Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रभूंना फटका फंद-फितुरीचा!
रत्नागिरी, १९ मे/खास प्रतिनिधी

 

देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून बहुचर्चित रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांना भाजप-सेना युतीतील फंद-फितुरीचाच फटका बसल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.
लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या या मतदारसंघामध्ये राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश आणि मावळते खासदार सुरेश प्रभू यांच्यात मुख्य लढत झाली. त्यामध्ये प्रभूंना ४७ हजार ७५० मतांनी पराभव पत्करावा लागला. मतमोजणीनंतर पुढे आलेल्या आकडेवारीतून असे स्पष्ट झाले आहे की, या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली आणि कुडाळ या दोन मतदारसंघांमध्ये मिळून त्यांनी तब्बल सुमारे ३८ हजार मतांची अिजक्य आघाडी मिळविली, तर उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी मतदारसंघांनीही सुमारे दोन ते पाच हजारांची भरच घातली. नाही म्हणायला राजापूरमधून प्रभूंना फक्त सुमारे ६०० मतांची नाममात्र आघाडी मिळाली.
या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राणे आघाडी घेणार हे निर्विवाद होते, पण जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या अशा सर्व ठिकाणी भाजप-सेना युतीची भक्कम पकड असलेला रत्नागिरी जिल्हा प्रभूंना तेवढय़ाच ताकदीने साथ देईल आणि राणेंचा विजय कठीण होऊन बसेल, अशी प्रभूंच्या समर्थकांची अटकळ होती. प्रत्यक्षात खुद्द रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातूनच राणेंना सुमारे साडेचार हजार मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघातील शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळींनी आयत्या वेळी मतदान फिरविल्यामुळे असे घडल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. यामध्ये भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचेही नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे राजापूर विधानसभा मतदारसंघातून मागील पोटनिवडणुकीत अशाच फंद-फितुरीचा बळी ठरलेले सेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भावी उमेदवार राजन साळवी यांनीही अपेक्षेनुसार अजिबात मताधिक्य मिळवून न दिल्याचे आकडेवारीतूनच स्पष्ट झाले आहे. अर्थात या सर्वांनी कसून काम केले असते तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राणेंना मिळालेली आघाडी मोडता आली असती का, हाही प्रश्नच आहे, पण चिपळूण विधानसभा मतदारसंघासारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पकडीत असलेल्या विभागातून राणेंना मिळालेले तुलनेने अल्प मताधिक्य रत्नागिरी व राजापूरमधील युतीच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर जास्तच झगझगीत प्रकाश टाकते.
युतीचे उमेदवार प्रभू यांनी केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळेच या निवडणुकीत उतरल्याची कबुली प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिली आणि तीच त्यांना पुढील प्रचारामध्ये भोवली, असा युक्तिवाद युतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रभूंनी कार्यकर्त्यांची काळजी अजिबात घेतली नाही आणि ‘मातोश्री’वरूनही पुरेशा प्रमाणात रसद पुरविली गेली नाही, अशीही तक्रार यासंदर्भात सातत्याने केली गेली आहे. त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे, पण याचा अर्थ सेनेचे मावळेही जेवढय़ा प्रमाणात रसद, तेवढय़ा प्रमाणात काम, अशा वृत्तीचे झाल्याची ती कबुली मानावी लागेल. याउलट निवडणुकीच्या सर्व प्रकारच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेल्या राणेंनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे राणेंच्या प्रचारतंत्राला प्रत्युत्तर देऊ शकणारा प्रचारप्रमुख युतीकडे नव्हता, हेही या अपयशाचे एक महत्त्वाचे कारण ठरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शेवटचे चार दिवस सिंधुदुर्गामध्ये तळ ठोकून बसले, पण तोपर्यंत राणेंना हवे तसे ‘ऑपरेशन’ पूर्ण झाले होते.
अर्थात या निवडणुकीमध्ये राणेंना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. या मतदारसंघातील १३ तालुक्यांपैकी फक्त कणकवली आणि कुडाळ नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी राहिले, पण युतीच्या नेत्यांना वश करण्यात ते यशस्वी झाल्यामुळे या दोन तालुक्यांमधून मिळालेली आघाडी उरलेल्या ११ तालुक्यांपेक्षा भारी पडली.
आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरताच मर्यादित असलेला राणेंचा वारू या निकालामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातही दौड करण्यास आतुर झाला आहे. विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तात्पुरत्या लाभांपोटी पक्षनिष्ठेला तिलांजली देणारे या जिल्ह्यातील युतीचे नेते तेव्हा अचानक त्वेषाने कसे लढणार, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर स्वाभाविकपणे नकारार्थी आल्यास सेनेचा गड मानला जाणारा कोकण प्रांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्यास वेळ लागणार नाही!