभूत ठरली. मात्र कल्याण पूर्वेत तसे घडले नाही. सेनेने प्रमुख कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला, तर डावखरे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दुय्यम लेखून कोणतेही संघटनात्मक पद नसलेल्या गणपत गायकवाड यांच्याकडे प्रचाराची सूत्रे सोपविली. कल्याणमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेता आली नाही. मात्र डोंबिवलीत त्यांनी राष्ट्रवादीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली.
बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यामुळे झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसचे विद्यमान खासदार दामू शिंगडा यांना सहा विधानसभा मतदारसंघांतील एकाही मतदारसंघात आघाडी मिळविता आली नाही. आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव असलेल्या नालासोपारा, बोईसर आणि वसई विधानसभा मतदारसंघांतून भरघोस आघाडी मिळाल्याने जाधव यांचा विजय सुकर झाला. नालासोपारा (३०,८४९), वसई (२२,६८१) आणि बोईसर (५,७९१) मतांची आघाडी मिळाली, तर भाजपचे चिंतामण वणगा यांना विक्रमगड (२५,५६४), पालघर (८,३५७) आणि माकपला डहाणूमध्ये (४३,६६७) आघाडी मिळाली.