Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

बुलढाणा जिल्ह्य़ाला पुन्हा वादळाचा तडाखा
कांदा पिकाचे नुकसान
बुलढाणा, १८ मे / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील काही भागात पुन्हा वादळाचा तडाखा बसला. काही ठिकाणी गारांसह पाऊस तर काही ठिकाणी पाऊस पडला. यामध्ये कांद्यासह इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे झाडे उन्मळल्याने काही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली तर वीज तारा तुटल्याने अनेक गावे अंधारात आहेत. पावसामुळे नाल्यांना पूरसुद्धा गेला.

इंग्रजी माध्यमानंतर आता ‘सीबीएसई शाळांचे ‘आक्रमण’!
राम भाकरे
१८ मे / प्रतिनिधी

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत असल्याने अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषद इतरही मराठी माध्यमाच्या तुकडय़ांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असतानाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांचे ‘आक्रमण’ होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी तीन वर्षांमध्ये विदर्भात शंभरहून अधिक ‘सीबीएसई’ शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी, चांगल्या महाविद्यालयांमधील जागा ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांनीच पटकावल्यानंतर मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्य़ात भाजप ‘रामभरोसे’
प्रशांत देशमुख
वर्धा, १८ मे

१५ व्या लोकसभेची मतमोजणी संपून दोनच दिवस लोटले. मात्र, वर्धा जिल्ह्य़ातील भाजप पदाधिकाऱ्यांना आताच १६ व्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. कारण काय? पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याची त्यांची अपेक्षा आहे. वर्धेकर ‘चेहरेपालट’ करतात, म्हणून पुढच्या वेळीस आपल्यालाच संधी, असा भाजप पदाधिकाऱ्यांचा विचार हे नेते किती ‘रामभरोसे’ चालतात, त्याचे स्पष्ट गमक ठरावे.

अहिरांचा विजय हा काँग्रेसने भाजपला दिलेला बोनस
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, १८ मे

भाजपचे खासदार हंसराज अहीर यांना या निवडणुकीत मिळालेला विजय हा कॉंग्रेसने भाजपला दिलेला बोनस आहे. एवढी अनुकूल स्थिती असतानाही झालेल्या पराभवाला पक्ष नाही तर केवळ नरेश पुगलिया जबाबदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना युती सोबत असलेले राजुराचे आमदार वामनराव चटप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करताच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली होती तर कॉंग्रेसच्या गोटात आनंदाच्या उकळय़ा फुटू लागल्या होत्या.

प्रफुल्ल पटेलांनी पराभवाचे उट्टे काढले
भंडारा लोकसभा मतदारसंघ
वामन तुरिले
भंडारा, १८ मे

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नाना पटोले यांचा २ लाख ५१ हजार ९१५ मतांनी दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि रिपाइं युतीचे प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा २००४ चा पराभवाचा डाग धुऊन काढला. राज्यसभेवर गेल्यावर देशातील अव्वल मंत्री म्हणून हुरळून न जाता लोकांमधून निवडून येण्याकरिता मागील पराभवापासून सातत्याने केलेला प्रयत्न या निवडणुकीत फलद्रूप ठरला.

पक्षांतर्गत असंतुष्ट, जातीय समीकरणे आणि ‘हत्ती’चा धक्का
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
न.मा. जोशी
यवतमाळ, १८ मे

मतमोजणीच्या दिवसापर्यंत किमान दोन लाख मताधिक्क्याने निवडून येण्याचा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त करणारे काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी सेनेच्या भावना गवळीकडून झालेला पराभव काँग्रेससाठी ‘धक्कादायक’ असला तरी सर्वसामान्य मतदाराला मात्र त्यात आश्चर्य वाटत नाही. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून तर १९९१ च्या ११व्या लोकसभेपर्यंत यवतमाळ मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, १९९६ मध्ये पहिल्यांदा या बालेकिल्ल्याला जबर हादरा बसला.

मेघेंच्या विजयात ‘पंचक ’ची भूमिका
वर्धा लोकसभा मतदारसंघ
वर्धा, १७ मे /प्रतिनिधी
वर्धेतून विजयी होणाऱ्या काँग्रेसच्या दत्ता मेघेंनी त्यांच्या विजयाचे श्रेय पक्ष व मित्रपक्षाचे आमदार, सहकार गट, रिपाइं नेत्यांना खुल्या दिलाने दिले. काँग्रेसचा बलाढय उमेदवार व त्यातच हवा अनुकूल म्हणून या नेत्यांनीही उपद्रव न करता काम केल्याचे दिसून आले. मात्र, याच नेत्यांवर पूर्णत: विसंबून राहून चालण्यासारखे नव्हते. मनापासून व जातीने सर्व प्रक्रियांवर लक्ष ठेवून काम करणाऱ्यांची व करवून घेणाऱ्यांची स्वतंत्र चमू ठेवण्याचे काम चाणाक्ष नेता करतो. दत्ता मेघेंसाठी अशीच एक चमू पडद्यामागे व प्रत्यक्षात २४ तास कार्यरत होती.

उमरझरीच्या जंगलात दोन नीलगायींचा मृत्यू
भंडारा, १८ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ात उष्णतेमुळे जंगलातसुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली असून वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्यूच्या दाढेत सापडले आहेत. उमरझरीच्या जंगलात दोन नीलगायी मृत्युमुखी पडल्या.
जंगलातसुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली असून जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. भंडारा जिल्ह्य़ात यावर्षी ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. साकोली तालुक्यातील एफडीसीएमच्या उमरझरी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलात दोन नीलगायी पाण्याअभावी मृत्युमुखी पडल्यामुळे उघडकीस आले. या जंगलात वनविभागाने बंधारे बाधले नसले तरी नैसर्गिक स्रोताची जपणूकही वनविभागाने योग्यतऱ्हेने केली नाही. जंगलातील तलाव आटल्यामुळे आतेगाव व चांदोरी येथील गाव तलावात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. उमरझरीच्या जंगलात वनविभागाने पाणवठय़ाची सोय करून तेथे टँकरद्वारे पाणी टाकून वन्यप्राण्यांची पिण्याची सोय करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंत हटवार यांनी केली आहे.