Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

अग्रलेख

वाघांची शिकार!

 

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’ या दहशतवादी संघटनेचा म्हणजेच तामिळ वाघांच्या संघटनेचा नेता वेलुपल्ली प्रभाकरन श्रीलंकेच्या सैन्याच्या कारवाईत मारला गेला आहे. प्रभाकरनच्या मृतदेहाची छायाचित्रेच श्रीलंकेच्या सैन्याने आता प्रसिद्ध केली आहेत. ती प्रसिद्ध केली जाईपर्यंत श्रीलंकेच्या सरकारने प्रभाकरनविषयी कोणताही अधिकृत खुलासा करायचे टाळले होते. खुद्द श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पार्लमेंटपुढे काल केलेल्या भाषणातही प्रभाकरनचा उल्लेख केला नव्हता. तामिळ वाघांच्या परकीय प्रसिद्धी यंत्रणेने प्रभाकरन जिवंत असल्याचे दाखले दिले, पण ते खोटे असल्याचे आता उघड झाले आहे. परंतु प्रभाकरनचा मृत्यू म्हणजे एकूण तामिळ दहशतवादाचा अंत नव्हे. त्यांच्या संघटनेचे जाळे जगभर, मुख्यत: युरोपात आहे. तामिळ वाघांना शस्त्रखरेदीसाठी लागणारे पैसे युरोपातच गोळा केले जात. हजारो तामिळ व्यक्ती व कित्येक संघटना जगाच्या विविध भागांतून तामिळ वाघांना पैसे पाठवत असत. ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी त्यांचे संबंध होते. जगात चालणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या काळ्या बाजारातून ते शस्त्र खरेदी करीत असत. प्रभाकरनच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अनेक तामिळ तरुण-तरुणी स्वत: मानवी बॉम्ब व्हायला तयार होण्याची शक्यता आहे. भारताला तर अधिकच सावध राहायला हवे. विमाने हायजॅक करण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवून आणण्यापर्यंत आणि श्रीलंकेतील आणि भारतातील राजकीय नेत्यांचे खून घडविण्यापर्यंतचे कट आताच शिजू लागले असतील. प्रभाकरनने असे विकृत व हिंस्र निष्ठा असलेले अनेक अनुयायी तयार केले आहेत. १९७६ पासून तामिळ वाघांनी श्रीलंकेच्या सरकारविरुद्ध आक्रमक कारवाया केल्या. त्या ३३ वर्षांमध्ये अध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, असंख्य सामान्य सिंहली आणि तामिळ निष्पाप नागरिक मारले गेले. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्याही याच तामिळ वाघांनी आणि त्यांचा नेता प्रभाकरन याने घडवून आणली. प्रभाकरन हा त्याही अर्थाने भारताला हव्या असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर होता. तो जिवंत सापडला असता, तर त्याला भारताच्या हवाली करावे लागले असते. त्या परिस्थितीतही त्याचा मृत्यू अटळ होता. योगायोग असा, की राजीव गांधी यांच्या मृत्यूला उद्या अठरा वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांच्या हत्येच्या या सूत्रधाराला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. निसर्ग हा मित्र, जीवन हे तत्त्वज्ञान आणि इतिहास हा सांगाती, असे आपले तत्त्वज्ञान आहे, असे सांगणारा प्रभाकरन स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनाच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत वागत राहिला. असंख्य नागरिकांची हत्या त्याने आणि त्याच्या संघटनेने केली. त्यात ए. अमृतलिंगमसारख्या सहकाऱ्याचाही मुलाहिजा ठेवला नाही. श्रीलंकेचे तेव्हाचे अध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारताबरोबर १९८७ मध्ये केलेल्या शांतता कराराला ए. अमृतलिंगमने पाठिंबा दिला म्हणून त्याचा त्याने काटा काढला. ३० वर्षांच्या काळात सुमारे पाऊण लाख सिंहली तसेच श्रीलंकेतले तामिळ आणि भारतीय यांच्या हत्या प्रभाकरनने घडवून आणल्या. राजीव गांधींना ठार करणारी पहिली महिला मानवी बॉम्ब धनू हिला प्रभाकरननेच श्रीपेरुम्बदूरला पाठवले होते. त्याच्या गुप्तचर खात्याचा प्रमुख पोट्टू अम्मानने ही एक दुर्दैवी घटना होती, असे अलीकडे म्हटले होते. परंतु ते उद्गार पश्चातापाचे होते की डावपेचाचे हे सांगता येत नव्हते. पोट्टू अम्मानही काल त्याच्याबरोबरच मारला गेला. तामिळ वाघांनी आपला संघर्ष १९८३ मध्ये अधिक तीव्र केला. त्या वर्षी सिंहलींनी श्रीलंकेत दिसेल त्या तामिळ व्यक्तीला ठार करायला सुरुवात केली होती. या सिंहलींनी लहान मोठा असा भेदभाव तर केला नाहीच, पण महिला आणि लहान मुलांना अतिशय निर्घृण पद्धतीने मारले. नवजात अर्भकांसह अनेक मुलांना उकळत्या डांबरात फेकून द्यायचे कृत्यही करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. वांशिक युद्ध एवढय़ा टोकाला गेले, की श्रीलंकेत त्यावेळी असणाऱ्या तामिळींखेरीजच्या अन्य भारतीयांवरही सिंहली नागरिकांनी हल्ले केले. त्यांची घरेदारे उद्ध्वस्त केली. भारतीय वकिलातही त्यांच्या माऱ्यातून त्यावेळी सुटली नाही. मुख्य गोष्ट म्हणजे तामिळ वाघांची हिंस्र संघटना निर्माण झाली तीच मुळी सिंहलींनी तामिळांना दिलेल्या अन्याय्य, विषम व दुटप्पी वागणुकीमुळे. सिंहलींच्या अतिरेकी वृत्तीचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण झालेल्या तामिळ संघटना पुढे पुढे अधिकाधिक हिंस्र होत गेल्या. तेव्हाच्या या हल्ल्यांमागे ज्या शक्ती होत्या, त्यात काही अन्य देशांचे गुप्तचरही होते. राजीव गांधींनी १९८७ मध्ये जयवर्धने यांच्याबरोबर केलेल्या शांतता करारात श्रीलंकेच्या विमानतळांचा आणि बंदरांचा वापर यापुढे परकीयांना करू दिला जाणार नाही, असे म्हटले होते, तर श्रीलंकेत तेव्हा असणाऱ्या पाकिस्तानी, इस्रायली, ब्रिटिश, अमेरिकन आणि जर्मन गुप्तचरांना देश सोडण्यास सांगण्यात येईल, असे श्रीलंकेच्या बाजूने स्पष्ट करण्यात आले होते. तामिळांना त्यांचे सर्व हक्क प्रस्थापित करू दिले जातील, असेही त्यात म्हटले होते. त्यावेळी शांतिसेना पाठवून भारताने श्रीलंकेच्या अंतर्गत बाबीत विनाकारण हस्तक्षेप केला, म्हणून भारतात टाहो फोडणाऱ्या राजकीय पक्षांनी तेव्हा आपण नेमके यापैकी कुणाच्या बाजूचे होतो, हे आता जाहीर करायला हरकत नाही. भारतीय शांतिसेनेच्या तेव्हाच्या कारवाईतच सर्व अडथळे असतानाही प्रभाकरनची कोंडी करण्यात यश आले होते. प्रभाकरनने पाळलेला एक बिबटय़ा शांतिसेनेच्या गोळ्यांना बळी पडला होता. त्याची छायाचित्रेही भारतीय सैन्याने तेव्हा प्रसिद्ध केली होती. तेव्हाच्या त्या कारवाईत भारतीय शांतिसेनेचे सुमारे पंधराशे जवान मृत्युमुखी पडले होते. श्रीलंकेतल्या वांशिक युद्धाच्या सर्व टप्प्यांमध्ये ज्यांना त्याची झळ बसली, त्या तामिळींनी श्रीलंकेच्या अन्य भागात आश्रय घेतला. तेव्हाच्या बेगुमान सरकारांनी या निर्वासितांना सलग पाच-पाच दिवस उपाशी ठेवले. आताही जवळपास अडीच लाख तामिळींनी प्रभाकरनच्या कचाटय़ातून निसटून श्रीलंकेच्या अन्य भागात आश्रय घेतला आहे, त्यांची स्थिती आणखी दारुण बनायचा धोका आहे. त्यांच्या आरोग्यासह सर्व सोयीसुविधांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून लक्ष दिले गेले पाहिजे. या निर्वासितांसमवेत तामिळ वाघांचे पाठीराखेही असतील, या संशयापायी त्यांचा छळ सुरू केला गेल्यास पुन्हा एकदा वेगळा संघर्ष उभा राहू शकतो. राजपक्षे यांनी तामिळ हेही श्रीलंकेचे नागरिक आहेत, असे सांगून त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. आपला हा संदेश संबंधितांपर्यंत व्यवस्थित पोहोचावा म्हणून त्यांनी तामिळांसंबंधीचा समारोपाचा काही भाग तामिळमधूनच व्यक्त केला. तामिळांविरुद्ध सिंहलींनी १९५८ मध्ये असंतोषाची पहिली ठिणगी टाकली. त्यातूनच सर्वप्रथम ‘तामिळ न्यू टायगर्स’चा जन्म झाला आणि त्यानंतर ‘तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट’, ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’ आदि संघटना पुढे आल्या. प्रभाकरनने आपल्या संघटनेचे स्वरूप अधिक आक्रमक बनवले आणि मिळेल तिथून शस्त्रास्त्रे आणि अन्य प्रकारची मदत मिळवली. १९८७ च्या सुमारास भेटलेल्या अनिता प्रताप या पत्रकाराशी बोलताना प्रभाकरनने म्हटले होते, की समजा माझ्या एका मुलाला कुणी हल्ल्यात जखमी केले, तर मी त्यांच्या दहा जणांना त्या बदल्यात खलास केले, तर काय बिघडणार आहे? प्रभाकरनचा घात हा त्याच्या अशा अरेरावीपूर्ण वागण्यानेच केला आहे. मानवी बॉम्बचा वापर करून त्याने त्याचा जगभर प्रसारही केला. आपल्याकडल्या नक्षलवाद्यांना तामिळ वाघांकडूनच शस्त्रपुरवठा केला जात असे. ज्या काळात प्रभाकरनबरोबर समझोत्यास श्रीलंकेचे सरकार तयार होते, तामिळांना जाफना परिसरात काहीशी स्वायत्तत्ता देऊ पाहात होते, त्या काळात तो वेगळ्या मस्तीत गेला आणि त्याने जिथे तिथे सरकारला जेरीला आणायचा प्रयत्न केला. या त्याच्या प्रयत्नात तामिळ वाघांच्या नेतृत्वाच्या फळीपैकी बहुतेक सर्व वरिष्ठांना मरण पत्करावे लागले. उरलेल्यांना परागंदा व्हावे लागले. त्याच्याशी जे एकनिष्ठ राहिले, त्यापैकी बरेचसे कालपर्यंतच्या कारवाईत ठार झाले. राजपक्षे हे श्रीलंकेतल्या आजवरच्या सर्व नेत्यांमध्ये अधिक दृढनिश्चयी मानले जातात. त्यांनी सत्तेवर येताच आपण तामिळ वाघांचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे जाहीर केले आणि तो निश्चय तडीस नेला. मात्र तामिळ वाघांच्या कारवायांची दुसरी आवृत्ती उद्भवायचा धोका आहे. श्रीलंकेच्या सरकारने त्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.