Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

पाणी टंचाईच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेची सभा गाजली
* रुग्णालयांच्या बांधकामात गैरव्यवहार
* दारुडय़ा कर्मचाऱ्यांचा प्रश्नही चर्चेला
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी
जिल्ह्य़ाच्या काही भागात निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र व उपकेंद्राच्या नुतनीकरणातील अनियमितता, अर्धवट कामे व गैरव्यवहार आणि काही कर्मचाऱ्यांचे दारू पिऊन कार्यालयात हजर राहणे, या प्रमुख मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या सभेतील आजची चर्चा गाजली. सर्वप्रथम बंडू उमरकर यांनी जिल्ह्य़ातील किती गावांत पाणी टंचाई आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्यात तसेच खरीप हंगाम सुरू होण्याला काही दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेने काय व्यवस्था केली,

आता वेध विधानसभेचे;इच्छुकांची मोर्चेबांधणी
नितीन तोटेवार
नागपूर, १९ मे

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे आणि मिळालेल्या मतांचे विश्लेषण केल्यानंतर इच्छुकांचे आता विधानसभेकडे लक्ष लागले आहे. मोर्चेबांधणीसाठी अद्याप वेळ असला तरी, लोकसभेसाठी किती परिश्रम घेतले याचा लेखाजोखा श्रेष्ठींसमोर मांडून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होणार आहेत. अर्थात आघाडी आणि युतीच्या जागा वाटप सूत्रावरच हे अवलंबून राहील. विदर्भात विशेषत पूर्व विदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची वाहने परत
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काढून घेण्यात आलेली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हा प्रशासनाने परत केली आहेत. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची वर्दळही वाढली आहे.महापौर माया इवनाते, उपमहापौर किशोर कुमेरिया, सत्तारूढ पक्षाचे नेते प्रा. अनिल सोले, दुर्बल घटक समितीचे अध्यक्ष प्रकाश गोंडाणे आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांना त्यांची वाहने परत देण्यात आली.

सहपोलीस आयुक्तांच्या स्वेच्छानिवृत्तीचा बॉम्बगोळा
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही तोच सहपोलीस आयुक्तांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या बॉम्बगोळ्याचा धुराळा उठला असून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या मनसुब्यावरून सरकार दरबारी मात्र हालचाली सुरू झाल्या आहेत. सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी कुणाचे नाव न घेता नाराजी व्यक्त करीत तसेच हताश झाल्याचा आरोप करीत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला.

यंदाही अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच
* पर्यायी ४० महाविद्यालयांची नावे द्यावी लागणार
* समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य तायवाडेंची निवड
नागपूर, १९ मे/ प्रतिनिधी
यंदा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांला पर्याय म्हणून ४० कनिष्ठ महाविद्यालयाची नावे द्यावी लागणार आहेत. त्यापैकी समितीने निवडलेल्या एका महाविद्यालयाचे नाव सुचविले जाणार आहे. यावेळी झोननिहाय कोडद्वारे प्रवेश देणे शक्य नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनी दिली.

अंबाझरी तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याची मागणी
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी

अंबाझरी तलाव हा पुरातन तलाव असून त्याच्या बाजूला असलेल्या उद्यानात परिसरातील अनेक लहान मुले खेळत असतात तसेच ज्येष्ठ नागरिकही सकाळ संध्याकाळी या परिसरात फिरायला येतात. आरोग्याच्या दृष्टीने तलावातील पाणी स्वच्छ राहणे आवश्यक असल्यामुळे महापालिकेने तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करावे व तलावाला लागून असलेली संरक्षण भिंत दुरस्त करावी, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक विकास ठाकरे यांनी केली.

पाण्याअभावी गौरचा मृत्यू
नागपूर, १९ मे/प्रतिनिधी

सूर्याचे आग ओकणे सुरूच असताना त्याचा फटका आता वन्यप्राण्यांनासुद्धा बसू लागल्याचे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील गौर या प्राण्याच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाण्याचा अभाव, कृत्रिम पाणवठय़ातसुद्धा पाण्याचा अभाव असल्याने त्याचा फटका जंगलातील शेकडो पशुपक्ष्यांना बसत आहे.

मै और मेरी मम्मी; नाविन्यपूर्ण उपक्रम
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी
विष्णू मनोहर एंटरटेनमेंट, बालरंजन आणि राधिका क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मै और मेरी मम्मी’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा हा कार्यक्रम संगीत, नृत्य व नाटय़ावर आधारित आहे. २ ते ४ वयोगटातील मुले-मुली या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. कार्यक्रमाची संकल्पना संजय पेंडसे यांची असून निर्मिती विष्णू मनोहर यांची आहे. सुशांत झाडगावकर या कार्यक्रमाचे सुत्रधार आहे. ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी विष्णू मनोहर एंटरटेनमेंट, बालरंजन, अभ्यंकर स्मारक स्मृती सदन, धंतोली पार्क येथे किंवा ९३२५७७०१७९, ९४२२४४३२९५ या मोबाईल क्रमांकांवर ५ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची शनिवारी नागपुरात सभा
नागपूर, १९ मे/ प्रतिनिधी
महाविद्यालयीन शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी २३ मे रोजी दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या संदर्भात १ मे रोजी नुटाची बैठक झाली होती. सभेत विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याकरिता दिरंगाई होत होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राध्यापकांशी चर्चा करण्यासाठी २३ मे रोजी नुटाचे अध्यक्ष आमदार बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या गुरुनानाक भवनात दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला सर्व पदव्युत्तर विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नुटाचे नागपूर शहर अध्यक्ष डॉ.यशवंत पाटील यांनी केले आहे.

लग्न मंडपात पाणी न दिल्यामुळे तलवारीने हल्ला, सहा जखमी
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी
पाणी न दिल्याच्या कारणावरून लग्न मंडपात सहा आरोपींनी हैदोस घालत तलवारीने हल्ला केला. यात सहाजण जखमी झाले. उत्तर नागपुरातील राजीव गांधीनगरात सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खौसनिसा इमदाद अली या महिलेच्या घरी लग्न मंडपात रात्री जेवण सुरू होते. जेवताना प्यायला पाणी न मिळाल्याने छोटू, अक्का, शेरू, कालू, अक्काचा काका व रहिम या सहाजणांनी हैदोस घातला. ताट, वाटय़ा, पेले, अन्न व इतर वस्तूंची फेकाफेक झाली. आरोपींनी तलवारी आणल्या. खौसनिसा तसेच तिचे नातेवाईकशेख इस्माईल शेख बहादुर, शेख इब्राहिम शेख बहादुर (सर्व रा़ राजीव गांधीनगर), तहरूनिशा रफिक, खैरूनिशा, आसिफ अली युसुफ अली व शेख शफिक शेख बहादुर (दोन्ही रा़ मोमीनपुरा) यांना मारहाण करीत तलवारीचे घाव घातले. या जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेने लग्न मंडपात महिला व इतरांची धावाधाव झाली. हे समजताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतल़े

कोराडी वीज केंद्रातून लोखंड चोरणारे तिघे अटकेत
नागपूर, १९ मे/प्रतिनिधी
कोराडी औष्णिक वीज केंद्रातून लोखंड चोरून नेणाऱ्या तिघांना तेथील सुरक्षा पथकाने पकडून कोराडी पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी मध्यरात्रीनंतर वीज केंद्र परिसरातील टाकाऊ राख टाकलेल्या परिसरात कनिष्ठ सुरक्षा अधिकारी आश्ीाष मणीराम तळवेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना तिघेजण पोते घेऊन जाताना दिसले. त्यांना पकडण्यात आले. प्रमोद श्रीराम जिवेकर, सुनील रामदास उके व राजु सावंत वाघमारे (सर्व रा़ इंदोरा, बाराखोली) ही त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून लोख्ांडी पाईप व इतर लोखंडी साहित्य (वजन दीडशे किलो) जप्त करण्यात आल़े

डॉ. आंबेडकर मल्टीपर्पज सोसायटीमध्ये बुद्ध जयंती साजरी
नागपूर, १९ मे/प्रतिनिधी
सीताबर्डीवरील धनश्री कॉम्प्लेक्समधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज सोसायटीमध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक विमलसूर्य चिमणकर, इंडियन जस्टीस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री भयासाहेब शेलारे, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक अशोक बोदाडे, वाय.आर. रंगारी, शत्रुघ्न चवरे उपस्थित होते. याप्रसंगी मल्टीपरपज सोसायटीमध्ये शेअर मार्केट युनिट कार्यालयाचे उद्घाटन विमलसूर्य चिमणकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शेअर मार्केटचे कार्यकर्ते आणि मल्टीपरपज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंबाझरी परिसरात विजयी मिरवणूक
नागपूर, १९ मे/प्रतिनिधी
नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा विजय व काँग्रेस पक्षाच्या यशाबद्दल दक्षिण पश्चिम नागपुरातील हिलटॉप, अंबाझरी येथून वार्ड अध्यक्ष बाबा बनसोड यांच्या नेतृत्वात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बनसोड यांनी काँग्रेस पक्षाचा विजय हा धर्मनिरपेक्षतेचा विजय असल्याचे सांगितले. मिरवणूक हिलटॉप, अंबाझरी, सेवानगर, सुदामनगरी, वर्मा लेआऊट, समतानगर येथून गांधीनगर येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी शत्रुघ्न महतो, युवराज शिव, माधवी बनसोड, अलका जिभेंकर, छाया शर्मा, अलका डोंगरे, विद्यावती बनसोड, राजेश उघाडे आदी कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

महिलेला जिवंत जाळले
बुलढाणा, १९ मे / प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या सागवन परिसरात शुल्लक कारणाच्या भांडणावरून शेजारी असलेल्या एका महिलेने दुसऱ्या महिलेस जिवंत जाळल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जळालेल्या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीवरून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागवन परिसरातील लीला संजय भाकरे (२६) या महिलेस शेजारी राहणाऱ्या आरोपी सुषमा कचरु पाडळे या महिलेने जिवंत जाळल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील काही नागरिकांनी जळालेल्या लीला संजय भाकरे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी लीला संजय भाकरे यांनी सांगितले की, शेजारी असलेल्या सुषमा कचरु पाडळे याच्याशी झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात मी अंगावर रॉकेल घेतले.

शारजाला जाणाऱ्या प्रवाशाजवळ २२ लाखांची बंडले!
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी

विमानाने आखाती देशात जाणाऱ्या एका प्रवाशाजवळ लाखो रुपये सापडल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे खळबळ उडाली.
नागपूरहून थेट शारजाला पहाटे विमान जाते. या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी (स्कॅनिंग) विमानतळावर सुरू होती. एका सुटकेसमध्ये कपडय़ांऐवजी नोटांची बंडले दिसल्याने तपासणी कर्मचारी हादरला. त्याने लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. विमानतळच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी तसेच कस्टमचे अधिकारी स्कॅनिंग कक्षात पोहोचले. सुटकेसमधील नोटांची बंडले पाहून ते अधिकारी थक्क झाले. मोजणीअंती ही रक्कम बावीस लाखापर्यंत पोहोचली. या सुटकेसच्या मालकाची शोधाशोध सुरू झाली. अखेर त्या सुटकेसचा मालक सापडला. एका बडय़ा व्यावसायिकाची ही सुटकेस होती. ही रक्कम प्राप्तिकर खात्याकडे सोपवण्यात आली. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्या व्यावसायिकाचे नाव मात्र उघड केले नाही.