Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

सावरकर हे भारतीयांचे प्रभू रामचंद्र - डॉ. अशोक मोडक

 

डोंबिवली/प्रतिनिधी - बालपणातच मायभूमीसाठी वृद्धत्व स्वीकारून जीवनाचे उन्हाळे करणारे स्वा. सावरकर हे भारतीयांचे प्रभू रामचंद्र आहेत, असे प्रतिपादन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांनी रविवारी येथे केले. ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांना ‘सावरकर सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पेंढरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, ज. ल. पटवर्धन, संस्थेचे कार्यवाह प्रा. रवींद्र गणपुले उपस्थित होते. ज्ञानेश्वर माऊलींची तसबीर, शाल, बटवा, पुष्पगुच्छ देऊन पाठक यांना सन्मानित करण्यात आले.
विविध प्रकारचे भय समाजात पसरले आहे. ही भयप्रद परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता सावरकर विचारच प्रभावी ठरणार आहे. या विचाराकडे पाठ फिरविल्याने भारतीयांना दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागत आहेत. मग तो दहशतवादी हल्ला असो, नेपाळ, श्रीलंकेमधील प्रश्न असोत, या सगळ्या प्रश्नांमध्ये सावरकर विचार दडला आहे. पण तो विचार कधी चाचपून पाहण्याची बुद्धी आम्हाला सुचलीच नाही. सावरकरांवर टीका करणारे जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन युरोपीयन प्रतिनिधींना लंडनमधील एका परिषदेत म्हणाले, ‘तुमच्या नजरेतून भारताला पाहू नका, भारत तुम्हाला कधी कळणारच नाही.’ हाच विचार म्हणजे हिंदुत्ववादी विचार आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर सावरकर विचाराचा उल्लेख करतात. या उल्लेखांमुळे सावरकर किती विचारवादी, प्रगल्भ होते याची चुणूक आहे. सूर्यकांत पाठक यांनी विविध माध्यमांतून सावरकर विचार प्रचाराचे काम सुरू केले आहे, म्हणून ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, असे डॉ. मोडक म्हणाले.
पाठक म्हणाले, सावरकरांचा हिंदुत्व आणि विज्ञानाची कास असलेला विचार जेव्हा समाज स्वीकारेल, तेव्हाच भारत देश परमवैभवाला पोहोचेल. अंधश्रद्धा, अज्ञान, अस्पृश्यता निवारणात सावरकरांनी खूप कार्य केले, पण ते समाजासमोर कधी आलेच नाही. सावरकर आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. कोणत्याही अनुदानाकडे लक्ष न देता अनेकांच्या सहकार्याने गेली २१ वर्षे सावरकर साहित्य प्रकाशित होत आहे, तसेच सावरकर साहित्य संमेलन पार पडत आहे.
पुढील वर्षी हे संमेलन अंदमान येथे भरविण्यात येणार आहे. सावरकरांचे सात हजार पानांचे साहित्य विचार चिंतनीय आहेत. यावेळी ज.ल. पटवर्धन, आबासाहेब पटवारी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता तळेकर, आभार अर्चना जोशी यांनी मानले. पूर्वा दांडेकर हिने पसायदान म्हटले.