Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

प्राथमिक शाळांमधील साठवण टाक्यांची दुरवस्था
महाड, १९ मे/वार्ताहर

 

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शाळांच्या प्रांगणामध्ये साठवण टाक्या बांधण्यात आल्या. आज या टाक्यांची दुरवस्था झाली असल्याने शासनाने या प्रकल्पासाठी खर्च केलेले लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेल्याचे ग्रामीण भागातील शाळांमधून दिसून येते. याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शासनाच्या सर्वशिक्षण अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी शासनाने ही विशेष योजना राज्यामध्ये राबविली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून पंचायत समिती, नगरपालिका यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत, परंतु योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचारही होत असल्याचे स्पष्टपणे आढळून येत असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये साठवण टाक्या बांधण्यात आल्या. प्रत्येक टाकीसाठी २० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली. योजनेचा हेतू चांगला असला तरी प्रशासनातील अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमताने साठवण टाकी बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. केवळ दोन वर्षांंच्या आत अनेक शाळांतील टाक्या कोसळून निकामी झाल्या आहेत. महाड तालुक्यातील आकले प्राथमिक शाळेतील साठवण टाकीचे काम सन २००७ मध्ये करण्यात आले. केवळ दोन वर्षांंच्या आत टाकी व त्याखाली करण्यात आलेले बांधकाम कोसळून पडले आहे. टाकीसाठी करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने टाकी खाली कोसळून तिचे नुकसान झाले आहे. या साठवण टाकीच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.