Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

नव्या सरकारपुढे वाढत्या अपेक्षांचे आव्हान : सोनिया
नवी दिल्ली, १९ मे/खास प्रतिनिधी

 

दोनशेहून अधिक जागाजिंकून भरीव व स्पष्ट जनादेशासह केंद्रात सत्तेत परतलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी आज डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मनमोहन सिंग राज्यसभेतील नेतेही असतील. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची तर लोकसभेतील नेतेपदी प्रणव मुखर्जी यांची फेरनिवड करण्यात आली.
आज सकाळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेतेपदासाठी मनमोहन सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी मांडला आणि मनमोहन सिंग यांचे समर्थन करण्याचे संसदीय पक्षाच्या सदस्यांना आवाहन केले. मनमोहन सिंग यांची पाच वर्षांची कामगिरी स्वयंस्पष्ट आहे आणि भविष्यातही त्यांचे नेतृत्व आम्हाला हवे आहे. मनमोहन सिंग यांचे संयमी व प्रभावी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देणारे ठरले आणि देशाच्या जनतेने त्यांना पूर्ण समर्थन दिले आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. हा विजय खूप आनंदित करणारा आणि विचारशीलतेला चालना देणारा आहे, पण या विजयाबरोबर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारीही काँग्रेसवर आली आहे. जनतेला प्रामाणिक आणि सक्षम सरकारची तसेच सार्वजनिक जीवनात सभ्य वर्तनाची अपेक्षा आहे. आम्हाला त्यांची निराशा करता येणार नाही, असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.
सत्ताविरोधी रोषाच्या फॅशनेबल सिद्धांत चुकीचा ठरवून देशातील जनतेने आम्हाला प्रभावी जनादेश दिला आहे. पण हा व्यापक जनादेश देशातील जनतेच्या, विशेषत तरुणांच्या वाढत्या अपेक्षांच्या आव्हानांसह लाभला आहे. तरुण मतदारांनी काँग्रेसला मोठय़ा प्रमाणात मतदान केले आहे. अधीर स्वभाव हे तरुणांचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे नेहमीच्या गतीने चालणारे प्रशासन तरुण खपवून घेणार नाहीत. नव्या ऊर्जेनिशी सरकारने काम करावे अशी त्यांची अपेक्षा असेल, याची जाणीव पंतप्रधानांनी नवनिर्वाचित खासदारांना करून दिली. या निमित्ताने त्यांनी राहुल गांधी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. राहुल तरुण पिढीचे आदर्श ठरले आहेत, अशी प्रशस्ती मनमोहन सिंग यांनी दिली.