Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अंबरनाथ-बदलापुरात पाणीटंचाईची भीती
बदलापूर/वार्ताहर

 

अंबरनाथ, तसेच बदलापूर नगर परिषद हद्दीसाठी उल्हास नदीतून ज्यादा पाणी उचलण्याची परवानगी द्यावी, अन्यथा या दोन्ही ठिकाणी पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होईल, अशी भीती नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केली आहे. उल्हास नदीमधून या दोन्ही गावांसाठी ज्यादा पाणी मिळावे, अशी करण्यात आलेली मागणी जलसंपदा विभागाने २३ एप्रिलच्या पत्राने नाकारली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात जलसंपदामंत्री अजितदादा पवार यांना लेखी निवेदन पाठविले आहे. या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर १४ टक्के आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे. नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात येऊनही एमआयडीसीची पाण्याची मागणी अद्यापि पूर्ण झाली नाही. त्यामुळे पत्रातील पाण्याची उपलब्धता आणि प्रत्यक्ष उचलणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यात जलसंपदा विभागाने परवानगी नाकारली. पाणीटंचाईच्या समस्येमुळे या भागात नागरिकांमध्ये असंतोष पसरण्याची भीती यांनी व्यक्त केली आहे.
पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोशीर धरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे.
विशेष म्हणजे पाणीपुरवठय़ाच्या बाबतीत २४ ७ चा पहिला प्रयोग बदलापूरमध्ये झाला होता. तो यशस्वी झाल्याने त्याच पध्दतीने अन्य शहरांमध्येही हा प्रयोग राबविण्याचा गंभीरपणे विचार सुरू झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार झालेल्या या प्रकल्पाकडे रोल मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. या पाश्र्वभूमीवर बदलापूर तसेच अंबरनाथ या नगरपालिकांवर आलेले पाणीटंचाईचे संकट हा विशेष चिंतेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून सर्वाधिक निधी मिळविण्याच्या बाबतीत बदलापूरन नगरपालिकेने नेहमीच आघाडी घेतली आहे.