Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

युपीए = ३२१
सपा (२३), बसपा (२१) , जनता दल सेक्युलर (३) आणि १७ अपक्षांचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा
नवी दिल्ली, १९ मे/खास प्रतिनिधी

 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-युपीएने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वीच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष या उत्तर प्रदेशातील प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांसह छोटे पक्ष आणि अपक्ष खासदारांनी नव्या सरकारकडे समर्थनाचा ओघ वळविला आहे. बहुमतासाठी आवश्यक २७२ संख्याबळ गाठण्यासाठी युपीएला आणखी ११ जागांची गरज असताना सपा (२३), बसप (२१), देवेगौडांचा जनता दल सेक्युलर (३) आणि अपक्ष (१३) अशा ६० खासदारांचे बिनशर्त पाठबळ लाभल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या नव्या सरकारला एकूण ३२१ खासदारांचे समर्थन प्राप्त झाले आहे. या पक्षांची व खासदारांची समर्थनाची पत्रे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पोहोचल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लोकसभेत विश्वासमत सिद्ध करण्याचीही गरज पडणार नाही.
आज लखनौमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्रातील युपीए सरकारला आपल्या पक्षाच्या २१ खासदारांचे बिनशर्त समर्थन जाहीर केले. धर्मनिरपेक्ष ताकदींना मजबूत करण्यासाठी आपल्या पक्षाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मायावतींच्या विरोधात दाखल भ्रष्टाचाराच्या खटल्यांमध्ये केंद्र सरकारने अडचणीत आणू नये म्हणून मायावतींनी बिनशर्त समर्थन जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. मायावतींची ही खेळी लक्षात येताच सपाचे सरचिटणीस अमर सिंह यांनी वेळ न दवडता त्यांच्या पक्षाच्या वतीने युपीए सरकारला समर्थन जाहीर करणारे पत्र राष्ट्रपतींकडे सादर केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सपाचे समर्थन मागितले होते, असे सांगत त्यांनी काँग्रेस-युपीए सरकारला विनाअट पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांच्यापाठोपाठ कोल्हापुरचे अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र, हातकणंगले मतदारसंघातून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपण विरोधात बसणार असल्याचे स्पष्ट केले. मतदारांनी आपल्याला विरोधात बसण्यासाठी कौल दिल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.