Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

भिवंडी नागरी बँकेच्या तीन माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल
११ कोटींचे अपहार प्रकरण

 

भिवंडी/वार्ताहर: भिवंडी नागरी सहकारी बँकेच्या संचालकांनी एका खासगी कंपनीचे दोन वेळा ४३४१ बॉण्ड खरेदी करून १० कोटी ८० लाख २५ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती, मात्र सहा महिन्यांतच पुन्हा निवडणुका झाल्या. या घोटाळ्यातील जुन्या बोर्डाचे चार संचालक पुन्हा निवडून आल्याने हा घोटाळा दडविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बँकेचे भागधारक कादीर मोहम्मद मोमीन याने न्यायालयात धाव घेत भ्रष्टाचारी संचालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. न्यायालयाने संबंधित संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने नव्या संचालक मंडळामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, बँकेच्या ठेवीदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या बँकेचा भिवंडी शहरामध्ये नावलौकिक असून, २००४ मधील तत्कालीन बँकेचे चेअरमन अतीक मोहम्मद तय्यब मोमीन, तत्कालीन संचालक कमलाकर टावरे व नसीम अब्दुल मोमीन यांनी स्वत:चे हित लक्षात घेता जुलै २००४ मध्ये बडोदा हॅलो रोड पॉल टॅक्स या कंपनीचे (बडोदा) एकूण २५४१ बॉण्ड चढय़ा भावाने खरेदी केले, तर ऑक्टोबर २००४ मध्ये या आरोपींनी पुन्हा १८०० बॉण्ड हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक बँकेचे आर्थिक नुकसान व्हावे, या हेतूने खरेदी केले. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती खालावली, ही बाब काही ठेवीदारांच्या लक्षात येताच बँकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.
२००४-२००५ या कारणास्तव बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. बँकेचे लेखापरीक्षण केले असता १० कोटी ८० लाख २५ हजार रुपयांचे बॉण्ड खरेदी केल्याने बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला गेल्याचे लेखापरीक्षणाच्या अहवालात म्हटले होते.
प्रशासनाचा कालावधी संपल्यानंतर बँकेची निवडणूक घेण्यात आली, मात्र जुन्या संचालक मंडळापैकी चार संचालक पुन्हा निवडून आल्याने हा बॉण्ड खरेदी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला, मात्र तक्रारदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे यांच्याकडे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी केली. विशेष परीक्षण सहकारी संस्था यांनी चौकशी केली असता त्यांनीही आपल्या अहवालात बँकेची स्थिती डबघाईला गेल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार कादीर मोहम्मद मोमीन यांनी न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाने कुंभारवाडा पोलीस स्टेशनला संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले.