Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

टँकरद्वारा गढूळ पाणीपुरवठा; हाळ बुद्रुकवासीय संतप्त
खोपोली, १९ मे/वार्ताहर

 

खोपोली नगरपालिका प्रशासनाने हाळ बुद्रुक परिसरात टँकरद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केल्यामुळे नागरिक संतप्त झाले.
भीषण पाणी टंचाई व त्यात न.पा. प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा निदर्शनास आल्यामुळे, हाळ बुद्रुकवासीयांनी नुकताच न.पा. कार्यालयावर मोर्चा नेला होता. चर्चेअंती उपनगराध्यक्ष बेबी सॅम्युअल, मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी हाळ येथील दोन विहिरींमध्ये प्रत्येकी तीन-तीन असे प्रतिदिनी सहा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू झाला, परंतु गढूळ पाण्याचा पुरवठा पाहून नागरिक संतप्त झाले. सदर वृत्त समजताच बेबी सॅम्युअल, बांधकाम सभापती महादू जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. विहिरीतील गढूळ पाणी पाहून दिलगिरी व्यक्त केली व दोन्ही विहिरींमध्ये नियमित वेळी व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिल्यामुळे नागरिक शांत झाले.
पाणी टंचाईने बीड खुर्दवासीय हैराण
खालापूर तालुक्यातील बीड खुर्द परिसरात शासनातर्फे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा पडत असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात रोज एका टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तो अपुरा पडत असल्यामुळे पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे टँकरमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच गेली २५ वर्षे प्रलंबित असलेल्या बीड-जांबरुंग, ठाकूरवाडी येथील नियोजित तलावाची उभारणी करून पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या या पाणी टंचाईचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.