Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दर्दी रसिक डोंबिवलीकरांचे संदीप खरे यांच्याकडून कौतुक

 

डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील रसिक प्रेक्षक हा दर्दी आहे. त्याला टाळी कुठे वाजवायची आणि दाद कोठे द्यायची हे अचूक माहिती असते, त्यामुळे आपला कार्यक्रम किती यशस्वी झालाय हे निर्मात्याला कळण्यास मोठा वाव मिळतो. यासाठी ‘कधीतरी वेडय़ागत’ हा कार्यक्रम आपण रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी डोंबिवलीत प्रथम सादर करतोय, असे कवी संदीप खरे यांनी सांगितले.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे कवी संदीप खरे यांच्या कवितांचा नाटय़ाविष्कार ‘कधीतरी वेडय़ागत’ या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले रंगमंदिरात केले होते. या कार्यक्रमात मधुरा वेलणकर, विभावरी देशपांडे आणि कवी खरे सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष संदीप वैद्य यांनी पुष्पगुच्छ देऊन या कलाकारांचे स्वागत केले.
खरे म्हणाले, कवितांमध्ये नृत्य, नाटय़, संगीत, चित्रसंगीत असे अनेक विषय भरलेले असतात. हे सर्व प्रकार शोधण्यासाठी आपले मन तयार पाहिजे. ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही कधीतरी वेडय़ागत या नाटय़ाविष्कारांमधून केला आहे. कविता हा शक्यतांचा प्रवास असतो, परंतु कविता या विषयाला आपल्याकडे खूप चौकटीत बांधून ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचा अंतरगाभा शोधण्यासाठी धांडोळा घ्यावा लागतो. कविता तृप्त मनाने ऐकली की त्यामधील भाव हळूहळू उलगडत जातात. तो प्रयत्न आम्ही केला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर भागात याचे दहा कार्यक्रम झाल्याचे खरे म्हणाले.
वेलणकर म्हणाल्या, चांगल्या नाटकात काम करण्याची मला हुरहूर असते, ती संधी मला या प्रयोगामुळे मिळाली आहे. खूप वेगळे अनुभव या प्रयोगातून मला मिळत आहेत. खरे यांच्या कविता शब्दांनी लगडलेल्या आहेत, त्या शब्दांची चव चाखताना वेगळी अनुभूती येते, खूप शिकायला मिळते.
यावेळी काय रे देवा, लव लेट, नको करू सखी शृंगार आदी आविष्कार सादर करण्यात आले.