Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठय़पुस्तके
चौथी, आठवीच्या पुस्तकांची अद्याप छपाई नाही
नगर, १९ मे/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील इयत्ता १ली ते ८वीच्या मुला-मुलींना यंदा मोफत पाठय़पुस्तके मिळतील. ४० लाख ३७ हजार ७१९पैकी ८५ टक्के पुस्तके नगर जिल्हा परिषदेकडे आली आहेत. चौथी व आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची बालभारतीने अद्यापि छपाई केलेली नाही. सर्व शाळा यंदा १५ जूनला सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचे नियोजन जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

‘स्थायी’ निवडीबाबत महापौरांची आयुक्तांशी चर्चा
नगर, १९ मे/प्रतिनिधी

स्थायी समिती, तसेच महापालिकेतील अन्य घटनात्मक पदांच्या निवड व नियुक्तयांबाबत महापौर संग्राम जगताप यांनी आयुक्त कल्याण केळकर यांच्याशी आज चर्चा केली. मात्र, यासाठी सर्वसाधारण सभा बोलावण्याची सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची अद्याप तयारी नसल्याचे समजते. नगर सचिव एस. ए. हब्बू यांच्याशीही चर्चा करून महापौर जगताप यांनी स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीचे सदस्य, सभागृह व विरोधी पक्षनेता आदी पदांच्या निवड व नियुक्तीच्या पद्धतीची सविस्तर माहिती घेतली.

आयुक्तांवर तक्रारींचा भडिमार
शहर प्रभाग समिती बैठक
नगर, १९ मे/प्रतिनिधी
सावेडी प्रभाग समितीच्या सुखावह बैठकीनंतर महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांना आज शहर प्रभाग समितीच्या बैठकीत मात्र नगरसेवकांच्या तक्रारींचा भडीमार सहन करावा लागला. महापौर संग्राम जगताप हेही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. प्रभाग समित्यांच्या पाणीपुरवठा प्रश्नांवर होत असलेल्या बैठकांमध्ये आज शहर प्रभाग समितीची बैठक झाली. शहराच्या मध्यवस्तीतील १९ प्रभाग या समितीत येतात.

वाळूतस्करांची सभापती टेकेंना मारहाण
दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव, १९ मे/वार्ताहर
‘वाळू उचलू नका’, असे सांगितल्याचा राग आल्याने पंचायत समितीचे सभापती मच्छिंद्र सावळेराम टेके यांना, त्यांच्या भावाला, मुलाला व पुतण्याला कुऱ्हाड, कोयता व काठय़ांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली. आज सकाळी ७.३०च्या सुमारास वारी शिवारात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संत साहित्याचा लवकरच अभ्यासक्रमात समावेश - विखे
राहाता, १९ मे/वार्ताहर

संस्कारक्षम, मूल्यवर्धित आणि सुलभ शिक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचा मानस आपला असून, विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील ज्ञानाचा परिसस्पर्श व्हावा, म्हणून भविष्यात संत साहित्याचाही समावेश शालेय अभ्यासक्रमात करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

आमदार खडसे जेव्हा वाहतूक कोंडीत अडकतात..
वाहनाची काच फोडणाऱ्या मद्यपीची धुलाई
संगमनेर, १९ मे/वार्ताहर
शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीचा आज भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांना चांगलाच फटका बसला. घाईत असलेल्या खडसे यांची मोटार कोंडीत अडकल्याने अत्यंत धिम्या गतीने चालली होती. तेवढय़ात समोरून पायी आलेल्या एका तरुणाने जोरदार ठोसा लगावत त्यांच्या मोटारीची काच फोडली. खडसेंच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्याला पकडले. जमावाने त्याची यथेच्छ धुलाई केली. मात्र, यात खडसे यांचे दोन तास वाया गेले.

पूर्णवाद महोत्सवाचे उद्घाटन
विज्ञानाला अध्यात्माची जोड आवश्यक - हजारे
पारनेर, १९ मे/वार्ताहर
विज्ञानाला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा विकासाची भूलथाप देऊन विज्ञान मानवाला विनाशाकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. ५७व्या पूर्णवाद महोत्सवाचे उद्घाटन श्री. हजारे यांच्या हस्ते व राज्याच्या समृद्ध गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पूर्णवादवर्धिष्णू विष्णूमहाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी श्री. हजारे बोलत होते. महोत्सव समितीचे अध्यक्ष विष्णूशास्त्री कानेटकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

न्यू आर्टस्च्या प्राचार्यपदी डॉ. भास्कर झावरे
नगर, १९ मे/प्रतिनिधी

जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. भास्कर झावरे यांची नियुक्ती झाली. प्रभारी प्राचार्य यू. आर. ठुबे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. प्रा. डॉ. झावरे रसायनशास्त्राचे प्रपाठक व संस्थेच्या आयएमआरआरडीचे संचालक आहेत. गेली २८ वर्षे ते संस्थेत कार्यरत आहेत. १९९१मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. नगर, शेवगाव व चाळीसगाव (जि. जळगाव) येथे व्याख्याता म्हणून त्यांनी काम पाहिले. ते मूळचे पारनेर तालुक्यातील भोंद्रेगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची दखल घेत व पुणे विद्यापीठाच्या निवड समितीच्या शिफारशीनुसार संस्थेने त्यांची प्राचार्यपदी निवड केली.गतिमान व पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न व उच्च शिक्षणातील नवे बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी निर्माण करण्याचा मानस डॉ. झावरे यांनी पदाची सूत्रे स्वीकारताना व्यक्त केला.संस्थेचे अध्यक्ष विलासराव आठरे, उपाध्यक्ष रामनाथ वाघ, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव रामचंद्र दरे, खजिनदार नंदकुमार झावरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘नर्मदा परिक्रमेने अहंकार, वासना, आसक्ती नष्ट होते’
नगर, १९ मे/प्रतिनिधी
प्रेम व भक्तिशिवाय देव कळत नाही. श्रद्धेतून आध्यात्मिक अनुभूती मिळते. नर्मदा परिक्रमेच्या वेळी नर्मदा आपली आईप्रमाणे काळजी घेते, त्यावेळी ही अनुभूती होते, असे प्रतिपादन स्वामी अवधुतानंद (श्री. जगन्नाथ कुंटे) यांनी येथे केले. शनिचौकातील उदय एजन्सी व श्रीपाद ग्रंथ भांडारच्या वतीने लेखक-वाचक संवाद व्यासपीठातर्फे आयोजित ‘नर्मदा परिक्रमा’ या विषयावरील व्याख्यानात अवधूतानंद बोलत होते. सावेडीतील पटवर्धन स्मारक सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दररोज १५ ते २० किलोमीटर चालून किमान ६ महिन्यांचा कालावधी लागणारी नर्मदा परिक्रमा सलग ४ वेळा केलेल्या अवधूतानंद यांनी परिक्रमेदरम्यानचे अनेक अनुभव यावेळी कथन केले. नर्मदा परिक्रमेने वैराग्य येते. अहंकार, वासना, आसक्ती नष्ट होते. नर्मदेच्या गोटय़ाप्रमाणे आपले जीवन घडते. आपली मानसिकता बदलण्यासाठी, सर्वत्र चैतन्य मीच आहे हे समजण्यासाठी नर्मदा परिक्रमा ही साधना समजून करावी, असे त्यांनी सांगितले.

टीम एम. स्केटिंग स्पर्धेत २१९ खेळाडूंचा सहभाग
नगर, १९ मे/प्रतिनिधी

टिम एम. स्पोर्टस् अकादमीतर्फे आयोजित स्केटिंग स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पीड स्केटिंग, रिंग रेल स्केटिंग व इनलाईन स्केट या ३ प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत एकूण २१९ खेळाडूंनी भाग घेतला. जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ शेख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. टीम एम.चे अध्यक्ष बाळासाहेब विश्वासराव, सचिव मनोज करपे, प्रा. संजय धोपावकर, भगवान जगताप, श्रीकांत अराध्ये यावेळी उपस्थित होते. स्केटिंग खेळाला शहर, जिल्ह्य़ातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात नगरच्या खेळाडूंचे या खेळात उज्जवल भवितव्य असणार असल्याचे दिसते, असे शेख यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. आनंद जिमखाना, प्रोफेसर कॉलनी ते प्रेमदान चौक रस्ता येथे या स्पर्धा झाल्या.पंच म्हणून प्रशांत पाटोळे, ज्ञानेश्वर भोत, करपे, आराध्ये यांनी काम पाहिले. वय वर्षे ४, ६, ८, १०, १२, १४ या मुला-मुलींच्या गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

ख्रिस्ती साहित्य परिषदेचे रॉबर्ट निकाळजे सरचिटणीस
नगर, १९ मे/प्रतिनिधी

मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून येथील रॉबर्ट निकाळजे, तसेच रेव्ह. देवदत्त कसोटे (प्रवक्ता) व विनायक पंडित (कायदा सल्लागार) यांची निवड करण्यात आली. बाविसावे राज्यस्तरीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन वसईत नुकतेच पार पडले. डॉ. अरुण टिकेकर, रेव्ह. फादर ज्यो परेरा, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आदी या वेळी उपस्थित होते. नगरच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कमलाकर देठे यांना या वेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

रेल्वेस्थानकाजवळ बेवारस मृतदेह
नगर, १९ मे/प्रतिनिधी
नगर रेल्वेस्थानकाशेजारील रिक्षाथांब्याजवळ रेल्वे पोलिसांना बेवारस मृतदेह आढळला. याबाबत कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी रिक्षाथांब्याजवळ अंदाजे ३५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळला. अंगात रेघांचा शर्ट, पायजमा आहे. रंगाने निमगोरा, दाढी-मिशा वाढलेली आहे. या व्यक्तीविषयी माहिती असल्यास रेल्वेस्थानक पोलीस ०२४१-२५५१३७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हवालदार टी. आर. पंडित यांनी केले आहे.

मागील भांडणातूनकु ऱ्हाडीने मारहाण
नगर, १९ मे/प्रतिनिधी
मागील भांडणाच्या कारणावरून आई व मुलास कु ऱ्हाड, तलवारीने मारहाण करण्यात आली. हा प्रकार काल सायंकाळी सातच्या सुमारास नेप्ती शिवारात घडला. नगर तालुका पोलिसांनी या प्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजू किसन जाई (वय २९, रा. नेप्ती, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. जाई व आरोपींमध्ये पूर्वी घर व प्लॉटच्या जागेवरून वाद चालू होता. त्यातूनच सोमवारी सायंकाळी सात वाजता आरोपींनी जाई व त्यांच्या आईस काठय़ा, कुऱ्हाड व तलवारीने मारहाण करून जखमी केले.पोलिसांनी नंदू फकिरा जाधव, बंडू फकिरा जाधव, चंदर फकिरा जाधव, साहेबराव फकिरा जाधव, फकिरा देवजी जाधव, यमुना फकिरा जाधव, मनीषा साहेबराव जाधव यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला. तपास हवालदार बिरंगा करीत आहेत.

‘अभाविप’तर्फे दि. २९पासून ‘व्हिजन २००९’ शिबिर
नगर, १९ मे/प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नगर शाखेतर्फे २९, ३० व ३१ मे रोजी व्हीजन २००९ व्यक्तिमत्त्व विकास व श्रमानुभव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिबिरप्रमुख योगेश घोडके यांनी दिली. सावेडीतील ज्ञानसंपदा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणाऱ्या या निवासी शिबिरात विविध विषयांवरील चर्चासत्र, योगासन, शारीरिक, बौद्धिक खेळ, मशाल सत्र, वेळेचे नियोजन, संवाद कौशल्य आदी संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. शिबिराचे शुल्क ५० रुपये आहे. प्रा. शेळके (मोबाईल ९३२६६६३३९२), राजेश्वर श्रीराम (९९२२५७२७३७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विनाअपघात सेवा देणाऱ्या २०१ एसटीचालकांना बक्षीस
नगर, १९ मे/प्रतिनिधी

अपघातविरहित सेवा देणाऱ्या जिल्ह्य़ातील २०१ बसचालकांना एसटी महामंडळाच्या वतीने रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रवाशांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी महामंडळातर्फे वर्षभरात २६० दिवस विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना ५०० रुपये व १ वर्षांंपेक्षा अधिक दिवस विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांना ३०० रुपये रोख बक्षीस देण्यात येते. त्यानुसार या २०१चालकांना ८७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. जिल्ह्य़ातील आगारांमध्ये हा सत्कार सोहळा झाला, अशी माहिती विभाग नियंत्रक जे. एम. उदमले यांनी दिली.

सारडा महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे काम सुरू
नगर, १९ मे/प्रतिनिधी

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या कामाचा प्रारंभ श्री. मामासाहेब हतवळणे यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर दसरे यांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने या वसतिगृहासाठी ४१ लाखांचे अनुदान दिले आहे. एकूण १ हजार ९०० चौरस फुटांचे बांधकाम असणाऱ्या या वसतिगृहाचे काम ९ महिन्यांत पूर्ण होईल. वसतिगृहात ७० मुलींच्या निवासाची व्यवस्था होणार आहे, अशी माहिती दसरे यांनी दिली.प्रा. विश्वनाथ लाहोटी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अरविंद गोरेगावकर यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव अविनाश आपटे, प्रा. शिरीष मोडक, श्यामसुंदर सारडा आदी या वेळी उपस्थित होते.

‘कृषी अदालत’ला देसवंडीत प्रतिसाद
राहुरी, १९ मे/वार्ताहर
कृषी दिंडीतील कृषी अदालत या कार्यक्रमास देसवंडी येथे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कृषी दिंडीचे स्वागत करण्यात आले. कृषी सहायक संजय मेहेत्रे यांच्या संकल्पनेतून कृषी अदालतचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आनंद सोळुंके, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड, सरपंच मुक्ताबाई पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी संघटक सुभाष पवार, मच्छिंद्र शिरसाठ, गणेश शिरसाठ, मुक्ताबाई पवार, मनीषा शिरसाठ, राणी लक्ष्मीबाई महिला बचतगटाच्या अध्यक्षा संगीता विलासराव शिरसाठ, सुजाता शिरसाठ, रूपाली शिरसाठ उपस्थित होत्या. कृषी दिंडीच्या वेळी कापूसउत्पादक शेतकऱ्यांसाठी मंडल कृषी अधिकारी गिरीश बिबवे यांनी चर्चासत्र घेतले. सोळुंके यांनी कृषी विद्यापीठातील विविध विभागांची, तर डॉ. विनू लावर यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायविषयी माहिती दिली. श्री. दोंदे यांनी माती परीक्षण कसे केले जाते याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांनी सुधारित शेती तंत्रज्ञान वापर व योजनांबद्दल मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या प्रतिमेचे भेंडय़ात दहन
नेवासे, १९ मे/वार्ताहर
रामदास आठवले यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भेंडे येथे दहन करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन कार्यकर्ते श्याम सोनकांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नेवासे-शेवगाव मार्गावर पुतळ्याचे दहन केले. या वेळी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. आगामी विधानसभेत रिपब्लिकनचे कार्यकर्ते काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा आमदार होऊ देणार नाहीत, असे प्रतिपादन सोनकांबळे यांनी केले. या इशाऱ्याला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. सौंदाळे गावचे सरपंच कचरू यादव, राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष मीनानाथ आरगडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गव्हाणे, पंचायत समिती उपसभापती तुकाराम मिसाळ, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिरूभाई आठरे, सुहास गायकवाड, वामन मापारे, भाऊसाहेब खरात, बाळा नरवडे, दीपक पगारे, येडू सोनवणे, पिंटू गोरे आदी या वेळी उपस्थित होते.

‘वाळकीच्या वाडय़ा-वस्त्यांवर सिंगल फेज वीजपुरवठा करावा’
नगर, १९ मे/वार्ताहर
तालुक्यातील वाळकी गावातील वाडय़ा-वस्त्यांवर सिंगल फेजद्वारे महावितरणने वीजपुरवठा सुरू न केल्यास २५ मे रोजी अरणगाव येथे नगर-दौंड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग व पंचायत समितीचे उपसभापती रंगनाथ निमसे यांनी दिला. वाळकीमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येतो, परंतु दोन ते तीन हजार लोकवस्तीच्या वाडय़ा-वस्त्यांवर सिंगल फेज नाही. धोंडेवाडी, आंबेराईवाडी, भोलेनाथवाडी, शिरकांड मळा, येणारे मळा आदी भागांत अधिकृत वीजजोड असूनही सिंगल फेज वीजपुरवठा नाही. हा वीजपुरवठा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा प्रकाश बोठे, सरपंच दादासाहेब कासार, माजी सरपंच जगन्नाथ आढाव, शिवाजी लोखंडे, संजय भालसिंग, सुरेश भालसिंग यांनी दिला.

वन्यप्राण्यांना पाणीपुरवठय़ासाठी गाडेंचे २५ मे पासून उपोषण
नेवासे, १९ मे/वार्ताहर
जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात सरकारने वनक्षेत्रात पायऱ्यांचे हौद बांधून, टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीसाठी येथील वन्य प्राणीमित्र रावसाहेब गाडे हे औरंगाबादच्या प्रादेशिक वन विभाग कार्यालयासमोर २५ मे रोजी उपोषणास बसणार आहेत. जंगलतोडीमुळे वनराई कमी होत आहे. जंगलक्षेत्रातील प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे येत आहेत. नागरी वस्तीत बिबटय़ांचा संचार वाढलेला आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी वस्त्यांवर येऊन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. अशा प्राण्यांना वनक्षेत्रातच पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.

माथाडी हमाली दरात बावीस टक्के वाढ
नगर, १९ मे/वार्ताहर

वाहतूक विभागात काम करणाऱ्या मान्यताप्राप्त माथाडी कामगारांच्या प्रचलित परच्युटन हमाली कामाच्या मजुरी दरात २२ टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी दिली. ही वाढ १ जून २००९ ते ३१ डिसेंबर २०११ या काळासाठी आहे. नगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात व्यापारी, माथाडी कामगार प्रतिनिधी यांची दि. १८ला बैठक झाली. या बैठकीत हमाल मजुरीच्या वाढीचा करार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव पी. एन. लोंढे होते.

रंगूबाई खालकर यांचे निधन
कोपरगाव, १९ मे/वार्ताहर

तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील श्रीमती रंगुबाई सयाजी खालकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे ४ मुले, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी कारखान्याच्या विश्रामगृहातील कर्मचारी विठ्ठल खालकर यांच्या त्या मातुश्री होत.

तीर्थयात्रेसाठी गेलेल्या सुरेश शेटे यांचे निधन
नगर, १९ मे/प्रतिनिधी

येथील दादा चौधरी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्य लिपीक सुरेश रामचंद्र शेटे (वय ६६) यांचे जगन्नाथपुरी तीर्थयात्रेदरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुले, एक मुलगी, सुना असा परिवार आहे. शेटे हे स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र शेटे यांचे पुत्र होत. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.