Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

हिमोफिलिया - राजवंशीय आनुवंशिकता
हिमोफिलिया ही एक आनुवंशिक जनुकीय व्याधी असून ज्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया (रक्तक्लथन) होण्याच्या क्षमतेला बाधा असते. आपल्या रक्तद्रावात फायब्रिनोजेन नावाचे ग्लोब्युलिन (प्रथिन) असते. त्याच्यावर होणाऱ्या कॅल्शिअम आयनांच्या उत्प्रेरण कार्यामुळे त्याचे फायब्रिनात रूपांतर होते. फायब्रिन हे तंतूमय असते. अशा प्रकारे फायब्रिनची निर्मिती म्हणजे रक्तक्लथन प्रक्रियेची पूर्णता होय. या रक्तक्लथनासाठी आवश्यक असे निरनिराळ्या प्रकारचे रक्तक्लथनकारक (clotting factors) आपल्या शरीरात असतात. यामुळे एखादी जखम झाल्यास किंवा कापल्यास तेथे रक्त गोठते व वाहून जात नाही.

संगणकीय मराठीच्या प्रमाणिकरणाची आवश्यकता
संगणकावर मराठीचा वापर कसा केला जातो याबाबत अनेक वेळा चर्चा होते, अनेकांना आजही या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मध्यतंरीच्या काळात मायक्रोसॉफ्टच्या ‘युनिकोड’ने या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, पण भाषेची गरज पूर्ण भागविण्यात हा फॉण्टही अपुराच ठरला, असे काही जणांचे म्हणणे असून त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. युनिकोड पूर्वी किंवा आजही अनेक कंपन्यांनी मराठीचे विविध फॉण्टस् तयार केले आहेत, पण ते वापरण्यासाठी विविध तांत्रिक मर्यादा पाळाव्या लागतात. म्हणजे ते वापरण्यासाठी त्या फॉण्टला आवश्यक असे सॉफ्टवेअर आपल्या संगणकात असणे आवश्यक आहे. ते नसल्यास आपल्याला ते नव्याने लोड करून घ्यावे लागते. अशा अनेक अडचणी आपल्यासमोर असतात. आपण मराठीत अमुक एका फॉण्टमध्ये तयार केलेला मजकूर दुसऱ्या संगणकावर वाचण्यासाठी त्या संगणकामध्येही तो फॉण्ट असणे गरजेचे आहे. म्हणजेच पुन्हा त्या संगणकावर आपल्याला तो फॉण्ट आणि त्याला आवश्यक असे सॉफ्टवेअर लोड करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शुभानन गांगल यांनी ‘एसगांगल’ या फॉण्टची निर्मिती केली आहे. हा फॉण्ट आपल्याला कोठेही सहज लोड करता येऊन त्याचा वापर करू शकतो. गांगल यांच्या मते आजपर्यंत उपलब्ध असलेले मराठी फॉण्ट मराठी भाषेशी साधम्र्य साधणारे नाहीत.

लेह-लडाख येथे ‘रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन सोहळा’ जवानांना देणार पुस्तकांची भेट
द्रास, कारगिल, बटालिक, तोलोलिंग टेकडय़ा ही नावे पाकिस्तानने आपल्या देशावर कारगिल युद्ध लादल्यामुळेच सर्वसामान्यांना माहीत झाली. हा सर्वच सीमाभाग खूप खडतर, पण त्याहीपुढे थेट सियाचीनपर्यंत ज्या ठिकाणी आपले सैनिक प्राणाची बाजी लावून विषम हवामानात देशाचे पर्यायाने तुम्हा-आम्हा सर्वाचे रक्षण करण्यास सिद्ध असतात. त्यांच्या या ऋणाची जाणीव ठेवून गेली ८ वर्ष आत्माराम परब रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन साजरे करतात. तिकडे खुद्द लडाखला जवानांच्या सहवासात, या वर्षीही रक्षाबंधनाचा हृद्य सोहळा लडाखला जवानांना राखी बांधून साजरा होणार आहे. तसेच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी लडाखच्या स्वातंत्र्यदिन उत्सवात सहभागी होण्याची तसेच लडाखचे अद्भुत सौंदर्य ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याची संधी आपणास प्राप्त होणार आहे. रक्षाबंधनासाठी ३१ जुलै ते ७ ऑगस्ट आणि स्वातंत्र्यदिन उत्सवासाठी १२ ते १९ ऑगस्ट या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी जवानांना दरवर्षीप्रमाणेच पुस्तकरुपी भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. (मराठी पुस्तके जास्त संख्येने जमा झाल्याने आता हिंदी अथवा इंग्रजी पुस्तके द्यावी अशी विनंती आहे.) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अथवा पुस्तके भेट देण्यासाठी संपर्क : ९८९२१८२६५५, ९३२४५३१९१०, ९३२००३१९१०.
प्रतिनिधी