Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

संगणकीय मराठीच्या प्रमाणिकरणाची आवश्यकता

 

संगणकावर मराठीचा वापर कसा केला जातो याबाबत अनेक वेळा चर्चा होते, अनेकांना आजही या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मध्यतंरीच्या काळात मायक्रोसॉफ्टच्या ‘युनिकोड’ने या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, पण भाषेची गरज पूर्ण भागविण्यात हा फॉण्टही अपुराच ठरला, असे काही जणांचे म्हणणे असून त्यात काही प्रमाणात तथ्य आहे.
युनिकोड पूर्वी किंवा आजही अनेक कंपन्यांनी मराठीचे विविध फॉण्टस् तयार केले आहेत, पण ते वापरण्यासाठी विविध तांत्रिक मर्यादा पाळाव्या लागतात. म्हणजे ते वापरण्यासाठी त्या फॉण्टला आवश्यक असे सॉफ्टवेअर आपल्या संगणकात असणे आवश्यक आहे. ते नसल्यास आपल्याला ते नव्याने लोड करून घ्यावे लागते. अशा अनेक अडचणी आपल्यासमोर असतात. आपण मराठीत अमुक एका फॉण्टमध्ये तयार केलेला मजकूर दुसऱ्या संगणकावर वाचण्यासाठी त्या संगणकामध्येही तो फॉण्ट असणे गरजेचे आहे. म्हणजेच पुन्हा त्या संगणकावर आपल्याला तो फॉण्ट आणि त्याला आवश्यक असे सॉफ्टवेअर लोड करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शुभानन गांगल यांनी ‘एसगांगल’ या फॉण्टची निर्मिती केली आहे. हा फॉण्ट आपल्याला कोठेही सहज लोड करता येऊन त्याचा वापर करू शकतो. गांगल यांच्या मते आजपर्यंत उपलब्ध असलेले मराठी फॉण्ट मराठी भाषेशी साधम्र्य साधणारे नाहीत. हे सर्व फॉण्ट इंग्रजांनी लादलेल्या प्रिंटींग टेक्नॉलॉजीला आवश्यक अशा ‘डिटीपी’ तंत्राला उपयुक्त असे बनविण्यात आले आहे. यामुळे या फॉण्टस्मध्ये मराठी भाषेतील जातीगुण वैशिष्ट्ये सापडत नाहीत. गांगल यांचा फॉण्ट किबोर्डवरील ९४ चाव्यांमध्ये बनविण्यात आला असून तो आपण कागदावर ज्याप्रमाणे लिहतो त्याप्रमाणे चालतो. म्हणजे ‘अ’ हे अक्षर लिहिण्यासाठी आपण किमान दोनदा पेन उचलतो त्याचप्रमाणे ‘एसगांगल’ फॉण्टमध्ये संगणाकावर हेच अक्षर टाइप करण्यासाठीही आपल्याला दोन चाव्यांचा वापर करावा लागतो. तसेच गांगल यांच्या या फॉण्टमध्ये प्रत्येक अक्षराचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते. या फॉण्टचे विशेष म्हणजे हा आपण सहज इमेलद्वारे कोणालाही पाठवू शकतो. जणेकरुन आपला मजकूर दुसऱ्याच्या संगणकावर फॉण्ट कॉपी-पेस्ट केल्यानंतर सहजपणे वाचता येऊ शकतो. हा फॉण्ट इंग्रजीतील मूळ फॉण्ट ‘एरिअल’ याच्याशी साध्यर्म साधणारा आहे. म्हणजे या दोनही फॉण्टचा तांत्रिक पाया सारखा ठेवण्यात आलेला आहे. यामुळेच हा फॉण्ट इ-मेलमधील टेक्स्टही टाइप करता येऊ शकतो. शिवाय हा फॉण्ट वापरण्याठी इतर मराठी फॉण्टप्रमाणे आपल्याला विशिष्ट एकाचप्रकारचा ‘कीबोर्ड’ वापरण्याची गरज नसते. आपल्या सवयीचा कीबोर्ड तयार करण्याची सोय ‘एसगांगल’ फॉण्ट मध्ये आहे. उदा. आपल्याला ‘ए’या की वर ‘अ’, ‘बी’ या की वर ‘ब’ किंवा अजून काही अपेक्षित असेल तर त्याप्रमाणे कीबोर्ड तयार करता येणे शक्य असल्याचे गांगल यांनी स्पष्ट केले आहे.
गांगल यांनी नव्याने तयार केलेले ‘गांगल’ आणि ‘गांगलआर’ हे दोन फॉण्ट संगणकीय मराठीतील मोठा दुवा ठरणार आहे. यापैकी ‘गांगल’ या फॉण्टमध्ये मराठी मजकूर टाईप करून तो मजकूर आपण सिलेक्ट करून त्याला ‘गांगलआर’ या फॉण्ट मध्ये रुपांतर केल्यास तो इंग्रजी होतो. उदा. आपण ‘बॉल’ हा शब्द ‘गांगल’मध्ये टाइप केला नंतर तो शब्द ‘गांगलआर’मध्ये रुपांतरीत केल्यास तो शब्द kballl असा दिसतो. याद्वारे गांगल यांनी ‘लिप्यांतरणाचे’ नवे रुप सर्वासमोर ठेवले आहे. याद्वारे त्यांनी ‘मराठी रोमन’ ही नवी संकल्पना रुजू केली आहे. येणाऱ्या काळात राज्यातील विविध बोली भाषेतील साम्य साधून त्याद्वारे नवी प्रमाणीत मराठी तयार करण्याचा ध्यास गांगल यांनी घेतला आहे. ही नवी प्रमाणीत मराठी त्यांच्या ‘गांगलजी’ या नव्या फॉण्टमधून आपल्याला पाहावयास मिळणार आहे. राज्याला फुकटात मराठी फॉण्ट अर्पण करणारे गांगल हे र्मचट नेव्हीमध्ये सेवेत होते. त्याकाळातील त्यांनी जमावलेली सर्व पुंजी ते संगणकीय जगतात मराठी श्वास टिकविण्यासाठी खर्च करीत आहेत. गांगल यांचे तिन्ही फॉण्ट त्यांचे विचार, त्यांची भूमिका आपल्याला त्यांच्या http://shubhanangangal.wetpaint.com/ या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शासनाने युनिकोड आणून मराठीला संगणकाच्या अंतर्भागात जागा मिळवून दिली खरी. पण याची खरी कसोटी लागणार आहे ती जेव्हा अ‍ॅप्लिकेशन्स् बदलतात तेव्हा. म्हणजे विंडोज-९५ची जागा विंडोज-९७ ने घेतली. अशाप्रकारे अ‍ॅप्लिकेशनस् बदलत जातात. आता एक्सपी आणि विस्टा बाजारात आहेत पण येण्याऱ्या काळात हे अ‍ॅप्लिकेशन पुन्हा अपडेट होईल आणि पुन्हा एकदा युनिकोडच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. तसेच युनिकोडसाठी केंद्र सरकारने भरपूर पैसे मायक्रोसॉफ्टला दिले आहेत. नव्या अ‍ॅप्लिकेशनसाठी पुन्हा नव्याने पैसा खर्च करावा लागेल आणि तेवढाच खटाटोप करावा लागणार आहे. अशावेळी पूर्णत: मोफत असणारा भारतीय बनावटीचा मराठीशी आपलेपण जपणारा फॉण्ट शासनाने का मान्य करू नये असा सवाल गांगल यांनी केला आहे. थोडक्यात संगणकीय मराठीचे प्रमाणीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नीरज पंडित
nirajpandit@in.com