Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

लोकमानस

पूर्वीसारखा महाराष्ट्र प्रगत होईल का?

 

दिल्लीच्या राजकीय सत्तेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्या त्या राज्यांवर परिणाम दिसतात. गेल्या ८ ते १० वर्षांत महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर झाली आहे. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे हे राज्य. लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास अकरा कोटी आहे (लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर), तर साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के अधिक असून महसुलापोटी जवळपास ७० हजार कोटी येतात. त्याचबरोबरीने कर्जाचा डोंगर दीड लाख हजार कोटी रुपये एवढा आहे.
या अर्थव्यवस्थेतून सर्वाधिक शहरीकरण हे महाराष्ट्रात झाले पण शहरीकरणाच्या नादात येथील औद्योगिक वसाहतीत आणि जमिनीच्या व्यवहारातून मोठमोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स, बिग बाजार, पंचतारांकित हॉटेल्स यांचे पीक आले. त्यामुळे कारखाने हद्दपार झाले. राज्यात मोठय़ा प्रमाणात बेरोजगार वाढला. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण यांचे वारे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले. महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीच्या जागेत टोलेजंग टॉवर्स व शॉिपग मॉल्सनी चेहरामोहरा पार बदलून टाकला. स्वाभाविकच महाराष्ट्रातील मूळ चाकरमान्यांनी गावचा रस्ता पकडला. पण गावातही शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कोणतीही ठोस उपाययोजना कार्यान्वित होत नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्येसुद्धा महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. विजेच्या टंचाईमुळे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र सात ते आठ वर्षे अंधाराच्या विळख्यात आहे. या कालावधीत राज्य सरकारने एका मेगाव्ॉट विजेची निर्मितीसुद्धा केलेली नाही. जवळपास दीड लाख हजार कोटींचा कर्जाचा बोजा महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे, तर महाराष्ट्राचा राज्यकारभार हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या ओव्हर ड्राफ्ट सवलतीवर चालत आहे. एका बाजूला झगमगाट आणि दुसऱ्या बाजूला दिवसादेखील काळोख अशा विचित्र परिस्थितीत महाराष्ट्र आहे.
वाढत्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची भीती अनेकांना सतावत आहे. कुपोषण, बालमृत्यू हा चिंतेचा विषय झाला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी वित्तीय तूट आणि त्याचबरोबरीने वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे राज्याच्या आर्थिक धोरणाबद्दल चिंतेचे वातावरण आहे. देशातील सर्वाधिक मोठी धरणे महाराष्ट्रात असूनसुद्धा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांचा विकास खुंटला आहे. एकूणच काय इतर शेजारील राज्यांच्या -गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश - तुलनेत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. या सत्य परिस्थितीवर वेळीच उपाय योजले नाहीत, तर उद्याचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अंधारात लोटला जाईल.
पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली

मानवा जागा हो..
दिवसेंदिवस पर्यावरणातील तापमान वाढत चालले आहे. वृक्षतोडीमुळे भूमी उघडी पडत चालली आहे. मात्र तरीही आपण त्याबाबत पाऊल उचलत नाही. कारण ही जबाबदारी स्वत:ची आहे, असे आपल्याला वाटतच नाही. नेहमी आपण दुसऱ्यालाच दोष देत बसतो. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे आणि याला जबाबदारही आपण स्वत:च आहोत.
विकासाच्या प्रत्येक गोष्टीचे चांगले तसेच वाईट परिणाम होतात. एकीकडे माणसाने अनेक शोध लावून जीवन सुखदायक बनविले; पण याच प्रगतीच्या अतिरेकी उपयोगाने मानवी जीवन किंबहुना जीवसृष्टी संकटात सापडली आहे. आपल्याला कुठे तरी थांबून विचार करणे आवश्यक आहे. नाही तर येणारी पिढी आपणास कधीही माफ करणार नाही. प्रत्येकाने स्वत:चे आद्य कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणे अगत्याचे आहे. तेव्हाच या वसुंधरेला आपण आपल्या मातेचा दिलेला दर्जा सार्थकी लागेल. त्यामुळे-
‘मानवा जागा हो, वृक्ष-निसर्गाचा धागा हो,
फुलांप्रमाणे सुगंध देऊ, कर्तव्यास सर्व दक्ष राहू’
सीमा मुन, अमरावती

वृद्ध मातापित्यांना काळाबरोबर बदलता आले तर..
‘आई बापाले इसरला त्याला लेक म्हणू नाही’ हे पत्र (१३-४) वाचले. परदेशी जाणाऱ्या मुलांकडून अनामत रक्कम म्हणून पाच लाख मायदेशी ठेवण्याची सक्ती करणारा कायदा मात्र जरूर करावा. कारण त्यांचे वृद्ध मायबाप (परदेशी भाषेत गार्बेज) हे इथले ओझे असते, असे विधान केले आहे. ते अतिशयोक्तीचे वाटते. परदेशी गेलेली मुले त्यांची बाजू मांडावयाला येथे नाहीत व तसेच ते विधान करताना अशा किती मुलांच्या व त्यांच्या पालकांची मते जाणून घेतली आहेत याबद्दल शंका वाटते.
वृद्धांच्या अडचणीवर मात फक्त कायदा करून होईल असे नाही. यासाठी समाजातील सर्व घटकांचे प्रयत्न हवेत. त्यात वृद्धही आलेच. पर्यायाने मीही त्यात आहेच. माझा मुलगा गेली १० वर्षे परदेशात आहे. ४ वर्षे तो इंग्लंडमध्ये होता व गेली ६ वर्षे तो अमेरिकेत आहे. मला सांगावयास आनंद वाटतो की, त्यांनी आम्हा उभयतांना कधीही ओझे मानलेले नाही. आमच्या सर्व बाबतीत त्याचा सहकार असतो. लग्नाआधी सहकार होता व लग्नानंतरही सहकार आहे. मला स्वत:ची पेन्शन मिळते, तसेच माझा मुलगाही योग्य अशी रक्कम मला दरमहा देतो. थोडक्यात, दुसरी पेन्शन मला मुलाकडून दरमहा मिळते. फोनवरून, ईमेलद्वारा एकमेकांशी संपर्क, अडीअडचणी, तब्येतीबद्दल विचारपूस हे आता नित्याचे झाले आहे व तो खूप लांब आहे असे आम्हाला वाटतही नाही. दरवर्षी आम्ही भेटतो. कधी तो भारतात येतो तर कधी आम्ही अमेरिकेला जातो. माझा परदेशी गेलेला मुलगा आम्हाला ‘गार्बेज’ समजत नाही. अशा मुलांची खरी बाजू कोणीतरी मांडावयास हवी म्हणून मी माझे स्वत:चे उदाहरण दिले आहे.
माझा अनुभव अपवादात्मकही नाही. मी स्वत: सामाजिक कार्य करतो व डिग्निटी फौंडेशन या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी २००४ ते २००८ या काळात मी काम केले आहे व असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात आलो आहे. त्यांच्याकडूनही मुले आम्हाला ‘गार्बेज’ समजतात अशी प्रतिक्रिया कधीही पुढे आलेली नाही.
काही वृद्ध मातापित्यांना काळाबरोबर जर बदलता आले नाही तर तो मुलगा आपल्या देशात असो किंवा परदेशात असो, ताण हा दोन्ही बाजूला येणार आहे. परस्पर संवादामधून हा ताणतणाव कमी होईल. शासनाने कायदा करून त्याची जबाबदारी उचलली आहे. वृद्धांनी आपल्या मुलांशी संवाद साधून जबाबदारी उचलावी. आपल्या मुलांशी संवाद, काळाबरोबर बदलण्याची मानसिक गरज, गरज लागल्यास सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांची मदत व नाइलाज झाला तर कायद्याचा बडगा अशा पद्धतीने मार्ग अवलंबिला तर बऱ्याचशा वृद्धांचे जीवन समृद्ध होईल.
डी. जी. आठले, कांदिवली, मुंबई

‘महालक्ष्मी’ची वेळ बदला
कोल्हापूरहून मुंबईला येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीची वेळ मुंबईकरांसाठी गैरसोयीची आहे. त्यामुळे उपनगरी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ठरलेल्या गाडीच्या वेळेतही गोंधळ होत असून रेल्वे प्रशासनाने या एक्स्प्रेस गाडीची वेळ पूर्वीसारखीच करावी. महालक्ष्मी एक्स्प्रेस ही गाडी दोन दशकांपूर्वी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास येत असे. या संदर्भात काही प्रवाशांच्या तक्रारी गेल्यावर १० वर्षांपूर्वी तिची वेळ बदलून पहाटे ५.४५ वाजण्याची करण्यात आली. ही सोयीची वेळ होती. कारण या गाडीने कोल्हापूरहून येऊन पुन्हा सकाळी कामावर जाणे शक्य होत असे. आता मात्र पुन्हा या गाडीची वेळ बदलण्यात आली असून ती ७.४५ वाजण्याच्या सुमारास दादरला येते. त्याचवेळी उपनगरी गाडीने प्रवास करणाऱ्यांची गर्दी असते. म्हणून रेल्वे प्रशासनाने या गाडीची वेळ पूर्वीसारखीच म्हणजे पहाटे ५.४५ वाजताची करावी.
उर्मिला रावराणे, चुनाभट्टी, मुंबई