Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

विविध

पाक लष्कर व जनतेमध्ये अमेरिकाविरोधी भावना असू शकते-मुशर्रफ
वॉशिंग्टन, १८ मे/पी.टी.आय.

पाकिस्तान जनतेमधील तसेच देशाच्या लष्करामधील काही गटांमध्ये अमेरिकाविरोधी भावना असू शकते असे ठाम मत पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी सीएनएन या टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. १९८९ ते २००१ या कालावधीत अमेरिकेने पाकिस्तानला ऐनवेळी वाऱ्यावर सोडल्यामुळे पाकिस्तान लष्कर तसेच जनतेच्या मनात त्याविषयी तेढ असू शकते, असेही ते म्हणाले. बुश प्रशासनाच्या

 

पाठिंब्यावर १० वर्षे पाकिस्तानचा कारभार हाकणाऱ्या माजी लष्करप्रमुखाने असे विधान केल्याने त्यास एका बाजूने महत्त्वही प्राप्त होत आहे.
१९४७ पासून १९८९ पर्यंत पाकिस्तान व अमेरिकेचे ४२ वर्षे सौहार्दपूर्ण संबंध होते. महत्त्वाची मित्रराष्ट्रे म्हणून अनेक पातळ्यांवर त्यावेळी सहकार्य होत होते. अमेरिकेबरोबर १० वर्षे आम्ही युध्द सुध्दा खेळलो, पण बदल्यात आम्हाला काय मिळाले? अमेरिकेविषयी पाकिस्तानातील जनतेच्या याच भावना असू शकतात, असे मुशर्रफ म्हणाले. दहशतवादविरोधी लढाई मिळण्यासाठी १० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत पाकिस्तानला मिळाली व पाकिस्तानने ती फुकट घालविली हा आरोप मुशर्रफ यांनी यावेळी फेटाळून लावला. याउलट ही लढाई लढण्यासाठी जी यंत्रणा आम्हाला हवी होती ती पुरविण्यात आली नाही अशीही टीका मुशर्रफ यांनी अमेरिकेसंदर्भात केली आहे. या मदतीपैकी पाच अब्ज डॉलरची रक्कम पाकिस्तानने जी आतापर्यंत सेवा पुरविली त्याबद्दल होते. आता उरले आणखी पाच अब्ज अमेरिकी डॉलर..त्यात अर्धे लष्करी सेवा व अन्य शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक क्षेत्रांसाठी होते. लष्कराला दारूगोळा पुरविणे, लढाऊ विमाने सूसज्ज ठेवणे अशा कामांसाठी ते लागतच होते. अर्थात हा निधीही तसा अपुरा होता. कारण एकेकाळी २० लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये दोनच विमाने सूसज्ज असायची. त्यानंतर आपण संयुक्त राष्ट्रांमध्ये अपुऱ्या निधीवर ओरड केली. मग पुन्हा लष्करी मदतीचे आश्वासन दिले गेले. स्वात खोऱ्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती खरे तर ठाम लष्करी बळाने हाताळायला हवी होती. कारण एकदा दबाव निर्माण करायचा म्हटल्यावर तो तसा निर्माण केला गेला पाहिजे, असेही मुशर्रफ म्हणाले.
तालिबानशी लढाई पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तानमध्ये खेळली गेली पाहिजे. कारण अर्धा अधिक अफगाणिस्तानचा मुलुख हा तालिबान्यांनी ताब्यात ठेवला आहे. अफगाणिस्तानात जे घडून आले त्याचा पाकिस्तान हा मुख्यत्वे बळी आहे. अफगाणिस्तानातून तालिबान आणि अल-काईदाला संपविले तर पाकिस्तानातही ते धोरण यशस्वी ठरेल, असे मुशर्रफ अखेरीस म्हणाले.

गोव्यातील विदेशी पर्यटकांच्या संख्येत १० टक्क्यांनी घट, रशियनांनी दिला हात
पणजी, १८ मे/वृत्तसंस्था

गोव्यातील विदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी घट झाली असली तरी रशियन पर्यटकांची संख्या वाढल्याने गोवा पर्यटन खात्यास दिलासा मिळाला आहे. यंदा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचे सावट आणि जागतिक मंदीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
खास पर्यटनासाठी गोव्याकडे विदेशांतून २७ एप्रिलपर्यंत ६१४ चार्टर्ड विमाने आली आणि त्याद्वारे एक लाख ४५ हजार ४१४ पर्यटक आले. अमेरिका व ब्रिटनहून आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत ३० ते ३५ टक्के घट झाली मात्र रशियाहून अधिक संख्येने पर्यटक आल्याने परिस्थिती सावरली आणि प्रत्यक्षातील घट १० टक्क्यांपर्यंत थोपविता आली. यंदा आलेल्या विदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटनचा पहिला क्रमांक होता. ब्रिटनहून २८७ विमाने आली आणि त्याद्वारे ७७ हजार ५०० ब्रिटिश पर्यटक आले. रशियाचा क्रमांक दुसरा होता. तेथून १७८ विमानांतून ४४ हजार ११६ पर्यटक आले. जर्मनी हा या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला. तेथून ५० विमानांतून ९,१५९ पर्यटक गोव्यात आले. स्वित्र्झलड, नॉर्वे, इटली आणि फिनलंडहूनदेखील मोठय़ा संख्येने पर्यटक आले.
पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी आकर्षक पॅकेजेस आणि सरकारचा सहभाग व पुढाकार यामुळे थायलंड आणि सिंगापूरकडे पर्यटक अधिक संख्येने आकर्षित झाले असून या देशांची स्पर्धा गोव्याला जाणवत आहे. श्रीलंकेतील तामिळी अतिरेक्यांविरोधातले युद्ध संपल्याने तेथेही पर्यटकांचा ओघ वळण्याची शक्यता आहे. या बाबी लक्षात घेऊन गोवा सरकारनेही पर्यटन उद्योगाला चालना देणारे निर्णय घेतले पाहिजेत, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.