Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

लिखाणातील भाषा यंत्रणेला समजत नाही
राज ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

 

शासन यंत्रणेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारावर वृत्तपत्रांतून व पुस्तकांतून लिखाण केले तरीही राज्यकर्त्यांना समजत नाही. त्यासाठी ‘माझा मार्ग’ अवलंबून बघा, असा उपरोधिक सल्ला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. जहांगीर कला दालनामध्ये आज ‘निवडक चिन्ह’ या अंकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
‘निवडक चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कलाशिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर ‘लोकसत्ता’ तसेच ‘चिन्ह’च्या माध्यमातून प्रचंड लिखाण करण्यात आल्यानंतरही राज्यकर्त्यांकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडून राज ठाकरे यांनी शासनाला लिखाणाची भाषा समजत नाही. त्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागतो. माझी मदत हवी असल्यास कधीही सांगा. तुम्हाला मी नक्की सहकार्य करेन, असे आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले. जे.जे. कला महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे. शिवाय मला कला क्षेत्राबद्दलही आकर्षण आहे. त्यामुळे या प्रश्नांत मी लक्ष घालेन, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
या कार्यक्रमासाठी राज ठाकरे येणार असल्याने प्रसिद्धीमाध्यमांनी प्रचंड गर्दी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी कालच राज ठाकरे यांच्याशी माझे सर्व संबंध संपल्याचे पत्र प्रसिद्धीमाध्यमांना पाठविले होते. त्या पाश्र्वभूमीवर राज काहीतरी बोलतील अशी प्रसिद्धीमाध्यमांची अपेक्षा होती. परंतु, राज ठाकरे यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही. शिवाय, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनाही ‘बाईट’ दिला नाही.
कलाशिक्षण क्षेत्रात चालू असलेल्या गैरप्रकारांबद्दल नाईक यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील व विद्यमान उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी कला शिक्षण क्षेत्रासाठी विघातक ठरणारे निर्णय घेतले आहेत. वळसे-पाटील यांनी आपल्याच मतदारसंघातील व्यक्ती तसेच नातेवाईकांची विविध अधिकारपदांवर वर्णी लावल्याचा त्यांनी आरोप केला. भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांचाच शासन सत्कार करते. जे.जे.मधील शिक्षकांच्या अध्र्या जागा रिक्त आहेत. राज्यभरातील अनेक कला शिक्षण संस्थांची बिकट अवस्था झाली असतानाही राज्य सरकार या समस्येकडे लक्ष देत नाहीत, असे ते म्हणाले. कला व सांस्कृतिक क्षेत्राबद्दल राजकीय इच्छाशक्ती उरली नसल्यानेच या क्षेत्रांची बिकट अवस्था झाल्याची खंत प्रसिद्ध लेखक संजय पवार यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात एका तरूणाचा आगाऊपणा
राज ठाकरे भाषण करण्यासाठी उभे राहिले असताना एक तरूण ‘कम ऑन रियल आर्टिस्ट’ असे मोठय़ाने ओरडला. राज यांना तो काय म्हणतोय ते ऐकायला गेले नाही. त्यामुळे त्याने पुन्हापुन्हा ‘रियल आर्टिस्ट’, ‘रियल कार्टूनिस्ट’ असे ओरडणे चालूच ठेवले. सुरुवातीला त्याची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया श्रोत्यांनी सहजपणे घेतली. पण त्याचे ओरडणे चालूच राहिल्याने तिथे उपस्थित असलेले मनसेचे कार्यकर्ते त्याला बाहेर घेऊन गेले. बाहेरही त्याने कार्यकर्त्यांशी हुज्जत घातल्याने त्याला कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला.