Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

विशेष लेख

अस्तित्त्वाचा झगडा
एचआयव्हीशी झगडताना बळी गेलेल्यांची आठवण म्हणून समदु:खी मंडळी आणि कार्यकर्ते १९८३ पासून दरवर्षी मे महिन्यात मेणबत्त्या पेटवतात. यंदा यासाठी ग्लोबल हेल्थ कौन्सिलच्या झेंडय़ाखाली ११५ देशांमधील १२०० समाजघटक एकत्र येत आहेत. आज शिवाजी पार्क, मुंबई येथे संध्याकाळी ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात नॅकोच्या अध्यक्ष डॉ. सुजाता राव, कुमारमंगलम बिर्ला, हृतिक-सुझान रोशन, नंदिता दास, शोभा डे, संदीप सोपारकर हे सहभागी होत आहेत.

 


‘माझ्याच वाटय़ाला इतका त्रास का?’ असं वाक्य आपल्या प्रत्येकाच्याच तोंडी असतं. मुख्य प्रवाहात, दर्जेदार राहणीमान अनुभवत असूनही हे वाक्य आपण पावलोपावली उच्चारतो, पण ‘हे फक्त माझ्याच वाटय़ाला आहे का?. माझ्यासारखे आणखी कोण आहेत, कुणापाशी आपली व्यथा व्यक्त करायची?. ’ हे गंभीर प्रश्न ज्यांना पडतात त्यांना ‘आपल्या’सारखे अन्य काही जण सापडणं म्हणजे जीवनसंजीवनीच ठरते! एचआयव्हीबाधित व्यक्ती या अशाच अनेकानेक प्रश्नांनी ग्रासलेल्या आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी धडपडणाऱ्या! सरकारी पातळीवर एचआयव्ही आणि एड्सबाबत प्रयत्न होतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक शाखा औषधोपचार, पुनर्वसन यांबाबत नित्य नवे उपाय शोधतात हे खरे, पण त्यांचा खरोखर किती जणांनी उपयोग करून घेतला, ते मिळवताना कोणत्या अडचणी आल्या, हे जाणून घेणे कुठल्याही एचआयव्हीबाधिताला अधिक महत्त्वाचे वाटते.
१९८३ पासून अशा प्रकारे समान समस्याग्रस्तांनी एकत्र येण्याचा प्रयोग जगभरात होत आहे तो एका स्मरणयात्रेद्वारे. यात मेणबत्त्या पेटवून स्मरण केले जाते ते एचआयव्हीशी झगडताना बळी गेलेल्यांचे. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात एकाच दिवशी जगभरात ठिकठिकाणी एकत्र येणारेही एचआयव्हीबाधितच असतात आणि त्यांची उमेद वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते व मुख्य प्रवाहातील जाणकार त्यांच्यात सहभागी होतात. मुंबईत यंदा प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. आपण आयुष्यापुढे आ वासून उभ्या असलेल्या या प्रश्नाशी कसा संघर्ष केला, याचा अनुभव सांगण्यासाठी देशभरातील लोक शिवाजी पार्कवर आज, मंगळवार, १९ मे रोजी या मंचावर येत आहे.
भारतात एड्सपेक्षा कर्करोगाची समस्या जास्त चिंताजनक आहे; पश्चिमेचे अनुकरण करत आपणही विनाकारण नसलेल्या समस्येचा बागुलबुवा उभा करीत आहोत, असे म्हणणाऱ्यांना एड्सने देशभरात हातपाय कधी पसरले, ते कळलेही नाही. आज भारताचा या समस्येत दुसरा क्रमांक लागतो, ही बाब इतकी वर्षे झालेले दुर्लक्षच अधोरेखित करते. तथाकथित सभ्य समजल्या जाणाऱ्या समाजातही हा रोग पसरला आणि आज अडीच कोटी लोकांना त्याची लागण झाली असल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते. अशा परिस्थितीत याबद्दल मौन सोडून जास्तीत जास्त वेळा जास्तीत जास्त लोकांशी बोलणे, हाच मार्ग आहे.
एक होण्याचे, संघटनेचे सामथ्र्य किती असते, हे लक्ष्मी यांच्या उदाहरणावरून दिसून येईल. वयाच्या पंचविशीतच किन्नरांची संघटना उभारून आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे मदतकार्य मुंबईतल्या अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवणे शक्य झाले, ते केवळ संघटनकार्यामुळेच, असे त्यांनी सांगितले. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एक फॅशन डिझायनर म्हणून नाव मिळवले आहे. पण त्यांची खरी ओळख ‘अ‍ॅव्हर्ट’, ‘अस्तित्त्व’ आणि ‘दाया’ या संस्थांशीच निगडित आहे.
तृतीयपंथी म्हणून समाजाची उपेक्षा वाटय़ाला आली तरी हिंमत न गमावता त्यांनी नृत्याचे शिक्षण पूर्ण करून अभिनयक्षेत्रात पाय रोवला. काही चित्रपटांतून कामे केली. मात्र विविध संघटनांशी संबंधित कामे करताना त्यांचे नेतृत्वगुण समोर आले आणि किन्नरांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी किन्नरांच्या हितासंबंधीच्या कार्यात नागरी सहभाग वाढावा म्हणून संस्था स्थापल्या. त्यात आग्नेय आशियाकरिता स्थापन करण्यात आलेल्या ‘दाया’ या संघटनेचे ते अध्यक्षपद होते. आज त्या घटनेला १० वषेॅ झाली, पण किन्नरांना मुख्य प्रवाहातील समाजाकडून मिळणारा प्रतिसाद फारच कमी आहे, असा त्यांचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कामांचा अनुभव घेतल्यानंतर लक्ष्मी यांनी ठाण्यात स्वत:ची संघटना स्थापन केली. किन्नर हे सर्वाधिक अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांची संघटना असावी, या हेतूने त्यांनी २००६मध्ये ‘अस्तित्त्व’ उभी केली. या तीन वर्षांत संस्थेचे दोन हजार सदस्य असून ते आपल्या कल्पनांची, अुनभवांची देवाणघेवाण करण्याकरिता संघटनेचा उपयोग करू शकतात.
‘अस्तित्त्व’ लैंगिक समस्यांवर उपाय शोधण्यात आघाडीवर असल्यामुळे एचआयव्ही आणि एड्सवरच्या कार्यक्रमांत तिचा सहभाग असतोच. १० वर्षे आपण या समस्येवर काम केले, पण आजही समाजात या रोगाविषयी न बोलण्याचीच वृत्ती दिसते. एड्सविषयी उघडपणे बोलण्यास लोकांनी उद्युक्त व्हावे, म्हणून प्रयत्न करण्यातच इतकी सगळी वर्षे खर्च केली, असे त्यांनी सांगितले. पण ती मेहनत वाया गेली नाही. आता एड्सग्रस्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन किमान बदलला आहे; दहा वर्षांपूर्वी त्याला महारोगाप्रमाणेच समजत; पण त्याची लागण स्पर्शाने होत नाही, हे तरी आता लोकांच्या गळी उतरले आहे, असे त्या म्हणतात.
यूएनएड्सच्या परिसंवांदांमधून भारतातील स्थिती मांडणे, एड्सविषयीच्या बोधपटांमधून भूमिका करणे अशा माध्यमांमधून त्यांनी सातत्याने जगाचे लक्ष आपल्यासारख्यांच्या समस्येकडे वेधले.
एचआयव्हीग्रस्त किन्नरांना उपचार मिळवून देणे, हे संस्थेपुढचे आणखी एक आव्हान होते. मुळातच समाजाच्या या घटकाचा उपहास होतो; त्यात ते लैंगिक संसर्गातून होणाऱ्या रोगाने ग्रस्त असल्यावर तर त्यांच्या स्थितीची कल्पनाच केलेली बरी. पण आता शहरी भागांत तरी किन्नरांना चांगली वागणूक मिळू लागली आहे. ठाणे आणि मुंबईतल्या पालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून मिळणारी वागणूक लक्षणीय प्रमाणात बदलली आहे. १० वर्षांपूर्वी जो समाज त्यांना माहीतही नव्हता, त्यातील लोकांना ते ‘हात’ लावून तपासतात, बोलताना समजूतदारपणे वागतात, हेच एवढय़ा वर्षांच्या कामाचे यश.
पण हा प्रतिसाद म्हणजे सागरातील एक बिंदू. समाजमनाच्या स्वीकाराची ही जेमतेम पहिली पायरी आहे, असे या संदर्भात काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. आजही एड्सने रुग्ण मृत्यू पावला की त्याच्या बायकोला घराबाहेर काढणारी आणि मुलांना देशोधडीला लावणारी कुटुंबे आहेत. यूएनएड्स आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी कार्यरत झालेली अ‍ॅव्हर्ट इंडिया ही संस्था याबाबत जागृतीचे काम करीत आहे. उद्याचा कॅंडललाइट मेमोरियल कार्यक्रम हाती घेण्यात त्यांचा पुढाकार आहे.
वेळोवेळी एकत्र येण्यातून पुष्कळ जणांना दिलासा मिळतो, असा लक्ष्मी यांचा अनुभव आहे. सांस्कृतिक पद्धतीचे कार्यक्रम लोकांना लगेच आपलेसे करतात, कार्यक्रम जेवढा मोठा होईल, जितके अधिक लोक त्यात सहभागी होतील, तितका उपेक्षित घटकांना मिळणारा दिलासा मोठा असेल कारण हे सामान्य परिस्थितीतले लोक आपल्या पाठीशी आहेत, हे यामार्फतच त्यांच्यापर्यंत पोहोचते. अशा कार्यक्रमांमधूनच समस्येविषयी लिहिण्यास लेखक उद्युक्त होतात आणि कलाकार लघुपटांसारख्या कलाकृती निर्माण करण्यास सरसावतात, हे निश्चितच मोठे फलित आहे, असे त्यांना वाटते.
सुलेखा नलिनी नागेश