Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रायगडवाडीत भीषण पाणीटंचाई
महाड, १९ मे/वार्ताहर

 

महाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत असताना प्रशासनाकडून या समस्येची दुर्दैवाने दखल घेतली जात नाही. तालुक्यातील रायगडवाडी, टकमकवाडी, आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. गावाकरिता टँकर पाठविला जातो; परंतु चार चार दिवस टँकर येत नसल्याने डोंगर कपारीतून पाझरणाऱ्या पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे.
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी, टकमकवाडी, छत्री निझामपूर आदिवासी वाडी या भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने, गावातील आबालवृद्धांसह सर्वांना तीन किलोमीटर अंतरावरून हंडे वाहून आणावे लागतात. या गावांकरिता शासनाने टँकरने पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे; परंतु चार दिवस टँकर या भागात फिरकत नसल्याने डोंगरकपारींतून पाझरणारे पाणी शोधणे आणि त्यातील पाणी डोक्यावरून दिवसभर वाहून आणणे, हे एकमेव काम दिवसभर करावे लागते. गेल्या अनेक वर्षांंपासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आहेत, परंतु लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि लाल फितीमधला अडसर यामुळे वर्षांनुवर्षे पाण्यासाठी वणवण करावी लागते. या भागासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली; परंतु जानेवारी महिन्यापासूनच नळाचे पाणी गायब होत असल्याने या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. मुळातच हा भाग विकासापासून पूर्णपणे वंचित राहिला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य व मूलभूत सुविधाही शासनाने अद्याप पुरविल्या नाहीत. आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी १० किलो मीटरवर असलेल्या पाचाड आरोग्य केंद्रामध्ये यावे लागते. रस्ते नसल्याने दळणवळणाची सोय नाही, त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे या भागामध्ये ऐकण्यास मिळतात.
रायगडवाडी, टकमकवाडी या वसाहती शिवकालापासून असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी या परिसरात विहिरी होत्या, परंतु काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सुरुंगाचे स्फोट, मातीचे मोठय़ा प्रमाणात उत्खनन या कारणांमुळे विहिरींचे पाणी कमी झाले. गाव परिसरात पाणी नसल्याने डोंगर कपारीतून वाहणाऱ्या लहान लहान झऱ्यांचे पाणी एकत्रित केले जाते. घरातील लहान मुलांसह सर्व जण पाण्याचे हंडे वाहून नेण्यासाठी रानावनात धावत असतात. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पाण्यात विरून जातात, डोक्यावरचा हंडा आज नाही तर उद्या दूर होईल, या भाबडय़ा आशेवर तालुक्यातील जनता दिवस काढीत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळते. पाण्यासाठी शासन कोटय़वधी रुपयांचा खर्च करते. हा खर्च केलेला पैसा सामान्य जनतेच्या उपयोगासाठी खर्च झालेला नसून, पुढारी आणि अधिकारी यांनी आपला आर्थिक स्वार्थ साधण्यासाठीच वापरला, अशी चर्चा तालुक्यामध्ये करण्यात येते. शासनाने रायगडवाडी, टकमकवाडी, आदिवासीवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर नियमितपणे पाठवावा एवढीच मागणी ग्रामस्थांनी केली आहे.