Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपळूण तालुक्यातील अनेक धनगरवाडय़ांना पाणीटंचाईचा फटका
चिपळूण, १९ मे/वार्ताहर

 

उन्हाळ्यात चिपळूण तालुक्यातील धनगरवाडय़ांना पाणीटंचाई चुकलेली नाही. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सध्या तालुक्यातील पेढांबे धनगरवाडी, निरबाडे कातकरवाडी, अडरे, पोफळी, अनारी, कुडप, तळसर, दादर, रिक्टोली, तिवडी, तिवरे, शिरगाव, डेरवण या सह्याद्रीच्या कडय़ाकपारीतील, तसेच गुढे मोरेवाडी, मार्गताम्हाने या भागातील धनगरवाडय़ांत पाणीटंचाई अद्यापही कायम आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे उलटली तरी या धनगरवाडय़ांची उन्हाळ्यातील तहान भागलेली नाही. शासन पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवनवीन योजना आखत असताना या धनगरवाडय़ा कायमच विकासापासून दूर राहिल्या आहेत. स्वतंत्र भारतात रस्ते, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधाही या धनगरवाडय़ांवर पोहचलेल्या नाहीत. धनगरवाडय़ा या मुळातच गावापासून एका बाजूला कोसभर लांब असतात. साहजिकच तेथपर्यंत कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी पोहोचत नाही. पाण्यासाठी वणवण करणारे हे धनगर बांधव एखाद्या कपारीत ओहोळ तयार करून पाण्याची व्यवस्था करतात.
मार्गताम्हाने विभागातील एका धनगरवाडीमध्ये शासनाच्या वतीने बोअरवेल मारण्यात आली, पण तिला पाणीच लागले नाही. पाण्याबरोबरच इतरही समस्या आ वासून उभ्या असतात. अलीकडे मात्र महावितरणच्या माध्यमातून धनगरवाडय़ांत सौरदीप उजळलेले दिसून येत असल्याने या वाडय़ा प्रकाशमान झाल्या आहेत. गुरेढोरे व मेंढरे पाळणारे हे धनगर सुखसोयींपासून अलिप्त आहेत. दुधाचा धंदा किंवा मजुरी करून ही जमात पोटाची खळगी भरत आहे, मात्र उन्हाळ्यात पाणी आणण्यासाठी पाच ते दहा कि.मी.चा रस्ता तुडवावा लागतो. त्यामुळे या समाजाची मोठी गैरसोय होत आहे.
पंचायत समितीच्या पाणीपुरवठा आराखडय़ात प्रत्येक वर्षी या धनगरवाडय़ांचा समावेश असतो, मात्र टंचाईमुक्त करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. समुद्रसपाटीपासून २०० ते ३०० कि.मी. उंचावर असलेल्या या धनगरवाडय़ा विकासापासून दूर आहेत. धनगरवाडय़ांत पंपाने पाणी नेणेसुद्धा शक्य नाही. विंधण विहीर किंवा विहीर खोदणे शक्य नाही. अशावेळी पावसाच्या पाण्याचा वापर करून पाणीसाठा करणे आवश्यक आहे. पंचायत समितीमार्फत दरवर्षी या धनगरवाडय़ांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो, तरीही या तीव्र टंचाईत त्यांची पाण्याची तहान भागत नाही. सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेल्या या धनगरवाडय़ांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या समाजाला कोणतेही राजकीय पाठबळ नसल्याने तेथील समाज कायमच विकासापासून वंचित राहिला आहे. परिणामी, वर्षांनुवर्षे असणारी पाणीटंचाई त्यांची तहान अपुरी ठेवत असल्याचे चित्र दिसून येत असून, या समाजाच्या मूलभूत गरजा कोण पूर्ण करणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला आहे.