Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘पाटबंधाऱ्यांच्या पूर्ततेनंतर राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर’
सावंतवाडी, १९ मे/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्पांची १५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग सिंचनात आघाडीवर राहील. तसेच ४०० कोटींचा निधी पाटबंधारे प्रकल्पासाठी मिळावा, म्हणून राज्यपालांकडे प्रस्ताव दिला आहे. त्याची पूर्तता होईल, असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गात १५० इंच पाऊस कोसळतो, मात्र तरीही पाणी टंचाई जाणवते. अनेक योजना बंद पडत आहेत, त्याबद्दल राणे पत्रकारांशी बोलत होते.
सिंधुदुर्गात राज्याच्या मानाने पाणी टंचाई नाही. अनेक स्रोत बंद पडत आहेत. त्याबाबत पर्याय शोधला जात आहे, असे सांगून ते म्हणाले की, लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे पूर्ण झाल्यावर सिंचन क्षमता वाढेल. १० वर्षांपासून प्रकल्प सुरू आहेत. त्यापूर्वी पाटबंधारे प्रकल्प झाले नाहीत. अनेक प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरीनंतर आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतला, असे राणे म्हणाले.
टाळंबा प्रकल्पाचा काही भाग वन जमिनीत येतो. नांदेड येथे त्या बदल्यात पर्यायी जमीन देण्यात आली आहे. धरणाची निविदा काढण्यात आली आहे. वनजमीन प्रश्न मिटला असून, हा प्रश्न सुटेल. हा प्रकल्प ७०० कोटींचा आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५०० कोटी रुपयांची पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात दोन मोठे, एक लहान तसेच लघु, मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. राज्यातील सिंचन क्षमतेत प्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग आघाडी घेईल, असे राणे म्हणाले.
पाटबंधारे प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये मिळावेत म्हणून राज्यपालांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी मंजुरी दिल्यावर सर्व प्रकल्प मार्गी लागतील, असेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात जूनमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला. त्या बैठकीत जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. नीलेश राणे यांच्यावर जनतेने विश्वास टाकला आहे. तो सार्थ करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातील. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सभा घेऊन जल्लोष साजरा केला जाणार आहे, असे राणे म्हणाले.