Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

जीवनदर्शन
चांगलेपणाचे मूळ

पुण्य आणि पाप हे शब्द सवंग झाले आहेत. त्यांचा अर्थ जो तो आपल्या सोयीने लावून स्वत:ला ऋषिकुलातले सभासद करण्याच्या लटपटीत असतो. ऋषींच्या मते पाप आणि पुण्य यांचे सम प्रमाण झाले की माणूस जन्माला येतो. ईश्वराकडे जाण्याची बुद्धी

 

सत्कर्मीरत असते, हे पुण्य आणि केवळ इंद्रियभोगांचा अतिरेक हे पाप. हे दोन्ही माणसाला जन्मजात असते. त्यातल्या त्यात माणसातले देवत्व शिल्लक राहण्यासाठी उपनिषदे जन्माला आली आहेत. पुराणांमध्ये असुरांचे मायावी वर्णन येते. वस्तूचे मूळ रूप झाकून भलतेच रूप प्रकट करणे मायावी आहे. उदा., विनाकारण हिंसा, अपहरण, दुष्टतेने वागणे इ.इ. व्यवहारात वरवर चांगले वागायचे नि आतून मात्र पशूसारखे हिंस्र वागायचे. ही वृत्ती योग्य नाही. म्हणून ऋषींच्या दृष्टीने आत्मा किंवा भगवंत सर्व चांगलेपणाचे मूळ आहे. माणसाचे समाजविधायक कर्म सत्कर्मात वय घालवायला लावते. चांगल्या कामाच्या आनंदाला शब्द नसतात. तिथे फक्त प्रसाद असतो. लाघवी प्रसन्नता असते. अशी प्रसन्नता ईश्वरीय असते. मात्र ऋषी सत्कर्मावर सतत भर देतात. एखादा माणूस नीतीने प्रपंच करीत राहिला अन् तो अहंतेत वा देहात्मभावात स्वनामधन्य होत बसला तर काय कामाचा? कदाचित त्याच्यातला असूरपणा वाढणार नाही, पण त्याच्या आतले देवत्व कायम झाकले राहील त्याचे काय? तो अध्यात्मात प्रगत होत नाही. तो अपूर्ण राहतो म्हणून कुठलाही चांगुलपणा वा सत्कर्म समाजाच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यातून व्यक्तिमनाबरोबर समाजमनाचा उद्धार झाला पाहिजे. या अर्थाने चांगलेपणाचे मूळ अध्यात्मिक असते. कारण चांगुलपणा अंतरंगातून उपजावा लागतो. नाहीतर अनेक चांगली माणसे विविध क्षेत्रांत कार्यरत असली तरी आपला अहंगंड सोडत नाहीत. अशांचा चांगुलपणा अहंकारी असतो. चांगुलपणाला देवत्वाचा गाभारा मिळाला की तिथे भगवंतकृपा असते. सहज उदाहरण स्मरले. ओळखीचे सद्गृहस्थ म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर ज्ञानेश्वरी वाचणार. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली. कितपत कळली देव जाणे. पण मी ज्ञानेश्वरी वाचली या अहंतेने ते ग्रासले. यावर एक वारकरी त्यांना म्हणाला, बकरी रोज पाला खाते म्हणून गाईचे दूध देत नाही.
यशवंत पाठक

कुतूहल
लार्ज हॅड्रॉन कोलायडर

अलीकडे चर्चेत असलेला लार्ज हॅड्रॉन कोलायडर हा प्रयोग काय आहे?
महास्फोटानंतरच्या विश्वातील स्थितीसारखी स्थिती पृथ्वीवर निर्माण करण्याचा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रयोग हा लार्ज हॅड्रोन कोलायडर या नावाने प्रसिद्ध आहे. यात अत्यंत गतिमान अशा प्रोटॉन कणांच्या एकमेकांवर होणाऱ्या आघातातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. आघाताच्या क्षणाची स्थिती ही विश्वनिर्मितीनंतरच्या एक अब्जांश सेकंद झाल्यानंतरच्या स्थितीसारखी असेल. या प्रयोगामुळे आपल्याला प्रयोगशाळेत बसून विश्वजन्मवेळेच्या घटनांची पुनर्निर्मिती करता येणार आहे. शंभराहून अधिक देशांचा सहभाग असलेल्या या प्रकल्पाद्वारे विश्वनिर्मितिशास्त्रातील अनेक न उलगडलेले प्रश्न सुटू लागतील, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. लार्ज हॅड्रॉन कोलायडर हे नलिकेच्या स्वरूपातील महाकाय यंत्र स्वित्र्झलड व फ्रान्स या दोन देशांमध्ये पसरले आहे. ही नलिका वर्तुळाकार असून, ती जमिनीखाली किमान ५० मीटर ते कमाल १७५ मीटर खोलीवर ३.८ मीटर रुंदीच्या बोगद्यात वसली आहे. या नलिकेचा परिघ २७ किलोमीटर इतका प्रचंड आहे. कणांना गती देण्यासाठी या नलिकेभोवती ९३०० महाकाय विद्युतचुंबके बसविली आहेत. जेथे कणांचा आघात घडून येईल त्या अल्पशा जागेचे तापमान सूर्याच्या गाभ्यातील तापमानाच्या एक लक्ष पटींनी जास्त असेल. कक्षेत फिरताना प्रोटॉनचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा ९९.९९ टक्के एवढा प्रचंड असेल व या वेगाने २७ किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गावर फिरणारे हे कण एका सेकंदात ११,२४५ फेऱ्या पूर्ण करतील. एका सेकंदातील कणाघातांची संख्या सुमारे ६० कोटी इतकी असेल. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित झालेला हा प्रकल्प तांत्रिक दोषांमुळे काही महिने दुरुस्तीसाठी बंद ठेवला असून, तो येत्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
ख्रिस्तोफर कोलंबस

सन १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपाल हे शहर जिंकले आणि गेली शेकडो वर्षे आशियाबरोबरचा, विशेषत: भारताबरोबरचा खुष्कीच्या मार्गाने चालणारा व्यापार बंद झाला. युरोपीयांना आता व्यापारासाठी पर्यायी अशा नव्या जलमार्गाची गरज भासू लागली. पृथ्वी गोल आहे. तेव्हा समुद्र मार्गे पश्चिमेच्या दिशेने गेल्यास भारत आपल्याला नक्की सापडेल, या आशेवर कोलंबस निघाला. परंतु भारताऐवजी त्याला ज्ञात झाला एक अज्ञात असलेला खंड. ख्रिस्तोफर कोलंबसचा जन्म सन १४५१च्या सुमारास जिनोआ येथे झाला. समुद्राच्या आकर्षणामुळे वयाच्या चौदाव्या वर्षीच तो फ्रेंच चाचांबरोबर चाचेगिरी करू लागला. त्याचे लग्न एका पोर्तुगीज सरदाराच्या मुलीबरोबर झाल्याने त्याचे राजदरबारात वजन होते. त्यानेच पोर्तुगीज राजासमोर भारतात जलमार्गाने जाण्याची कल्पना मांडली. परंतु राजाच्या सल्लागारांची ही कल्पना मूर्खास्पद आहे म्हणून फेटाळली. परंतु जेव्हा ही योजना त्याने स्पेनच्या राजाला सांगितली तेव्हा त्याने पाठिंबा दिला. ‘सांता मारिया’ या जहाजातून कोलंबस ३ ऑगस्ट १४९२ रोजी भारताच्या शोधास निघाला. ऑक्टोबर महिना उजाडला तरीही किनारा काही दिसेना. अखेर १२ ऑक्टोबरला त्याने जमिनीवर पाऊल टाकले, परंतु हा भारत देश नसून दुसऱ्याच देशात आलो हे त्याच्या लक्षात आले. क्युबा आणि इतर काही बेटांचा शोध लावून तो स्पेनमध्ये परतला. तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. सन १४९३च्या दुसऱ्या मोहिमेत त्याने डॉमिनिका, सेंट किट्स, माँटेसराट, नेवीस ही बेटे शोधली. सन १४९८च्या तिसऱ्या मोहिमेत त्रिनिदाद, व्हेनेझुएला ही बेटे शोधली. तथापि, स्थानिक लोकांचे त्याला सहकार्य न लाभल्याने तेथे असंतोष पसरला. तेव्हा स्पेनच्या राजाच्या प्रशासकाने त्याला अटक करून स्पेनला पाठवले. तथापि, राजाने त्याला निर्दोष सोडले. १५०२च्या शेवटच्या मोहिमेत त्याने मार्टिनिक, मध्य अमेरिकेतील होंडुराम, पनामा इ. प्रदेश शोधले. २० मे १५०६ रोजी संधिवाताचा आजार बळावल्याने त्याचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
शेपटाला डोके मिळाले

गावाशेजारच्या वनराईत फिरताना सोनूला एकदा केसाळ लांबडा आकार दिसला. काय असेल बरं? सोनूने विचार केला. त्याने आकाराला विचारले, ‘कोण तू? स्वल्पविराम? प्रश्नचिन्ह? जाडजूड रेघ का शेपूट?’ आकार म्हणाला, ‘मी स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह किंवा रेघ नाही. मी शेपूट आहे. शेपूट कुठून तरी सुरू होते. निमुळते होत संपते. तुला आगापिछाच नाही.’ ‘त्यामुळे काही बिघडतं का?’ शेपटाने विचारले. ‘हो, तुला तोंड, पाठ, पोट असतं तर निदान तू एखादा प्राणी नसता का झालास? काय करावं बरं?’ ‘तू कर ना मला प्राणी’ शेपूट काकुळतीने सोनूला म्हणाले. मी कुठेही गेलो, कुणाच्या मागे गेलो की सगळे म्हणतात, आलं का शेपूट पाठीमागून. सगळे माझी कुचेष्टा करतात. शेपूट म्हणून मला चिडवतात. मला नाही शेपूट म्हणवून घ्यायचं. मला नाही आवडत सगळे चिडवतात ते. तोपर्यंत एक माकड झाडाच्या फांदीवर येऊन वरून शेपटाकडे कुतूहलाने बघत बसले होते. शेजारच्याच फांदीवर एक साळुंकीही आली. पानावरची एक अळीही त्यांच्यात सामील झाली. तिघे सोनूला म्हणाले, ‘अरे, नुसता उभा काय राहिला आहेस मख्खासारखा? शेपूट म्हणतंय तर कर ना त्याला प्राणी.’ माकड म्हणाले, ‘हत्तीचं डोकं लाव.’ साळुंकी म्हणाली, ‘मोराचं पोट लाव.’ अळी म्हणाली, ‘सुरवंटाचे पाय लाव.’ शेपटाला तिघांच्या कल्पना आवडल्या नाहीत. ‘काहीतरी नवे शोधा रे,’ ते गयावया करून म्हणाले. सोनू विचार करत होता. नवे काय बरं करता येईल?झाडावर अडकलेला एक फुगा त्याला दिसला. झाडावर चढून त्याने फुगा काढला. जांभूळ फोडून त्याच्या रंगाने डोळे आणि ओठ रंगवले. ‘चला, मस्त डोकं तयार झालं.’ तो म्हणाला. शेपटालाही ते रंगीबेरंगी डोकं फारच आवडलं. ते म्हणाले, ‘असं डोकं कुणाचंच नसेल.’ ‘तोंड ठीक आहे, पण पोटाचं काय,’ माकडाने विचारले. सोनू पुन्हा विचारात पडला. त्याने पाठीला सॅक अडकवली होती. ‘अरे, हे पोट आणि पाठ छानच आहे की.’ सोनूने विचार केला. डोकं सॅकला लावून टाकलं आणि शेपूटही लगेच चिकटलं पाठीमागे. त्याला ती सवयच होती. साळुंकी म्हणाली, ‘हात कुठायत?’ अळी म्हणाली, ‘पाय कुठायत?’ सोनू म्हणाला, ‘हाता-पायांशिवाय कसा बरं एखादा प्राणी चांगला दिसेल?’ शेपूट उतावीळपणे म्हणालं, ‘हो, हात-पाय तर पाहिजेतच.’ सोनू शेपटाला घेऊन घरी आला. बालवाडीत असताना बाबांनी त्याला एकमेकांना चिकटणारे अ, आ, ई, इ चे ठोकळे आणले होते. त्याचे हात-पाय छान झाले. शेपूट खूश झाले. ‘सोनू, अरे, मला फार आवडलास तू.’ शेपूट म्हणाले. तुमच्या कल्पनाशक्तीला कुंपण नसते. तुमच्या कितीतरी कल्पना, प्रतिमा मनात दडलेल्या असतात. त्यांना जागे कसे करायचे, काहीवेळा कोणताही प्रयत्न न करणेच चांगले असते. फिरायला जा, पुस्तक वाचा, संगीत ऐका, शांत बसून राहा, पाहा, मनाच्या तळाशी पडून राहिलेल्या कितीतरी सुंदर कल्पना मनाच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतील.
आजचा संकल्प- माझ्या कल्पनाशक्तीला मी मोकळे सोडेन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com