Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

लाखमोलाच्या कौलामुळे अस्वस्थ सेनानेत्यांची मनसेवर टीका
मुंबई, १९ मे/ खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली प्रचंड मतांमुळे शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातूनच कधी खंजीर खुपसल्याचा तर कधी मराठी मते फोडल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी व्यक्त केली. मते फुटतात ती पाच-दहा हजार एवढीच. लाखभर मते फूटत नसतात याचे भान नैराश्यामुळे सेनेच्या प्रवक्त्यांना राहिले नसावे, असेही मत पारकर यांनी व्यक्त केले.
मनसेने लोकसभा निवडणुकीत १२ जागा लढविल्या असून साडेपंधरा लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. मनसेला मिळालेल्या मतांमुळे शिवसेना-भाजपच्या १० जागा पडल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना नेत्यांनी मराठी मतांमध्ये मनसेने फूट पाडल्याचा तसेच मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपल्याचा आरोप करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी मनसेमुळे मराठी मतांमध्ये फूट पडल्याचा जोरदार आरोप केला आहे. या आरोपांचा ठामपणे इन्कार करताना मनसेचे शिरीष पारकर म्हणाले की, २००४ साली मुंबईत मोहन रावले वगळता सेना-भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. त्यावेळी मनसे अस्तित्वातही नव्हती. त्यावेळी मराठी मतदार कोठे गेले होते व शिवसेनेचा पराभव का झाला होता, असा सवाल करत मनसेला नवमतदारांनी मोठय़ा प्रमाणात मते दिल्याचे पारकर यांनी सांगितले.
सत्तेसाठी कधी शरद पवार यांच्याबरोबर चुंबाचुंबी करायची तर कधी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी उत्तर प्रदेश दिन साजरा करण्याची योजना आखायची असे उद्योग सेना नेत्यांनी केल्यामुळेच मराठी माणसाचा विश्वास त्यांनी गमावला आहे. मनसेला लोकांनी भरभरून मते दिल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने अनेक ठिकाणी मतदारांचे आभार मानणारे फलक लावतांना राज ठाकरे यांच्यावर टीकेचा आसूड ओढला आहे. हा सारा प्रकार नैराश्याचे प्रतिक असल्याचेही पारकर यांनी सांगितले. मनसेमुळे उत्तर मुंबईत मराठी माणूस पराभूत झाला तर उत्तर भारतीय असलेले संजय निरुपम विजयी झाल्याची टीका शिवसेनेतून होत असली तरी याच संजय निरुपम यांना यापूर्वी शिवसेनेने खासदार बनवले तेव्हा ते परप्रांतीय नव्हते का, असा सवालही पारकर यांनी उपस्थित केला आहे. कालपर्यंत मनसेच्या अस्तीत्वाची दखल घेण्यासही जे सेना नेते तयार नव्हते त्यांनाच आज मनसेमुळे मराठी मते फुटल्याचा साक्षात्कार झाला ‘हेही नसे थोडके’ अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.