Leading International Marathi News Daily
बुधवार, २० मे २००९

युपीए = ३२१
सपा (२३), बसपा (२१) , जनता दल सेक्युलर (३) आणि १७ अपक्षांचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा
नवी दिल्ली, १९ मे/खास प्रतिनिधी

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-युपीएने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वीच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष या उत्तर प्रदेशातील प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांसह छोटे पक्ष आणि अपक्ष खासदारांनी नव्या सरकारकडे समर्थनाचा ओघ वळविला आहे. बहुमतासाठी आवश्यक २७२ संख्याबळ गाठण्यासाठी युपीएला आणखी ११ जागांची गरज असताना सपा (२३), बसप (२१), देवेगौडांचा जनता दल सेक्युलर (३) आणि अपक्ष (१३) अशा ६० खासदारांचे बिनशर्त पाठबळ लाभल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या नव्या सरकारला एकूण ३२१ खासदारांचे समर्थन प्राप्त झाले आहे.

नव्या सरकारपुढे वाढत्या अपेक्षांचे आव्हान : सोनिया
नवी दिल्ली, १९ मे/खास प्रतिनिधी

दोनशेहून अधिक जागाजिंकून भरीव व स्पष्ट जनादेशासह केंद्रात सत्तेत परतलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी आज डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मनमोहन सिंग राज्यसभेतील नेतेही असतील. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची तर लोकसभेतील नेतेपदी प्रणव मुखर्जी यांची फेरनिवड करण्यात आली.

कोलंबो, १९ मे / पीटीआय
एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरनला लष्कराने सोमवारी ठार केले अशा बातम्या जगभरातील प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतरही त्यावर चटकन कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी पार्लमेंटमध्ये आज केलेल्या भाषणात प्रभाकरनच्या मृत्यूविषयी काहीच माहिती न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यातच एलटीटीई समर्थक तामिळ डॉट कॉम या वेबसाईटने प्रभाकरन जिवंत असून सुरक्षित असल्याचा दावा केला. सरतेशेवटी प्रभाकरनच्या मृतदेहाचे छायाचित्रच श्रीलंका लष्कराने प्रसिद्ध करून याबाबतीतला गोंधळ संपविला. श्रीलंकेतील नंदिकदल भागामध्ये वेलुपिल्लई प्रभाकरन याचा मृतदेह आढळल्याचे श्रीलंका लष्कराने म्हटले आहे.

एका दिवशी ४३३ सोडतींचा म्हाडाचा नवा विक्रम
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

तीन हजार ८६३ घरे, चार लाख ३३ हजार अर्ज, ४२ संकेतांक (कोड) आणि ४३३ सोडती एकाच दिवशी कुठलीही गडबड नाही, गोंधळ नाही. दिल्ली प्राधिकरणाच्या घर घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत आज निर्विघ्नपणे पार पडली आणि काहीचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले तर काहींना निराश होऊन परतावे लागले. आतापर्यंत म्हाडाच्या सोडतीवर टीका झाली होती. यावेळी मात्र गैरप्रकार रोखले गेले आणि दलालांचीही दक्षता विभागाचे प्रमुख जवाहर सिंग यांनी चांगलीच कोंडी केली होती.

म्हाडाचा नवा विक्रम
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

तीन हजार ८६३ घरे, चार लाख ३३ हजार अर्ज, ४२ संकेतांक (कोड) आणि ४३३ सोडती एकाच दिवशी कुठलीही गडबड नाही, गोंधळ नाही. दिल्ली प्राधिकरणाच्या घर घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत आज निर्विघ्नपणे पार पडली आणि कमालीची खबरदारी घेत संपन्न झालेल्या या सोडतीत काहीचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले तर काहींना निराश होऊन परतावे लागले. मात्र एकूणच सोडत पद्धतीबद्दल फारशी तक्रार कुणी केली नाही. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांची यादी आज म्हाडा कार्यालयात लावण्यात येणार आहे. वास्तविक ही यादी प्रत्येक सत्रानंतर म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार होती. परंतु सकाळी तासाभरात ६५ हजार लोकांनी वेबसाईटवर संपर्क साधल्यानंतर सव्‍‌र्हरच बंद पडला. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. काही वाहिन्यांच्या वेबसाईटचीही तीच गत झाली.

लाखमोलाच्या कौलामुळे अस्वस्थ सेनानेत्यांची मनसेवर टीका
मुंबई, १९ मे/ खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली प्रचंड मतांमुळे शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातूनच कधी खंजीर खुपसल्याचा तर कधी मराठी मते फोडल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी व्यक्त केली. मते फुटतात ती पाच-दहा हजार एवढीच. लाखभर मते फूटत नसतात याचे भान नैराश्यामुळे सेनेच्या प्रवक्त्यांना राहिले नसावे, असेही मत पारकर यांनी व्यक्त केले.

‘त्या’ दगडांमुळे अंबानींच्या हेलिकॉप्टरला धोका उद्भवला नसता
‘डीजीसीए’चा अहवाल
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये आढळून आलेल्या दगड-मातीमुळे हेलिकॉप्टरला कोणताही धोका उद्भवला नसता, असा निर्वाळा नागरी उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेल्या अहवालात दिला आहे. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये दगड-माती आढळून आल्यानंतर अंबानी यांच्या जीविताला धोका पोहोचविण्याच्या हेतूने ही छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले जात होते.

लिखाणातील भाषा यंत्रणेला समजत नाही
राज ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी
शासन यंत्रणेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारावर वृत्तपत्रांतून व पुस्तकांतून लिखाण केले तरीही राज्यकर्त्यांना समजत नाही. त्यासाठी ‘माझा मार्ग’ अवलंबून बघा, असा उपरोधिक सल्ला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. जहांगीर कला दालनामध्ये आज ‘निवडक चिन्ह’ या अंकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

संतप्त नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक
ठाणे, १९ मे/ प्रतिनिधी

डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल क रून कठोर शासन करण्याचा कायदा संमत झाला असताना ही ठाण्यातील कौशल्य रूग्णालयावर उपचारात हयगय केल्याचा आरोप करीत रुग्णाच्या काही नातेवाईकांनी दगडफेक करीत नासधूस करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रुग्णालयाचे नुकसान वाचले. इंदिरानगर परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख इस्माईल शेख ऊर्फ दादूभाई यांना उपचारासाठी कौशल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दाभोळ प्रकल्पातून आणखी ३०० मे.वॅ वीज उपलब्ध
मुंबई, १९ मे/प्रतिनिधी

दाभोळ वीज प्रकल्पातून आणखी ३०० मे.वॅ वीज उपलब्ध झाल्याने या प्रकल्पातून आता ९५० मे.वॅ वीज उपलब्ध होऊ लागली असून वीज भारनियमनाची समस्या आणखी कमी होण्यास हातभार लागला आहे. दाभोळमधून आतापर्यंत ६५० मे.व्ॉ वीज उपलब्ध होत होती. राज्याची कालपर्यंतची विजेची एकूण मागणी १४ हजार ५०० मे.वॅ एवढी होती तर पुरवठा ११ हजार ३०० मे.वॅ. होता. आता दाभोळमधून ३०० मे.वॅ. वीज ग्रीडमध्ये उपलब्ध झाल्याने उलटपक्षी भारनियमनाची समस्या हलकी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आसाराम लोमटे व अभिजित घोरपडे यांना दर्पण पुरस्कार
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे खास प्रतिनिधी अभिजित घोरपडे व परभणी येथील वार्ताहर आसाराम लोमटे यांना जाहीर झाला आहे.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, जांभेकर फाउंडेशन, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीय यांच्यातर्फे दर्पणकार जांभेकर यांच्या १६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी विश्वस्त रवींद्र बेडकिहाळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक’ या पुरस्कारासाठी चंद्रपूर येथील चंद्रपूर समाचारचे संपादक रामदास दिनोजी रायपुरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. पंचवीस हजार रुपये रोख व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘बीएड’साठी ७ जून रोजी सीईटी
मुंबई, १९मे / प्रतिनिधी

‘बीएड’ अभ्यासक्रमासाठी येत्या ७ जून रोजी ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) घेण्यात येणार आहे. सीईटी अर्जाच्या विक्रीला व स्वीकृतीला २ मे रोजी प्रारंभ झाला असून २७ मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी प्रत्येकी एक तासाची परीक्षा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ व दुपारी १२ ते १ या वेळेत ही परीक्षा होईल. गेल्या काही वर्षांत प्रचंड संख्येने ‘बीएड’ अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसतानाही महाविद्यालयांची संख्या मात्र वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, बीएडचे महत्त्व कमी होत असतानाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा किती विद्यार्थी बीएडसाठी प्रवेश घेणार, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी