Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

व्यक्तिवेध

धर्माध आणि मूलतत्त्ववादी राजवट प्रदीर्घ काळ देशाचा गळा आवळत राहिली तर सर्वागीण विकासाच्या प्रक्रियेत देश कसा मागे पडतो त्याचे जवळचे उदाहरण म्हणजे पाकिस्तान. ‘झिया उल हक यांच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीने देशातल्या राजकीय प्रक्रियेला, कामगार वर्गाला, विद्यार्थ्यांना, बुद्धिजीवींना, कलावंतांना, लेखकांना, प्रसार माध्यमांना आणि मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना असे काही नामोहरम करून टाकले की आज इतक्या वर्षांनंतरही हा समाज त्यात घुसलेल्या तालीबानी प्रवृत्तींचा मुकाबला समर्थपणे करू शकत नाही’, असे परखड मत सलीमा हाशमी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. सलीमा हाशमी हे पाकिस्तानच्या कला क्षेत्रातले, कलाशिक्षणाच्या क्षेत्रातले आजचे शीर्षस्थ व्यक्तिमत्त्व. पाकिस्तानी मॉडर्न आर्टच्या

 

क्षेत्रातील पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी, तसेच तरुण चित्रकारांच्या मार्गदर्शक, आधार. परंतु त्यांची सर्वात पहिली ओळख म्हणजे आधुनिक उर्दू काव्याचे अध्वर्यू , बंडखोर शायर फैज़्‍ा अहमद फैज़्‍ा यांची ही कन्या. ‘पंछी, नदिया, पवन के झोंके’ यांच्याप्रमाणेच फैज़्‍ाच्या शायरीलाही ‘लाइन ऑफ कंट्रोल’ माहीत नाही. ऑगस्ट १९४७ साली ‘इंतज़ार था जिसका, ये वो सहर तो नहीं’म्हणणाऱ्या फैज़्‍ाना त्यांच्या राजकीय विचारसरणीपायी तुरुंगात जावे लागले तेव्हा सलीमा आठ वर्षांच्या होत्या. तुरुंगात वडिलांना भेटायला त्या आपल्या पत्रकार आईबरोबर जायच्या. पुढे झिया उल हक यांच्या राजवटीत तर फैज़्‍ा यांना अज्ञातवासात जावे लागले. सलीमा वाढल्या त्या अशा राजकीय-सामाजिक-सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत सक्रिय आणि संवेदनशील कुटुंबात. त्यांच्या अमूर्त चित्रकलेत पाकिस्तानातल्या या सर्व घुसमटीला, पाकिस्तानी स्त्रीच्या संघर्षांला अभिव्यक्ती मिळत आली आहे. दूरचित्रवाणीवर त्यांनी अनेक नाटके सादर केली. लाहोरचे नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स, ब्रिटनची बाथ अ‍ॅकेडमी ऑफ आर्ट आणि अमेरिकेतील ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझाइन इथे त्यांचे कलाशिक्षण झाले. लाहोरमधल्या नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी ३० वर्षे चित्रकला विषयाचे अध्यापन केले, चार वर्षे त्या तिथे प्रिन्सिपॉल होत्या. सध्या त्या लाहोरमध्ये स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, बेकनहाऊस नॅशनल युनिव्हर्सिटी येथे डीन आहेत. देशोदेशी चित्रांची प्रदर्शने, कलाविषयक व्याख्याने या निमित्ताने त्यांनी जगभर प्रवास केला. स्वातंत्र्योत्तर काळातल्या ५० पाकिस्तानी चित्रकार महिलांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारे ‘अनव्हेलिंग द व्हिझिबल: लाइव्ह्ज अँड वर्क्‍स ऑफ वीमेन आर्टिस्ट्स ऑफ पाकिस्तान’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संशोधन केले, महिला चित्रकारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच भारतीय चित्रकलेच्या इतिहासकार यशोधरा डालमिया यांच्याबरोबर संयुक्तपणे त्यांनी ‘मेमरी, मेटॅफर, म्युटेशन्स : कंटेम्पररी आर्ट ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’ हे पुस्तकही सिद्ध केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ते प्रसिद्ध केले आहे. फैज़्‍ा यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद सलीमा हाशमी यांचे पती प्रा. शोएब हाशमी यांनी केला असून त्यासोबत सलीमा यांची चित्रे आहेत. हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. फैज़्‍ा यांच्या लाहेरमधल्या मॉडेल टाऊन स्थित घरातच सलीमा यांनी नव्या पिढीच्या चित्रकारांसाठी म्हणून ‘आर्ट-शार्ट’ नावाची आर्ट गॅलरीही स्थापन केली. मराठीत आपण ‘आर्ट-बीर्ट’ म्हणतो तसे हे पंजाबीतले ‘आर्ट-शार्ट’! गेली तीस वर्षे सलीमा हाशमी मानवाधिकार चळवळीतही सक्रिय आहेत. ‘वीमेन्स अ‍ॅक्शन फोरम’च्या त्या संस्थापक सदस्य आहेत. अर्थात पाकिस्तानच्या केवळ एलिट महिला वर्गापुरतीच ही चळवळ मर्यादित असल्याची टीकाही त्यावर होते. १९९८ मध्ये भारत आणि पाकिस्तानने केलेल्या अणुस्फोटांविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले होते की, हाच पैसा या दोन्ही देशांनी अधिक अन्नधान्य पिकवण्यासाठी, आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च कारायला हवा होता. विविध मूलतत्त्ववादी संघटनांच्या रूपात तालीबानी वृत्ती पाकिस्तानात सर्वत्र पसरलेल्या आहेत, अशी स्पष्टोक्तीही त्या करतात आणि या अवस्थेतही पाकिस्तानी प्रसार माध्यमे जे साहस दाखवीत आहेत त्याचे कौतुक करतानाच भारतीय प्रसार माध्यमांच्या बोटचेपेपणाकडेही तेवढय़ाच परखडपणे त्या निर्देश करतात.