Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘त्या’ दगडांमुळे अंबानींच्या हेलिकॉप्टरला धोका उद्भवला नसता
‘डीजीसीए’चा अहवाल
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

 

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये आढळून आलेल्या दगड-मातीमुळे हेलिकॉप्टरला कोणताही धोका उद्भवला नसता, असा निर्वाळा नागरी उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेल्या अहवालात दिला आहे. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये दगड-माती आढळून आल्यानंतर अंबानी यांच्या जीविताला धोका पोहोचविण्याच्या हेतूने ही छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले जात होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवली गेली होती. तपासादरम्या गुन्हे अन्वेषण विभागाने डीजीसीएच्या तज्ज्ञांकडे याबाबतचे मत मागितले होते. त्याचा अहवाल नुकताच डीजीसीएने गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. त्याची माहिती देताना सहआयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, या अहवालानुसार हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत दगड- माती टाकली गेली तरी त्यामुळे हेलिकॉप्टरला कोणताच धोका उद्भवला नसता, असा निर्वाळा देण्यात आला आहे. हेलिकॉप्टर किंवा विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होत असताना जर त्यात बिघाड असेल तर कॉकपीटमधील अलार्म वाजू लागतो. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे समजून येते व तो उड्डाण रद्द करतो. त्याच्याच आधारे डीजीसीएच्या तज्ज्ञांनी अंबानी यांच्या हेलिकॉप्टरबाबतही सदर निर्वाळा दिल्याचे मारिया यांनी सांगितले. त्यामुळे ज्या दोन आरोपींना अंबानी यांच्या हेलिकॉप्टरशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे त्यांचा हेतू अंबानी यांना मारण्याचा नव्हता, तर त्यांच्या हेलिकॉप्टरशी छेडछाड करून युनियनसोबत सुरू असलेला वाद पुढे आणण्याचा होता, असे मारिया म्हणाले.
दरम्यान, अंबानी यांच्या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना गुन्हे अन्वेषण शाखेने हेलिकॉप्टरशी छेडछाड करण्याप्रकरणी गेल्या महिन्यात अटक केली होती.