Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

पतसंस्थेतील अपहारप्रकरणी चार लेखापरीक्षकांना अटक
सांगली, १९ मे / प्रतिनिधी

विटा येथील श्री शक्ती नागरी सहकारी पतसंस्थेतील सव्वातीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी जबाबदार धरून या संस्थेचे लेखापरीक्षण करणाऱ्या चार लेखापरीक्षकांना मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. लेखापरीक्षकांवर कारवाई होण्याची बहुधा ही जिल्ह्य़ातीलच पहिलीच घटना असावी.

सांगलीकरांच्या विस्मृतीत जातेय ‘कमळ’!
सांगली, १९ मे / गणेश जोशी

सांगलीत आजवर झालेल्या निवडणुकीत ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह दिसेनासे झाल्यामुळे सांगलीकर मतदार ‘कमळा’लाच विसरणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी पवार यांच्या अविवेकी व स्वकेंद्रित राजकीय धोरणामुळेच पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकला आहे.

कोल्हापूर रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा काँग्रेस समितीवर ‘हल्ला बोल’
कोल्हापूर, १९ मे / विशेष प्रतिनिधी

लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाने नाकर्तेपणाची भूमिका बजावल्यानेच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पराभव पत्करावा लागला असा ठपका ठेवीत सोमवारी कोल्हापूरात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीवर हल्लाबोल केला. या हल्ल्यामध्ये कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीचा मुख्य दरवाजाच उचकटून काढताना काँग्रेस प्रचारप्रमुख विखे पाटील यांना शिव्यांच्या लाखोलीचा आहेर दिला.

घरपट्टीवाढीसह सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर
सांगली, १९ मे / प्रतिनिधी

घरपट्टीवाढीच्या प्रस्तावासह स्थायी समितीने सादर केलेल्या १५६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सांगली महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत मंजुरी देण्यात आली. नागरिकांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, याची दक्षता घेऊनच घरपट्टीवाढ करण्यात येईल, असे महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सांगितले. महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी फेब्रुवारी महिन्यात १३० कोटी सहा लाख ३९ हजार ३०० रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते.

डॉ. पत्की यांच्या संशोधनाची इटलीतील जागतिक परिषदेत प्रशंसा
कोल्हापूर, १९ मे / विशेष प्रतिनिधी

येथील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी स्टेम सेल्सवर केलेल्या संशोधनाची इटली येथील जागतिक परिषदेत मान्यवर तज्ज्ञांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. हे संशोधन मानवासाठी वरदान ठरणार असल्याचा अभिप्राय व्यक्त करण्यात आला असून या संशोधनाला पाठबळ उभे करण्यासाठी कोल्हापुरात जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत अमेरिका आणि कोरिया येथील तज्ज्ञांचे एक पथक जूनमध्ये कोल्हापूर भेटीवर येणार आहे.

आराम बसमधून प्रवाशाचे अर्धा किलो सोने पळविले
सोलापूर, १९ मे/प्रतिनिधी

पुणे महामार्गावर शहरानजीक कोंडी येथे हॉटेलसमोर थांबलेल्या एका आराम बसमधील प्रवाशाची अर्धा किलो सोन्याचे दागिने असलेली सुटकेस चोरटय़ांनी लांबविली. सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मुकेश हुकूमचंद कोठारी (वय ३४, रा. भुलेश्वर, मुंबई) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेची माहिती अशी कोठारी हे रात्री हैदराबाद-पुणे या आराम बसमध्ये बसून पुण्याकडे निघाले होते. शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कोंडी येथील विनायक पेट्रोल पंपावरील विनायक हॉटेलसमोर ही आराम बस अध्र्या तासासाठी थांबली होती. त्यावेळी बहुसंख्य प्रवासी बसमधून खाली उतरले होते. कोठारी यांनीही आपली सुटकेस आसनावर ठेऊन हॉटेलमध्ये गेले. तेव्हा चोरटय़ांनी संधी साधून त्यांची सुटकेस घेऊन पोबारा केला. हा चोरीचा प्रकार उघड होताच कोठारी यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. सदर अध्र्या किलो सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे पाच लाख एवढी असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार रात्री घडण्यापूर्वी दुपारी शहरातील मधला मारुती भागात अमर लॉजमध्ये उतरलेल्या सराफी व्यावसायिकाची शंभर ग्रॅम सोन्याचे बिस्किट चोरीस गेले.

पोलीस पतीने भांडणात पत्नीला विष पाजले
सोलापूर, १९ मे/प्रतिनिधी

भांडणामुळे माहेरी परत पाठवून दिलेली पत्नी पुन्हा आल्याचा राग मनात धरून पोलीस शिपाई असलेल्या पतीने पत्नीला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पोलीस मुख्यालयातील पोलीस वसाहतीत मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. सुरेखा सिद्राम गायकवाड (वय ३२, रा. शहानगर, लिमयेवाडी) असे पत्नीचे नाव असून तिला तिच्या आईने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस शिपाई सिद्राम गायकवाड याने पत्नी सुरेखा हिच्याशी पटत नसल्यामुळे तिला दोन महिन्यांपूर्वी तिच्या माहेरी लिमयेवाडीतील शहानगरात आणून सोडले होते. त्यानंतर सुरेखा ही पुन्हा पतीकडे नांदण्याच्या हेतूने सकाळी पोलीस वसाहतीत त्याच्या घरी आली. त्यांच्यात पुन्हा भांडणे सुरू झाली. त्या वेळी सिद्रामने तिला विषारी औषध पाजले.

विश्वब्राह्मण पांचाळ सोनार बटूंचा सामूहिक उपनयनविधी
सोलापूर, १९ मे/प्रतिनिधी
श्री संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळाच्यावतीने येत्या २ जून रोजी विश्वब्राह्मण पांचाळ सोनार समाजातील बटूंचा सामुदायिक उपनयननिधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विजापूर रस्त्यावरील आयटीआयच्या पाठीमागील महालक्ष्मी कल्याण मंटप येथे होणाऱ्या या उपनयनविधी सोहळ्यात सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बटूंसाठी प्रत्येकी ११११ रुपये शुल्क भरावे लागेल. इच्छूक पालकांनी आपल्या बटूंची नावे २५ मे पर्यंत संस्थेच्या विजापूर रस्त्यावरील कार्यलयात नोंदवावीत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. या सोहळ्यासाठी आतापर्यंत ५० बटूंची नोंदणी झाली आहे. उपनयनविधी सोहळ्यात एका बटूसोबत २१ नातेवाईकांना उपस्थित राहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी चंद्रकांत वेदपाठक यांच्याशी (९८२२८१८२४०) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापुरात केसांच्या समस्यांवर उद्या प्रथमच तपासणी शिबिर
सोलापूर, १९ मे/प्रतिनिधी

बाळीवेशीतील द्वारका स्किन अ‍ॅन्ड कॉस्मेटिक क्लिनिकच्या वतीने प्रथमच गुरुवारी, २१ मे रोजी मोफत केस तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात केसांची समस्या असलेल्या रुग्णांची विदेशी बनावटीच्या कॅसलाईट या संगणकीय उपकरणाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे शिबिराचे संयोजक डॉ. प्रशांत राठी व डॉ. तृप्ती राठी यांनी सांगितले.जर्मन बनावटीच्या कॅसलाईट उपकरणाद्वारे डिजिटल ट्रायकोग्राम तपासणी केली जाणार असून त्यासाठी १२०० रुपयांचा खर्च होतो. परंतु या शिबिरात पहिल्या ५० रुग्णांना या तपासणी सेवेचा मोफत लाभ मिळेल. बाळीवेशीतील मल्लिकार्जुन मंदिराजवळ द्वारका क्लिनिकमध्ये सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चालणाऱ्या शिबिरासाठी इच्छुकांनी डॉक्टरांची केवळ कन्सल्टिंग शुल्क भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.