Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९


मेरा नंबर लग गया..
प्रतिनिधी

व्यंकटराव सांगवे गेली चाळीस वर्षे माटुंग्यातील आझादनगर झोपडपट्टीत राहत आहेत. मुंबईत स्वत:च्या हक्काचे एक घर असावे अशी त्यांची इच्छा होती. या आधी दोन वेळा त्यांनी म्हाडामध्ये अर्ज केले होते. पण त्यावेळी त्यांना नशीबाने साथ दिली नव्हती. मंगळवारी निघालेल्या लॉटरीत मात्र त्यांना एक सोडून दोन घरे मिळाली आहेत. अर्थात त्यापैकी एक घर त्यांना म्हाडाला परत करावे लागणार आहे. परंतु इमारतीत राहण्याचे त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे..
त्यांनी सांगितले की, घरांसाठी अनामत रक्कम भरायचीही त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती.

संकेतस्थळ न उघडल्यामुळे अर्जदार हवालदिल
प्रतिनिधी

म्हाडाच्या संकेतस्थळावर निकाल कळणार होता. प्रत्येक सत्र संपल्यानंतर विजेत्या अर्जदारांचे क्रमांक म्हाडाच्या संकेतस्ळावर टाकण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र सकाळपासून म्हाडाचे संकेतस्थळ सुरूच होत नव्हते. काहीजणांच्या संगणकावर म्हाडाच्या संकेतस्थळाचे ‘होमपेज’ उघडले पण पुढील निकाल समजायचा मात्र काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे कार्यालयांत किंवा घरच्या संगणकावरून निकाल जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.

आयटी शिक्षणाचा सर्वोत्तम पर्याय-सी-डॅक!
प्रतिनिधी

सध्या सुरु असलेल्या मंदीचा जबर फटका माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला बसला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आऊटसोर्सिगविषयीचे नवे धोरण या क्षेत्रावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे रोज हजारोंच्या संख्येत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या क्षेत्रात सध्या रोजगारासाठी सर्वाना झटावे लागत आहे. अशा परिस्थितीत आयटीकडे जायचे की नाही या विवंचनेत सर्व विद्यार्थी आणि पालक आहेत.
विद्यानिधीचे काही प्रकल्प
आयटीमुळे प्रत्येक घरात संगणक हा अविभाज्य घटक बनला आहे. यामुळे परदेशस्थित मुलांशी गप्प मारणाऱ्यासाठी अनेक जेष्ठ नागरिकांना इंटनेट, वेबकॅम अशा गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना हे शिकविणारे कुणीही नसते. यामुळे त्यांचा मनात अनेकदा न्यूनगंड निर्माण होतो. अशा जेष्ठ नागरिकांसाठी विशेष प्रशिक्षण या संस्थेमध्ये देण्यात येते. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर संगणकाचा दैनंदिन जीवनात वापर करण्या इतपतचे ज्ञान या ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच होते. शिवाय लहान मुलांना शाळेमध्ये आवश्यक असे संगणक प्रशिक्षण उपलब्ध होत नाही म्हणून या संस्थेतर्फे सुटीच्या कालावधीत खास लहानमुलांसाठी विशेष संगणकीय अभ्यासक्रम शिकविला जातो. यात विद्यार्थ्यांना स्वत: संगणकाच्या माध्यमातून गोष्ट सांगणे आदी उपक्रमही घेतले जातात. शिवाय पाचवीच्या पुढील ज्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रकल्प करण्यास सांगतात अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण विद्यानीधी देत असते.

आपत्कालीन व्यवस्थापन : डागडुजीवरच कोटय़वधीचा खर्च!
बंधुराज लोणे

अतिवृष्टीच्या काळात मुंबईकरांना सूचना देण्यासाठी पालिका मुख्यालयात अहोरात्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो. मात्र आता प्रत्येक विभाग कार्यालयात असा नियंत्रण कक्ष सुरू करण्याची पालिकेची योजना आहे. त्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाची मोठय़ा प्रमाणावर डागडुजी करण्यात येणार आहे. पावसाळा तोंडावर आला असताना डागडमुजीवरच काही कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

संगणकीय अज्ञानामुळे शिक्षणाधिकाऱ्यांची पंचाईत
प्रतिनिधी

मुंबईतील अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा चंग शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बांधला आहे. शिक्षण क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी स्तुत्य प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्या या आधुनिकीकरणाच्या प्रयोगामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच फरफट होत आहे. वर्षांनुवर्षे पेन आणि कागद यांचाच वापर करण्याची सवय असलेल्या या अधिकाऱ्यांना टायपिंगची कामेही लिपीकाकडूनच करून घ्यायची सवय आहे. शिक्षण विभागाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना फायलींच्या ढिगाऱ्यात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र ‘ऑनलाइन’ची ही भानगड अधिकाऱ्यांच्या डोक्यावरून जाऊ लागली आहे. ई-मेलसाठीही कधी इंटरनेटचा वापर न केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या शिक्षण विभागात अधिक आहे. ऑनलाइन प्रवेश, सॉफ्टवेअर, सव्‍‌र्हर असे चित्र-विचित्र शब्द केवळ ऐकून असलेल्या अधिकाऱ्यांना या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करण्याची वेळ आल्यामुळे त्यांचे डोकेच हँग होण्याची वेळ आली आहे. फायलींमधील कामे अत्यंत चतुरपणे करणारे हे अधिकारी हतबुद्ध होऊन ‘ऑनलाइन’चा चमत्कार केवळ पाहण्याचेच काम करीत आहेत. या अधिकाऱ्यांचा भरोसा आता ‘एमकेसीएल’वरच आहे. ‘एमकेसीएल’ चांगली कंपनी
आहे, त्यामुळे अकरावीचे प्रवेश कोणत्याही गोंधळाशिवाय पार पडतील, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनंतर आता पुढील काळात शिक्षण विभागामध्ये संगणकीकरण करण्याचा विचार शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मात्र फायलींच्या संस्कृतीमध्ये गुरफटलेल्या अधिकाऱ्यांना माहिती-तंत्रज्ञान युगात आणण्याचे आव्हान शिक्षणमंत्र्यांना पेलवणार का हा कळीचा प्रश्न बनला आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी घेणार हॅम रेडिओची मदत
प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेषत: पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीच्या मुकाबल्यासाठी पालिका क्षेत्रात हॅम रेडिओची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे, तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्तीच्या मुकाबल्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त व्यंकटेश भट यांनी दिली. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. त्यानुसार शहरात ८५३ धोकादायक इमारती असून, त्यापैकी ४४ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारती २५ मेपर्यंत रिकाम्या करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सर्वच संपर्क यंत्रणा कोलमडून पडतात. अशा परिस्थितीत त्वरित संपर्क साधता यावा, यासाठी सर्व प्रभाग समित्या, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, आयुक्त आदींच्या कार्यालयात ‘हॅम’ रेडिओ यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्याद्वारे कोठेही सहज संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे जिथे मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही, तेथेही ही यंत्रणा उपयोगी ठरते. पावसाळापूर्व तयारी म्हणून रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, संक्रमण शिबिरांची तयारी, रुग्णालयीन व्यवस्था याबाबत युद्धपातळीवर तयारी केली जात असून, आतापर्यंत केवळ आठ टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता धोकादायक इमारती खाली करा, नालेसफाईची कामे पूर्ण करा, असे आदेशही जंत्रे यांनी दिले आहेत.

‘प्रात:स्वर'मध्ये रविवारी उदय भवाळकर यांची मैफल
प्रतिनिधी

पंचम निषाद या संस्थेच्या ‘प्रात:स्वर' मालिकेत रविवारी २४ मे रोजी सकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्रनाथ नाटय़गृहाशेजारील कला अकादमीच्या खुल्या प्रांगणात सुप्रसिद्ध धृपद गायक उदय भवाळकर यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. पखवाजवर सागर गोसावी त्यांना साथ देणार आहेत. शास्त्रीय संगीताची आराधना करणाऱ्या ज्येष्ठ तसेच नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पंचम-निषादने ‘प्रात:स्वर' उपक्र म सुरू केला आहे. डागर घराण्यातील उदय भवाळकर गेली १२ वर्षे उस्ताद झिया फरीउद्दीन आणि उस्ताद झिया मोहिमुद्दीन यांच्याकडे गुरूकुल पद्धतीचे शिक्षण घेत आहेत. देश-विदेशात विविध ठिकाणी त्यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफली रंगविल्या आहेत. रविवारच्या मैफलीस रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. संपर्क-रवींद्र नाटय़मंदिर-२४३१२९५६, पंचम निषाद-२४१८८४९४.

‘इस्त्रायलमधील महाराष्ट्र' पुस्तक प्रकाशित
प्रतिनिधी

कॅनडास्थित प्रख्यात उद्योजक डॉ. विजय ढवळे यांच्या ‘इस्त्रायलमधील महाराष्ट्र ' या पुस्तकाचे प्रकाशन अलिकडेच वरळी येथील एका सभागृहात आयोजित एका समारंभात पर्यटन क्षेत्रातील दिग्गज केसरीभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्वेली बुक्सने हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. माजी भारत श्री विजू पेणकर, ज्युईश फेडरेशनचे अब्राहम सॅमसन, सॉलोमन, नोएल जेकब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जगभरातील यहद्यांनी जवळजवळ दोन हजार वर्षे आपली संस्कृती टिकवून स्वत:चा देश निर्माण केला. हिब्रू भाषा जिवंत ठेवली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशीच इस्त्रायलच्या या यशाची तुलना होऊ शकेल, असे डॉ. ढवळे यांनी भाषणात सांगितले. केसरीभाऊ पाटील यांनी डॉ. ढवळेंच्या लिखाणाची स्तुती करून त्यातून इस्त्रायलविषयी खूप माहिती मिळाल्याचे सांगितले.यावेळी इस्त्रायलमधून प्रसिद्ध होणाऱ्या मायबोली नियतकालिकाच्या संपादकांकडून आलेला संदेश वाचून दाखविण्यात आला.

ई टीव्ही मराठीवरील ‘नॉर मेजवानी परिपूर्ण कीचन’चा हजारावा भाग
प्रतिनिधी

ई टीव्ही मराठीवरील ‘नॉर मेजवानी परिपूर्ण कीचन’ या रेसीपी शोचा हजारावा भाग येत्या २० मे रोजी सादर होणार आहे. महाराष्ट्रातील गृहिणींना संधी देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. कालांतराने या कार्यक्रमात बदल होत गेले. या कार्यक्रमात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वाचा मोलाचा सहभाग लाभला आहे. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, नागपूररी सावजीचे मटण, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, चौलची पोपटी भाजी असो किंवा दिल्लीतील खास रेसीपी असो या सर्वाची चव या कार्यक्रमाने चाखली आहे. एवढेच नव्हे तर अनेक आहारतज्ज्ञांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. जेष्ठ आहारतज्ज्ञ मोहसीना मुकादम या या कार्यक्रमाचे संशाधन आणि लेखन करीत आहेत. तर कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते शिवाजी-पद्मजा आहेत.

निमशास्त्रीय ‘मंगलम' नृत्याविष्कार !
प्रतिनिधी

नृत्यदिग्दर्शक एस. कार्तिक आणि सुप्रसिद्ध संगीतकार गायक त्यागराज खाडिलकर यांनी ‘मंगलम' नावाचा निमशास्त्रीय नृत्याविष्काराचा कार्यक्रम बसविला असून बुधवार २० मे रोजी रात्री आठ वाजता महाराष्ट्र कला अकादमी, पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे तो सादर केला जाणार आहे. त्यात भरतनाटय़म् नृत्य प्रकारातील शिव तांडव, पद्म, त्रिमूर्ती, कौतुकम या शास्त्रीय नृत्याबरोबरच स्प्लॅश डान्स ग्रुपची वैविध्यपूर्ण नृत्येही सादर केली जाणार आहेत. त्यागराज खाडिलकर, यांचा नुकताच प्रकाशीत झालेला ‘रॉक झटका' हा आल्बम आणि एस. कार्तिक यांच्या थायलंड फेस्टिव्हलच्या यशस्वी दौऱ्यानंतर या दोन कलावंतांनी एकत्रितपणे या अनोख्या कार्यक्रमाची आखणी केली आहे.