Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

प्रादेशिक


कांदिवली येथे मंगळवारी पहाटे मुंबई महापालिकेच्या ‘क्लीनअप मुंबई’ मोहिमेतील डम्परने रिक्षा स्टॅंडवरील रिक्षांना धडक दिली. त्यात २२ रिक्षांचा चेंदामेंदा झाला. महापलिकेचे डम्पर बेपर्वाईने व बेफाम वेगाने चालविले जातात व अनेकदा वाहतुकीचे नियमही तोडतात, असा लोकांचा आरोप आहे. छाया : आशीष शंकर

‘मॅट’ ने दिला पोलिसांना दिलासा
‘एसआरपी’ वाहनचालकांना बदलीनंतर हत्यारी पोलीस होण्याची सक्ती रद्द

मुंबई, १९ मे/प्रतिनिधी

राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) अनेक वर्षे वाहनचालक म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस दलात बदली झाल्यानंतर वाहनचालक म्हणून नेमणूक न देता तेथे त्यांना किमान पाच वर्षे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून काम करायला लावण्याचा सरकारचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने चुकीचा ठरवून रद्द केला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर उद्धवही बरसले ‘एमएमआरडीए’वर
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

मुंबईतील ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएसआरडीसी’च्या अपुऱ्या कामांमुळे मुंबई जलमय होण्याचा धोका आहे, असा आरोप आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला.
अर्थात असे असले तरी मुंबई महानगरपालिका आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणार नाही, असेही ते म्हणाले. आज उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घोळ ?
विद्यार्थ्यांचे पेपर अचानक काढून घेतले

मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

सकाळी १०ची वेळ. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका सोडविण्यात मग्न आहेत. पावणेअकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा बराचसा पेपर सोडवून झालेला असतो. अचानक कुठून तरी माशी शिंकते आणि शिक्षक पेपर परत घेण्यास सुरूवात करतात. विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही. शिक्षकांना विचारले असता, अध्र्या तासात पुन्हा पेपर सुरू होईल, एवढेच उत्तर मिळते.. हा अजब प्रकार आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने आज मुंबईत विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील अव्यवस्थेचा.

पुनर्मूल्यांकन केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन हजाराचा दंड
विद्यापीठाच्या भूमिकेविरोधात अधिसभा सदस्य संतप्त
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी
परीक्षेला बसण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश अर्ज भरला नाही तर अशा विद्यार्थ्यांकडून दोन हजार रूपये दंड आकारण्याचा नियम मुंबई विद्यापीठाने केला आहे. परंतु, गत परीक्षेतील काही विषयांचे पुनर्मूल्यांकन होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडूनही परीक्षा अर्ज भरताना हा भरमसाठ दंड आकारण्यात येत आहे. वस्तुत: पुनर्मूल्यांकन करण्यास विद्यापीठाकडूनच कमालीचा उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना निष्कारण दंड भरावा लागत असल्याची तक्रार अधिसभा सदस्य दिलीप करंडे यांनी केली आहे.

शिक्षणसेवकांची सीईटी खोळंबली
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जेमतेम पंधरा दिवस उरले असतानाही विविध शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाने कोणत्याच हालचाली सुरू केलेल्या नाहीत. या रिक्त पदांवर शिक्षणसेवकांची भरती घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सीईटीची अधिसूचनाही अद्याप जारी झालेली नाही. यंदा सुमारे १० ते १२ हजार शिक्षणसेवकांची पदे भरावयाची आहेत. तर गेल्या वर्षांतील काही पदे अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे दोन्ही वर्षांतील सुमारे १५ ते २० हजार पदे भरणे आवश्यक आहे. यंदाची पदे भरण्यासाठी सीईटी घेण्याबाबत प्रस्ताव तयार आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्षणमंत्र्यांची स्वाक्षरी झाली नसल्याने सीईटीचा अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यात डीएड अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सीईटी देण्यासाठी सुमारे एक लाख विद्यार्थी इच्छुक आहेत. मात्र, सीईटीची तारीख अद्यापही जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांची रिक्त पदे त्यापूर्वीच भरणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सहा महिने तरी ही पदे भरणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होणार आहे.

एमएमआरडीए-पीडब्ल्यूडीकडून पूर्व द्रुतगती महामार्गाची पाहणी
मुंबई, १९ मे / प्रतिनिधी

गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या पूर्व द्रूतगती महामार्गाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) संयुक्त पथकाने पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच एमएमआरडीएला सादर करण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर सायन ते मुलुंडदरम्यान फिरून या संयुक्त पथकाने पाहणी केली. पावसाळ्यात अपघातप्रवण ठरू शकणाऱ्या संभाव्य ठिकाणांचा या पथकाने आढावा घेतला. त्याचा अहवाल लवकरच एमएमआरडीएला सादर केला जाईल व त्याआधारे अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पूर्व द्रुतगती महामार्गावर सदोष पृष्ठभागामुळे घाटकोपर ते मुलुंड या पट्टय़ात अनेक वाहनांना अपघात झाले होते. परिणामी एमएमआरडीएला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर सावधगिरीची उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

गोविंदराव शिंदे यांचे निधन
पनवेल, १९ मे / प्रतिनिधी

ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव शिंदे यांचे शांतीवन येथे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. नेरे येथील शांतीवनमध्ये कुष्ठरोग निवारण आणि निसगरेपचार या सामाजिक कार्यात शिंदे यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. कुष्ठरोग निवारण समितीचे विश्वस्तपद सांभाळाताना त्यांनी अनेक वंचितांना जगण्याची उभारी दिली. गेले काही महिने हाडांच्या कर्करोग झाल्यानंतर शिंदे लोधीवली येथील अंबानी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी शांतीवनात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ते शांतीवन येथे वास्तव्यास आले. परंतु, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.मंगळवारी सकाळी पनवेलमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार विवेक पाटील, नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.