Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

व्यापार - उद्योग

पाण्याअभावी जेजुरी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची अवस्था बिकट
प्रतिनिधी: जेजुरी औद्योगिक वसाहतीला नाझरे धरणातून करण्यात येत असलेला पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आर्थिक मंदीच्या कचाटय़ात सापडलेल्या उद्योगांचे पाणीटंचाईमुळे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे उद्योगांना सध्या फक्त पिण्यापुरते अर्धा ते एक तास पाणी देण्यात येते. यामुळे आता उद्योगांना चढय़ा भावाने टँकरचे विकत पाणी घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे.

 


नाझरे धरणात ७८८ दशलक्ष घनफूट साठय़ांपैकी फक्त १४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा राहिला आहे. औद्योगिक वसाहतीचे पाणी १ मे २००९ पासून बंद करण्यात आले आहे. येथील कारखान्यांना दररोज एक हजार घनमीटर पाणी लागते, त्यापैकी आता फक्त २०० घनमीटर पाणी प्रतिदिन उचलण्यात येत आहे.
पाणीटंचाईचा जादा फटका फळप्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना बसला आहे, प्रामुख्याने टेम्प्टेशन फूड्स कंपनी, ताज फ्रोजन, आदिनाथ फूड्स, ब्रायोसिया, इंडियाना, यूनिटेक, पॉलिमर, हेन्कल लॉकटाईट, शालिनी एंटरप्रायझेस, साईकृपा फूड्स, हायड्रो एस.एस., आय.एस.एम.टी. कॉलनी आदी उद्योग पाण्याअभावी अडचणीत आले असून उत्पादनावरही गंभीर परिणाम झाले आहेत.
औद्योगिक वसाहतीमध्ये लहान मोठे १२५ उद्योग सुरू असून सात ते आठ हजार कामगार काम करतात. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांच्या परिसरातील झाडे, वनराई सुकू लागली आहे. जागोजागी पाण्याचे टँकर दिसू लागलेत.
दरवर्षी किमान तीन ते चार महिने औद्योगिक वसाहतीचे पाणी तोडले जाते, यामुळे येथील उद्योगांचे हाल होतात. पुरेसे पाणीच नसेल तर उद्योगधंदे चालवायचे तरी कसे, असा सवाल येथील उद्योजक करीत आहेत. मागील वर्षीही उद्योगांना तीन महिने पाणी मिळाले नव्हते.
वीर धरण ते जेजुरी औद्योगिक वसाहत या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट अवस्थेत पडल्याने तेथील पाणी जेजुरीत आले नाही. वीरचे पाणी आले असते तर उद्योगांचे पाण्याअभावी हाल झाले नसते. वीर योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे, आचारसंहितेमुळे तेथील उर्वरित काम रखडले असल्याचे समजते.

कामगारांमध्ये खळबळ पिंपरीतील ‘अ‍ॅमफोर्ज’ला २८ मेपासून टाळे
व्यापार प्रतिनिधी: आर्थिक मंदीपायी फोर्जिग उद्योगातील मागणीचा वानवा आणि वाढत चाललेला तोटा, उत्पादनाचा अभाव या कारणामुळे ‘अ‍ॅमफोर्ज’ ही कंपनी २८ मे पासून बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने शुक्रवार (१५ मे) एका नोटिसीद्वारे जाहीर केला. व्यवस्थापनाच्या या बेकायदा निर्णयाविरुद्ध भारतीय मजदूर संघ औद्योगिक न्यायालयात दाद मागणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील या वर्षांत बंद करण्यात आलेली ही पहिलीच कंपनी आहे.
कामगारांना अथवा कामगार संघटनेला विश्वासात न घेता व्यवस्थापनाने हा उद्योग २८ मे पासून बंद करण्याचा निर्णय एका नोटिशीद्वारे जाहीर केला आहे. ही नोटीस कंपनीचे संचालक योगीराज माकर यांच्या स्वाक्षरीने कंपनीच्या सूचना फलकावर लावण्यात आल्याने कामगारामध्ये असंतोष पसरला आहे. भारतीय मजदूर संघ या मान्यताप्राप्त संघटनेने व्यवस्थापनाचा निषेध केला आहे. कंपनीच्या एकतर्फी निर्णयाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात दाद मागणार अशी माहिती संघाचे सचिव अर्जुन चव्हाण यांनी दिली आहे.
या कंपनीतील २५४ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनीने कायद्यातील पळवाटा शोधून कामगारांना बंद काळातील वेतन मिळू नये म्हणून कंपनी ‘क्लोजर’च्या नावाखाली कंपनी बंद ठेवण्याचा डाव खेळत आहे, असा संघटनेचा आरोप आहे. दरम्यान, कंपनीने नोव्हेंबर २००८ च्या शेवटच्या आठवठय़ात अर्थिक मंदी व उत्पादनाचा अभाव हे कारण पुढे करून ब्लॉक क्लोजर केला. या विरोधात कामगार संघटनेने कामगार आयुक्त अरविंदकुमार यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच कंपनीने हा उद्योग एप्रिल २००८ पासून बंद करण्यासाठी अर्ज केला होता, तो अर्ज फेटाळण्यात यावा व बंद काळातील पूर्ण वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली होती. कामगारांची बाजू ऐकून आयुक्तांनी कंपनीचा अर्ज फेटळला. कामगारांना नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांचा पगार द्यावा लागला.
तथापि कामगार संघटना वेळोवेळी व्यवस्थापनावर दबावतंत्राचा वापर करत आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन करून औद्योगिक शांतता भंग करत आहेत. त्यामुळे कंपनीची बदनामी होत आहे. तसेच वाहन उद्योगाकडून उत्पादनाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे आर्थिक स्रोत होत नसल्याने कामगारांना वेतन देण्यास पैसे नाहीत, अशा कारणामुळे व्यवस्थापनाला कंपनी चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे हा उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे.्ल

‘बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्स’ची विमा दावे प्रक्रियेत उत्तम कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स विमा कंपनीने १०० टक्के विमा दाव्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही माहिती बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स विमा कंपनीचे प्रमुख प्रचालन अधिकारी (सीओओ) अमिताभ वर्मा यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या वित्तीय वर्षांत ग्राहकांनी केलेल्या सर्व विमा दाव्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
बिर्ला सनलाइफ विमा कंपनीचे विमा दावे पूर्ण न होण्याचे प्रमाण घटत असून ते या उद्योगात सर्वोत्तम आहे. २००७-०८ वित्तीय वर्षांत कंपनीचे दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण ०.३२ टक्के होते. ते २००८-०९ वर्षी शून्य टक्के झाले आहे.
लाइफ ऑफिस मॅनेजमेंट असोसिएशन (लोमा) संस्थेने अलिकडेच २००८ सालासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणात बिर्ला सनलाइफ विमा कंपनीची सर्व विमा कंपन्यांमधून दावे मापदंडानुसार सर्वोत्तम टर्न अराउंड टाइम्स (टीएटी) साठी निवड करण्यात आली आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीजची विक्री उलाढाल २३९ कोटींवर
व्यापार प्रतिनिधी: भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या उत्पादन व विक्रीतील प्रमुख कंपनी टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत एकंदर विक्री उलाढाल २३९ कोटी रुपयांवर नेली आहे. गतवर्षीच्या रु. १४६.४ कोटींच्या विक्री उलाढालीच्या तुलनेत त्यात यंदा ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी कंपनीचा निव्वळ नफा गतवर्षीच्या रु. १६.२१ कोटींवरून यंदा रु. २१.२४ कोटी (३१ टक्के वाढ) झाला आहे. या उत्तम कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर प्रति समभाग मिळकत गतवर्षीच्या रु. २८.३२ वरून रु. ३७.११ वर गेली आहे. ब्रॅण्डी मद्यप्रकारात कंपनीचे ‘मॅन्शन हाऊस’ या प्रीमियम ब्रॅण्डच्या वरचष्म्यामुळे एकंदर कामगिरी चमकदार झाली आहे.

ब्ल्यू स्टार इन्फोटेकच्या नफ्यात २१७ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: ब्ल्यू स्टार इन्फोटेक लिमिटेड कंपनीने ३१ मार्च २००९ रोजी समाप्त वित्तीय वर्षांसाठी रु. १५५.०३ कोटींचे एकत्रित उत्पन्न कमावले आहे, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत आठ टक्क्यांनीवाढले आहे. आर्थिक वर्षांसाठी निव्वळ नफाही रु. ४.९१ कोटींवरून २१७ टक्क्यांनी वाढून रु. १०.५४ कोटींवर गेला आहे. प्रति समभाग मिळकत मागील वर्षांतील रु. ५.०१ वरून यंदा तब्बल रु. १३.१३ वर गेली आहे. या उत्तम कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग पाच रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

मराठा चेंबरचे ‘इनोव्हेशन पोर्टल’
व्यापार प्रतिनिधी: एमसीसीआयएने ईटीएच लिमिटेडबरोबर मिळून इनोव्हेशन पोर्टलची सुरुवात केली आहे. या इनोव्हेशन पोर्टलद्वारे नेटवर्किंग व सहयोगावर आधारित विचारांना चालना देण्यात येणार आहे. या पोर्टलमधील बी टू बी मॉडय़ूलद्वारे एमसीसीआयएच्या सदस्यांना त्यांच्या उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन मांडता येणार आहे. इनोव्हेशन पोर्टल सहकार्यावर आधारित मंच असून, याद्वारे उद्योजकांना अभिनव विचारांच्या व्यक्तीशी किंवा समुदायाशी संपर्क साधता येणार आहे. यामध्ये त्यांचे स्वत:चे कर्मचारी किंवा संशोधक, शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्थांचा देखील समावेश असणार आहे, ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जॉन प्लेअर्सचे समर कलेक्शन
व्यापार प्रतिनिधी: जॉन प्लेअर्सचे स्प्रिंग समर कलेक्शन २००९ सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये स्लिम फिट शर्ट्स, ट्रेंडी ट्राउजर्स, कूल टी-शर्ट्स आणि स्टायलिश डेनिम्स असे सगळे काही आहे. कॉटन आणि लिनेन यासारख्या उन्हाचा चटका कमी करणाऱ्या कापडांमध्ये सनी यल्लो, कोबाल्ट ब्ल्यू, गुलाबी, हिरवा आणि जांभळय़ा रंगाची रंगसंगती या पोषाखांना अधिकच आकर्षक बनवते. या कलेक्शनमधील पोषाख रु. ४९९ पासून पुढील किमतीस उपलब्ध असून जॉन प्लेअर्सच्या फ्लॅगशिप स्टोअर्स तसेच मल्टीब्रँड दालनांमध्येही खरेदी करता येतील.