Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

संतप्त नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक
ठाणे, १९ मे/ प्रतिनिधी

 

डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल क रून कठोर शासन करण्याचा कायदा संमत झाला असताना ही ठाण्यातील कौशल्य रूग्णालयावर उपचारात हयगय केल्याचा आरोप करीत रुग्णाच्या काही नातेवाईकांनी दगडफेक करीत नासधूस करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रुग्णालयाचे नुकसान वाचले.
इंदिरानगर परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख इस्माईल शेख ऊर्फ दादूभाई यांना उपचारासाठी कौशल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. इस्माईल शेख यांना मधुमेहाचा आजार असून त्यांच्या किडन्या निकामी झाल्याने ते डायलिसीसवर होते. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याना कौशल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डायलिसीसनंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बाहेर जमलेल्या नातेवाईकांनी उपचारात हयगय केल्याचा आरोप करीत डॉक्टरांशी वादावादी सुरू केली. संतप्त जमावाने दगडफेक करून रुग्णालयाच्या तळमजल्यावरील खिडकीच्या काचा फोडल्या. हा प्रकार घडेपर्यंत रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन नासधूस करणाऱ्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. शेख यांच्यावर रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू होते, असा खुलासा डॉक्टरांनी केला. रात्री उशीरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. रूग्णालयाची नासधूस करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस सहआयुक्त एम. तडवी यांनी दिले.