Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

परांजपे ‘मातोश्री’वर जाणार कधी?
ठाणे/ प्रतिनिधी

ठाण्यासारखा २५ वर्षे जपलेला बालेकिल्ला ढासळल्याने शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ठाण्याची जागा गमावली तरी मनसेच्या झंझावातातही कल्याणची सुभेदारी आनंद परांजपे यांनी राखली आहे. अर्थात या घडीला परांजपे यांच्या विजयापेक्षा ठाण्यातील पराभवाचा प्रभाव जिल्ह्यातील संघटनेवर अधिक आहे. परिणामी, ठाणे गमावल्यावर कोणत्या तोंडाने मातोश्रीवर जायचे, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना सतावत असल्याने परांजपे यांचीही मातोश्री भेट लांबणीवर पडली आहे.

दोन डझन विधानसभांमध्ये आघाडीमुळे युतीच्या नाकी ‘नऊ’!
दिलीप शिंदे
ठाणे जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल नऊ मतदारसंघांत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मताधिक्य मिळाले असून, शिवसेना-भाजप युतीला केवळ नऊ मतदारसंघांत आपले वर्चस्व टिकवून ठेवता आले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकप आणि कुणबी सेनेला प्रत्येकी एका मतदारसंघात आघाडी मिळाली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंगाने युती आणि आघाडी यांचे चिंतन सुरू झाले आहे.

अंबरनाथ-बदलापुरात पाणीटंचाईची भीती
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ, तसेच बदलापूर नगर परिषद हद्दीसाठी उल्हास नदीतून ज्यादा पाणी उचलण्याची परवानगी द्यावी, अन्यथा या दोन्ही ठिकाणी पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होईल, अशी भीती नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केली आहे. उल्हास नदीमधून या दोन्ही गावांसाठी ज्यादा पाणी मिळावे, अशी करण्यात आलेली मागणी जलसंपदा विभागाने २३ एप्रिलच्या पत्राने नाकारली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

करभाराचा अजब कारभार !
संजय बापट

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील गांधीनगर भागात जलवाहिन्यांवर बांधल्या जात असलेल्या झोपडय़ांबाबत प्रारंभी मुंबई महापालिकेकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता या झोपडय़ा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी तसे आदेशही दिले आहेत. मात्र एकीकडे ही कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे बीएमसीच्या जागेवरील झोपडय़ांना करआकारणी करून त्यांना मान्यताच देण्याची दुटप्पी भूमिका पालिकेने घेतल्याचे आढळून आले आहे.

भिवंडी नागरी बँकेच्या तीन माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल
११ कोटींचे अपहार प्रकरण

भिवंडी/वार्ताहर: भिवंडी नागरी सहकारी बँकेच्या संचालकांनी एका खासगी कंपनीचे दोन वेळा ४३४१ बॉण्ड खरेदी करून १० कोटी ८० लाख २५ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती, मात्र सहा महिन्यांतच पुन्हा निवडणुका झाल्या. या घोटाळ्यातील जुन्या बोर्डाचे चार संचालक पुन्हा निवडून आल्याने हा घोटाळा दडविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बँकेचे भागधारक कादीर मोहम्मद मोमीन याने न्यायालयात धाव घेत भ्रष्टाचारी संचालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

सावरकर हे भारतीयांचे प्रभू रामचंद्र - डॉ. अशोक मोडक
डोंबिवली/प्रतिनिधी - बालपणातच मायभूमीसाठी वृद्धत्व स्वीकारून जीवनाचे उन्हाळे करणारे स्वा. सावरकर हे भारतीयांचे प्रभू रामचंद्र आहेत, असे प्रतिपादन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांनी रविवारी येथे केले. ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांना ‘सावरकर सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पेंढरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, ज. ल. पटवर्धन, संस्थेचे कार्यवाह प्रा. रवींद्र गणपुले उपस्थित होते. ज्ञानेश्वर माऊलींची तसबीर, शाल, बटवा, पुष्पगुच्छ देऊन पाठक यांना सन्मानित करण्यात आले.

दर्दी रसिक डोंबिवलीकरांचे संदीप खरे यांच्याकडून कौतुक
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील रसिक प्रेक्षक हा दर्दी आहे. त्याला टाळी कुठे वाजवायची आणि दाद कोठे द्यायची हे अचूक माहिती असते, त्यामुळे आपला कार्यक्रम किती यशस्वी झालाय हे निर्मात्याला कळण्यास मोठा वाव मिळतो. यासाठी ‘कधीतरी वेडय़ागत’ हा कार्यक्रम आपण रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी डोंबिवलीत प्रथम सादर करतोय, असे कवी संदीप खरे यांनी सांगितले.

राजेश मोरे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेश मोरे यांनी सोमवारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा पालिका आयुक्त गोंविद राठोड यांच्याकडे दिला. मंजुरीची प्रक्रिया उद्या सुरू होईल, असे सांगितले. आपल्या आईची प्रकृती ठीक नाही, तिची सेवा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी राजीनामा देत आहे, असे मोरे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. दरम्यान, मोरे यांच्या राजीनाम्यामध्ये राजकीय कारण असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. लोकसभा निवडणूक हे राजीनाम्याचे कारण असल्याची पालिकेत चर्चा आहे. बीपीएमसी अ‍ॅक्ट कलम ७ अंतर्गत आयुक्तांकडे नगरसेवकाने दिलेला राजीनामा तात्काळ मंजूर होतो.

‘एपीए’ परिषदेसाठी डॉ. दीक्षित सॅनफ्रान्सिस्कोत
ठाणे/प्रतिनिधी

सॅनफ्रान्सिस्को येथे सुरू असलेल्या ‘अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन’च्या (एपीए) वार्षिक परिषदेत भिवंडी येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अजय दीक्षित सहभागी झाले आहेत. २१ मेपर्यंत सुरू असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉ. दीक्षित यांना या प्रतिष्ठित संस्थेने खास आमंत्रित केले आहे. डॉ. दीक्षित यांनी शीव येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात अध्यापन केले असून, संयुक्त उपचारपद्धती व मानसोपचार आणि गुन्हेगारांचे मानसशास्त्र याविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे. ‘एपीए’च्या परिषदेतील सहभागी तज्ज्ञांसमवेत ते व्यसनाधीनता, न्युरोसायकॅट्रिक, मानसिक आजार, सायकोथेरपी आदींबद्दल माहितीचे आदान-प्रदान करणार आहेत.