Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

बेहिशेबी ४७ लाख निवडणुकीच्या कामासाठी एकाच कारकुनाला
तीन वर्षांत दिलेले अग्रीम कोठे गेले?
उस्मानाबाद, १९ मे/वार्ताहर
प्रशासनात निवडणूक हाताळणारे काही ‘खास कारकून’ असतात. त्यांच्यावर अधिकाऱ्यांचीही विशेष मर्जी असते. उस्मानाबाद तहसील कार्यालयात निवडणुकीचे काम पाहणारे लिपिक व्ही. एन. बोंदर यांना अधिकाऱ्यांनी लाखो रुपये अग्रीम मंजूर केले. त्या लिपिकाने नंतर तब्बल ४७ लाख ५३ हजार २३५ रुपयांचा हिशेबच दिला नाही. परिणामी ती रक्कम वसूल करण्याची सूचना लेखापरीक्षकांनी केली आहे.

विकासाची दिशा
विकसनशील देशांमध्ये ‘दारिद्य्र निर्मूलन’ ही बाब विकास कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणे अपेक्षित आहे. प्रत्येक देश-वासीयांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय देशाचा खरा विकास झाला, असे म्हणता येणार नाही. केवळ ‘जी. डी. पी.’ म्हणजे देशाचा विकास नव्हे.

लातूरमधील ‘देशमुखी’ने तारले
प्रदीप नणंदकर

लातूर मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे जयवंत आवळे अतिशय चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुनील गायकवाड यांच्यावर ७ हजार ९७५ मतांनी मात केली. साडेसात वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद भोगलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हायलाच हवा, भा. ज. प.कडून ही जागा खेचून आणायचीच, या जिद्दीने काँग्रेसने प्रारंभापासून व्यूहरचना केली होती.

‘लाल’दिव्याखाली अंधार!
आसाराम लोमटे

एका बाजूने सर्व सत्तास्थाने एकवटलेली, जोडीला मंत्रिपद आणि गावोगाव कार्यकर्त्यांच्या फौजा; शिवाय सक्रिय राजकारणाचे भागभांडवल.! तर दुसऱ्या बाजूला तब्बल वीस वर्षांचा राजकीय वनवास, कार्यकर्त्यांशी थेट संपर्काचा अभाव. लोकसभेच्या परभणी मतदारसंघामध्ये अशी लढाई झाली. या लढाईत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांना निष्प्रभ ठरविले.

पोलीस अधिकारी-शिपायास लाच घेताना लातूरमध्ये अटक
लातूर, १९ मे/वार्ताहर
गंभीर गुन्हा न नोंदवता अटक टाळावी यासाठी लाच घेताना गांधी चौक पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक विजय गायकवाड व शिपाई बालाजी जगताप यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. मारहाणीच्या प्रकरणात गंभीर गुन्हा नोंदविणार नाही व अटक करणार नाही, यासाठी पोलिसांनी सुनील क्षीरसागर याच्याकडे ८ हजार रुपयांची मागणी केली. त्याने काल तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पी. एन. सुपेकर, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आज दुपारी पोलीस ठाण्यात छापा टाकला व कारवाई केली.

बीड पालिकेसमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण
बीड, १९ मे/वार्ताहर

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आंदोलने करूनही पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषण सुरू केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली. प्रशासन या मागण्या पूर्ण करत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणास सुरुवात केली. रावसाहेब गंगाधर, गोरख साळवे, सचिन वडमारे, बंडू वडमारे, रूपकांत जोगदंड उपोषणास बसले आहेत.

आठवले यांचा पराभव झाल्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन
चाकूर, १९ मे/वार्ताहर
रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा शिर्डी मतदारसंघात पराभव झाल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन केले. श्री. आठवले यांच्या पराभवास काँग्रेस व काँग्रेसचे प्रचार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब विखेच जबाबदार आहे. रिपब्लिकन पक्षाशी युती असतानाही काँग्रेसने व विखे यांनी आठवले यांच्याशी दगाबाजी केली, असा आरोप करीत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून निषेध केला. रिपब्लिकन पक्षाचे लातूर जिल्हा सरचिटणीस मिलिंद महालिंगे, मधुकर वाघमारे, अशोक भालेराव, विश्वास महाजन, अनिल गायकवाड, ज्ञानोबा महालिंगेंसह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पत्रकात म्हटले आहे की, आठवले यांच्या पराभवाची जबाबदारी विखे यांची आहे. त्यामुळे त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे व त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.

आंदोलनाचा इशारा देताच पाणीपुरवठा सुरू
हिंगोली, १९ मे/वार्ताहर
तालुक्यातील नरसी नामदेव या गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांनी घागर मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देताच प्रशासनाला खडबडून जाग आली आणि नवीन पंप टाकून आज गावातील पाणीपुरवठा सुरू केला. नरसी नामदेव येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपंप जळाल्याने पाणीपुरवठा बंद होता. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोन विंधण विहिरी घेतल्या. त्या विहिरीतील पाणी योजनेच्या विहिरीत टाकून पाणीपुरवठा होत असे. परंतु विंधण विहिरीतील पंप अडकल्याने तो बंद पडला. गावातील २२ हातपंप कोरडे झाल्याने गावकरी पाण्यासाठी त्रस्त झाले होते.
गावकऱ्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना घागर मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देताच पंचायत समिती प्रशासनाने नवीन पंप बसवून गावातील पाणीपुरवठा आज सुरळीत केला.

केजचा तरूण पुण्यातील अपघातात ठार
बीड, १९ मे/वार्ताहर
अवजड वाहनाची धडक बसून पुण्यामध्ये केजचा तरुण जागीच ठार झाला. केज तालुक्यातील वडगाव शेरी येथील अमोल हरिभाऊ कुलकर्णी (वय २१) पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास मित्राला सोडून आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना राजा बहादूर मिल रस्त्यावर जड वाहनाने धडक दिल्याने या युवकाचा जागीच मृत्यू पावला. त्याच्याकडील वाहन चालविण्याचा परवाना आणि भ्रमणध्वनीवरून तो बीड जिल्ह्य़ातील असल्याचे स्पष्ट झाले.

विवाहितेचा पैशासाठी छळ; पतीविरुद्ध गुन्हा
बीड, १९ मे/वार्ताहर

माहेराहून पन्नास हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी वेळोवेळी करणाऱ्या पतीने अखेर पत्नीस पैशासाठी घराबाहेर हाकलून दिले. तसा गुन्हा केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लाखा (केज) येथील बबिता कदम हिने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मालमोटर घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरा व पती अनेक दिवसांपासून छळ करीत. पती किशोर किसन कदम व घरातील अन्य एकाने आपल्याला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.

डुकरांच्या मृत्यूमुळे पैठणमध्ये खळबळ
औरंगाबाद, १९ मे/प्रतिनिधी
पैठण येथे १० डुकरे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. काही दिवसांपासून स्वाईन प्लूची चर्चा असतानाच हा प्रकार समोर आला. नगर परिषदेने या डुकरांना गावाबाहेर गाढण्यात आले. डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पैठणपासून जवळच असेलल्या पंथेवाडी येथील कचऱ्याच्या ढिगाराखाली ही डुकरे आढळून आली. त्यांची संख्या १० ते १२ असावी, असे सांगण्यात येते. वाढत्या उन्हामुळे या डुकरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. उन्हाळ्यात डुकरे चिखल, गटारांमध्ये थांबतात. मात्र आता चिखलही दुरापस्त झाला असल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही राहिले नाही. म्हणूनच डुकरे मरण्याच्या घटना घडण्याचे प्रकार वाढले असल्याचे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

फोटो जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी फिरोज खान
औरंगाबाद, १९ मे/प्रतिनिधी
औरंगाबाद फोटो जर्नलिस्ट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी फिरोज खान, सचिवपदी योगेश लोंढे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत थोटे तर सहसचिवपदी अरुण तळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फोटो जर्नलिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - फिरोज खान, सचिव - योगेश लोंढे, उपाध्यक्ष - चंद्रकांत थोटे, सहसचिव - अरुण तळेकर, कोषाध्यक्ष - मनोज पराती, प्रमुख सल्लागार - नरेंद्र लोंढे, बसवराज जिबकाटे, चार्ल्स आबरी. कार्यकारिणी सदस्य हुसेन जमादार, माजीद खान, रवि खंडाळकर, शेख मुनीर, शेख फारुख, सचिन लहाणे , भीमाशंकर नावंदे, रंगनाथ पाटील, राजेश मुलकेवार, वाहेद फारुकी, राजू शेख, सुनील थोटे, अरुण आराक, सावेश जाधव, मंगेश शिंदे, नारायण भागवत आणि किशोर निकम.

राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबादकरांची चमकदार कामगिरी
औरंगाबाद, १९ मे/खास प्रतिनिधी

कांदीवली येथे झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबादमधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदविली आहे. वरिष्ठ गटात उमेश पवार (वजन गट ४८ ते ५१), रवींद्र माळी (५१ ते ५४) व सुनील जाधव (५४ ते ५७) यांनी रौप्य पदकाची कमाई केली. तर गजानन मोरेने ५७ ते ६० वजनी गटात कास्य पदक मिळविले. संकेत कदम (२५ ते २८) व ऋषिकेश महाजन (२८ ते ३०) यांनी सबज्युनियर गटात कास्य पदक प्राप्त केले. शुभम उबाळेने ४२ ते ४५ या वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले. औरंगाबाद संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, सचिव रवींद्र माळी, प्रशिक्षक अभिजीत देशमुख व कैलास शिवणकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष अविनाश कुमावत यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

लेणापूरमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
सोयगाव, १९ मे/वार्ताहर
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळ वसलेल्या लेणापूर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अजिंठा लेणीच्या माथ्याशी असलेल्या लेणापूर गावातील नागरिकांना आजही गावात पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने वाघूर नदीतील पाणी प्यावे लागत आहे. पुरातत्त्व खात्याने लेणी परिसरात ब्लास्टिंग खोदकाम करण्यास मनाई केल्यामुळे लेणापूर गावात एकही विहिर, हातपंप नाही. तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता नदीचे पाणी दैनंदिन वापरासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लेणापूरवासी हे पाणी पीत आहे. जवळ असलेल्या अजिंठा लेणीत पर्यटकाला शुद्ध पाणी मिळत आहे तर लेणापूरवासीयांना आज उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावरखेडा येथील पाणी योजनेतून पाईपलाईन करून पाणी आणले आहे. हे पाणी नदीत सोडले जाते. त्यानंतर नदीमध्ये हे पाणी जिरून जाते. त्यानंतर नागरिक नदीत झरे खोदून हंडय़ात पाणी घेऊन त्याचा वापर पिण्यासाठी करतात.

सावत्र भावास खुनाबद्दल अटक
गेवराई, १९ मे/वार्ताहर
तालुक्यातील गुंतेगाव येथील गुड्डी अर्जुन वायसे (वय ९) या मुलीचा गळा दाबून खून करणारा आरोपी शोधण्यामध्ये पोलिसांना यश आले. गुड्डीच्या सावत्र भावास खुनाच्या आरोपावरून अटक केली. गुड्डी वायसे शुक्रवारी (दि. १५) घरातून न सांगता निघून गेली. तिचा मृतदेह शनिवारी सकाळी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नाल्यात सापडला. तिच्या भावाने दिलेल्या माहितीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्या दिवशी गुड्डीचा मृतदेह आढळला. त्याच दिवशी पोलिसांना शंका आली होती. गुड्डीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले होते. गुड्डीचा मृतदेह जेथे आढळला, तेथे तंबाखूची पुडी व चोथा आढळून आला. या दिशेने तपास केल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. उमापूर पोलिसांनी गुड्डीचा सावत्र भाऊ भीमा अर्जुन वायसे यास अटक केली.

डॉ. चव्हाण, नाईक यांची अनामत रक्कमही जप्त
हिंगोली, १९ मे/वार्ताहर

हिंगोली मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण व भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार माधवराव नाईक यांना विजय तर दूरच यांच्यासह नऊ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. मतदारसंघात सेनेचे विजयी उमेदवार सुभाष वानखेडे यांना ३ लाख ४० हजार ६८, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील २ लाख ६६ हजार ४४२ तर बसपाचे डॉ. बी. डी. चव्हाण १ लाख ११ हजार ३२४, भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. माधवराव नाईक ५२ हजार ३२५ तर उर्वरित मतदान इतर ७ उमेदवारांना झाले आहे.एकूणच झालेल्या मतदानाच्या एकषष्टांश (१/६) मतदान ज्या उमेदवारांना झाले त्याच उमेदवारांची अनामत रक्कम वाचते. हा निवडणूक नियम लक्षात घेता केवळ सूर्यकांता पाटील यांची अनामत रक्कम जप्त होणार नाही. मात्र समाजाच्या मतांवर विसंबून विजयाच्या वल्गना करणाऱ्या डॉ. बी. डी. चव्हाण व अ‍ॅड. माधवराव नाईक यांना विजयासाठी लागणाऱ्या आकडेमोडीत आपली अनामत रक्कम राखता आली नाही. आता हा विषय चर्चेचा बनला आहे.

विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
बीड, १९ मे/वार्ताहर

पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. खोकरमोहा येथील अशोक उत्तमराव नागरगोजे (वय १८) आज सकाळी नऊ वाजता गावातीलच एका विहिरीवर पोहण्यासाठी मित्रांबरोबर गेला. विहिरीत उडी मारल्यावर तो कपारीत अडकला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून लोकांना जमवले, पण बराच उशीर झाला होता. त्यानंतर अशोकचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.