Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

एका दिवशी ४३३ सोडतींचा म्हाडाचा नवा विक्रम
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

 

तीन हजार ८६३ घरे, चार लाख ३३ हजार अर्ज, ४२ संकेतांक (कोड) आणि ४३३ सोडती एकाच दिवशी कुठलीही गडबड नाही, गोंधळ नाही. दिल्ली प्राधिकरणाच्या घर घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत आज निर्विघ्नपणे पार पडली आणि काहीचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले तर काहींना निराश होऊन परतावे लागले.
आतापर्यंत म्हाडाच्या सोडतीवर टीका झाली होती. यावेळी मात्र गैरप्रकार रोखले गेले आणि दलालांचीही दक्षता विभागाचे प्रमुख जवाहर सिंग यांनी चांगलीच कोंडी केली होती. लोकांच्या सोयीसाठी सभागृहाबाहेर उभारलेल्या मंडपात एक डी. गोिवद रामाराव यांच्यातेर्फे काही तरुण पोरं यशस्वी अर्जदारांना सशुल्क कायदेशीर मदत देण्यासाठी पत्रके वाटत होते. त्यांना वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पण कुठलीही कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे सिंग यांनी उपायुक्त निकेत कौशिक यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
घर मिळाले नाही म्हणून ओक्साबोक्शी रडणारे तर घर मिळाले म्हणून डोळ्यात आनंदाश्रू साठवून वार्ताहरांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे मुंबईकर असे संमिश्र दृश्य या सोडतीच्या निमित्ताने वांद्रे येथील रंगशारदा नाटय़मंदिरात अनुभवायाला मिळाले.
काल रात्री संगणकात सर्व अर्जक्रमांक भरल्यानंतर तो पहाटे दोन वाजता पोलिसांच्या ताब्यात देऊन सील करण्यात आला. आज सकाळी देखरेख समितीतील सदस्य माजी उपलोकायुक्त आर. सी. अय्यर, माहिती तंत्रज्ञान सचिव अजय भूषण पांडे व आयआयटीचे प्रा. दीपक फाटक यांनी तो ताब्यात घेतला. सकाळपासूनच रंगशारदा नाटय़ मंदिरात गर्दी केलेल्या अर्जदारांना या सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या देखरेख समितीने संगणकीय सोडत म्हणजे नेमके काय असते याची कल्पना दिली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली सोडत रात्री दहा वाजता संपली. ठरलेल्या वेळेनुसार ती सात वाजता संपणार होती. परंतु सोडतीच्या दरम्यान लोकांकडून आलेल्या सूचनांना मान दिल्याने सोडत तीनतास लांबली. या पारदर्शक संगणकीय सोडतीमागील प्रमुख सूत्रधार व म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम चॅटर्जी व मुंबई मंडळाचे सभापती अमरजितसिंग मनहास सोडत संपेपर्यंत जातीने हजर होते.
मुंबईत हक्काचे घर स्वस्तात मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हाडाकडून ती इच्छा पूर्ण होऊ शकते, याची कल्पना असलेल्या सुमारे सव्वा चार लाख लोकांच्या विश्वासाचा हा प्रश्न होता. त्यामुळे संगणकीय सोडत हे आमच्यापुढे आव्हान होते. परंतु त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे चॅटर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. म्हाडाने संपूर्ण खबरदारी घेतली असली तरी एका अर्जदाराने यशस्वी न ठरल्याने घोटाळा असल्याचा आरोप केला आणि तो चॅटर्जी यांनी ऐकला. चॅटर्जी म्हणाले की, अजून काय करायला हवे होते ते सांगा.
भारती आचरेकरांना वर्सोव्यातील घर
वर्सोव्यातील ६८६ घरांसाठी दुपारी दोनच्या सुमारास सोडत काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सभागृह खचाखच भरले होते. संगणकाकडून यशस्वी अर्जदारांची नावे जाहीर होत होती तसे संमिश्र भावना उपस्थितांतून उमटत होती. कलाकार कोटय़ासाठी अभिनेत्या भारती आचरेकर, धर्मेश व्यास, रुची हरीश भिमानी, अली खान आदींची नावे जाहीर झाली तेव्हा उपस्थितांतून एकच जल्लोष झाला. काही उत्साही पत्रकारांनी भारती आचरेकरांना फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या की, मला धक्का बसला. अली खान हा साईड आर्टिस्ट रडायचाच बाकी राहिला होता.