Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९


संसदेच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सज्ज झाला आहे. मंगळवारी संसदेच्या गॅलरीत कामकाजाची पाहणी करून क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा अंदाज घेताना अझर.

मनमोहन सिंग मंत्रिमंडळाचा शपथविधी २२ ला?
युपीएतील घटक पक्षांसोबत आज बैठक, खातेवाटपाविषयी चर्चा अपेक्षित
नवी दिल्ली, १९ मे/खास प्रतिनिधी
डॉ. मनमोहन सिंग यांची काँग्रेसपाठोपाठ युपीएच्या नेतेपदी निवडीची औपचारिकता पार पडल्यानंतर २२ मे रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. उद्या, काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करणाऱ्या युपीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मनमोहन सिंग राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटून केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी दावा करतील. येत्या २ जून रोजी पंधराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन होणार आहे.

बालेकिल्ला गेल्याने अखेर आनंद परांजपे
एकटेच गेले ‘मातोश्री’वर!
ठाणे, १९ मे / प्रतिनिधी
ठाण्याची महत्त्वाची जागा गमावल्याने हताश झालेल्या ठाण्याच्या सेना नेत्यांनी ‘मातोश्री’वर जाण्याचे टाळल्यामुळे अखेर खासदार आनंद परांजपे यांनी एकटय़ानेच मातोश्री गाठून शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेतले. शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, गजानन बाबर आदी खासदार लगेच ‘मातोश्री’ वर पोहोचले. मात्र मंगळवार उजाडला तरी, कल्याणचे खासदार आनंद परांजपे ‘मातोश्री’वर गेले नव्हते.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची कबुली
‘तिसऱ्या आघाडीचा पर्याय जनतेला विश्वासार्ह वाटला नाही’
नवी दिल्ली, १९ मे/ पीटीआय
डाव्या पक्षांच्या पुढाकारातून अस्तित्वात आलेली तिसरी आघाडी लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेला फारसा विश्वासार्ह आणि योग्य पर्याय वाटला नाही याची कबुली अखेर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिली आहे. परंतु अशी कबुली देतानांच आश्चर्याची गोष्ट ही की, डाव्या पक्षांच्या दबावतंत्राने युपीएने सुरु केलेल्या सामाजिक कल्याणाच्या योजनांनीच काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचा दावाही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले!
मुंबई, १९ मे / खास प्रतिनिधी

काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सहा ते सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला अपशकून करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहेत. कारण राष्ट्रवादीने पडद्यामागून विरोध केलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत !
नंदुरबारमध्ये राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली होती.

स्वबळावर लढण्याने काँग्रेसचा फायदा की नुकसान?
मुंबई, १९ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची मागणी काँग्रेसमध्ये जोर धरू लागली असली तरी त्यातून पक्षाला कितपत फायदा होईल याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये साशंकता आहे. राष्ट्रवादीला जागा कमी मिळाल्या असल्या तरी या पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेता राष्ट्रवादीला दुर्लक्ष करता येणार नाही.

मुंबईत मनसेची शिवसेनेवर मात; काँग्रेसला सर्वाधिक विधानसभा मतदारसंघांत आघाडी
मुंबई, १९ मे / खास प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई व ठाण्यातील ६० मतदारसंघ सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या पट्टय़ात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई व ठाण्यात २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. मुंबईत तर शिवसेनेला अवघ्या दोन मतदारसंघांमध्येच आघाडी घेता आली असतानाच मनसेने पाच मतदारसंघात आघाडी घेऊन सेनेवर मात केली आहे.

जन्मल्या ठिकाणीच राष्ट्रवादीची मृत्युघंटा
कोल्हापूर विश्लेषण
राजेंद्र जोशी
कोल्हापूर, १९ मे

सतत मतदारांना गृहीत धरले आणि निवडून येण्याची क्षमता एवढय़ा एकाच निकषावर उमेदवारी दिली तर तोंडावर पडणे कसे नशिबी येते, याचा उत्तम अनुभव सध्या दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आलेले कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत पक्षाला नामुष्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले.

सोलापूरकरांना वेध आता विकासाचे!
जयप्रकाश अभंगे/एजाजहुसेन मुजावर
सोलापूर, १९ मे
एखाद्या सामान्य, गरीब कुटुंबातील मुलगी गर्भश्रीमंताच्या घरी दिल्यानंतर जो आनंद वधूपित्यास होतो, त्याप्रमाणे सोलापूरकरांना आनंद होत आहे. कारण सोलापूर जिल्हारूपी कन्या आता शरद पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांच्यामुळे सोलापूर जिल्हय़ाचा बारामतीप्रमाणे सर्वागीण विकास होण्याची अपेक्षा आहे आणि तशी ग्वाही पवार यांनी वारंवार दिली आहे. ज्या दिवशी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारीअर्ज दाखल केला, त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला.

वरुण गांधींना उमेदवारी न देण्याचा सल्ला योग्यच होता -कुरेशी
नवी दिल्ली, १९ मे/पीटीआय

यंदाच्या लोकसभा निवडणुका ज्या पद्धतीने पार पडल्या, त्याबद्दल निवडणूक आयोगाने स्वत:ला दहापैकी नऊ गुण दिले आहेत. द्वेषमूलक व विखारी भाषणे करणारे भाजप नेते वरुण गांधी यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची जी सूचना आयोगाने भाजपला केली होती ती योग्यच होती, असे आज सांगण्यात आले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री खंडुरी राजीनामा देणार
नवी दिल्ली, १९ मे/पीटीआय

लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये भाजपला आलेल्या घोर अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या राज्याचे मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उत्तरांचलच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करायची याचा निर्णय घेण्यासाठी भाजप नेतृत्वाची लगबग सुरू आहे. मार्च २००७ पासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले बी. सी. खंडुरी हे आपला राजीनामा भाजपा अध्यक्षांकडे सुपूर्द करतील असे सांगण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व राजनाथसिंग यांच्यासमवेत सोमवारी झालेल्या बैठकीनंतर खंडुरी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उत्तराखंडमधील भाजप विधिमंडळ पक्षाची लवकरच नवा नेता निवडण्यासाठी बैठक होईल. या बैठकीसाठी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षक पाठविला जाण्याची शक्यता आहे. खंडुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी बी. एस. कोशियारी यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोशियारी हे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

गवई यांचाही काँग्रेसवर आरोप
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदारसंघात मला थोडय़ा मतांनी पराभव स्वीकारावा लागला. एका माजी केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात मी चांगली लढत दिली, मात्र काँग्रेसने मनापासून साथ दिली असती तर माझा विजय झाला असता, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी आज सांगितले. माझ्या विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची नावे आपण लवकरच सोनिया गांधी यांना सांगणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. रामदास आठवले यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आरोप केला आहे. आठवले यांचा पराभव माझ्यामुळे झाला तर मग गवई यांचा पराभव कशामुळे झाला, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे. आठवले यांच्या मतदारसंघाशी अमरावती मतदारसंघाची तुलना करणे गैर आहे, असे गवई यांनी म्हटले आहे. दुहेरी लढतीत आपण हरलो असलो तरी आपली सुरूवात चांगली झाली असून येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला किमान २५ जागा काँग्रेस आघाडीने सोडल्या नाही तर आपण सर्वच्यासर्व जागा लढणार आहोत, असेही गवई यांनी जाहीर केले आहे.