Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

नवी मुंबईत अतिक्रमण घोटाळा
महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही गोत्यात
नवी मुंबई, (प्रतिनिधी)
ठाणे, कल्याण-डोंबिवली यासारख्या शहरांच्या पाठोपाठ नवी मुंबईत दिवसागणिक उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे येथील जनता कमालीची अस्वस्थ होऊ लागली असतानाच, शहराचे पालकत्व भूषविणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारानेच महापालिकेस गंडा घातला असून, केलेल्या कामापेक्षा तब्बल २६ लाख रुपयांची जादा रक्कम उकळल्याप्रकरणी महापालिकेने सीबीडी पोलीस ठाण्यात या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अतिक्रमण हटावचे ठेके रद्द
नव्याने निविदा मागविणार
नवी मुंबई, (प्रतिनिधी)
नवी मुंबई परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कंत्राटातील घोटाळा उघड होताच खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढील तीन वर्षांसाठी अतिक्रमण हटाव ठेक्यासाठी मागविण्यात आलेल्या सर्व निविदांमध्ये िरग झाल्याच्या संशयावरून ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागविण्यात आलेल्या या ठेक्यांमध्ये रिंग झाल्याचे वृत्त ‘वृत्तान्त’ने सर्वप्रथम दिले होते. या पाश्र्वभूमीवर आता संपूर्ण शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी एकच ठेका मागविण्याऐवजी प्रत्येक उपनगरासाठी वेगवेगळे ठेकेदार नेमण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

नालेसफाईबाबत मनसेचा सिडकोला इशारा
पनवेल/प्रतिनिधी - पावसाळा दोन आठवडय़ांवर येऊनही नवीन पनवेलमध्ये अद्याप नालेसफाईची कामे झाली नसल्याने पावसाळ्यात बिकट प्रसंग उभा राहू शकतो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिडकोला दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सिडकोतर्फे नालेसफाई केली जाते. नवीन पनवेलमध्ये यावर्षी मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पहिल्या पावसापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास सखल भागात पाणी तुंबणार आहे आणि त्यामुळे दुर्घटना घडू शकतील, याकडे मनसेचे नवीन पनवेल शहर अध्यक्ष सुरेश सावंत यांनी लक्ष वेधले आहे.गटारे गाळमुक्त केल्याने पावसाळ्यात रोगराईला आळा बसतो, त्यामुळे हे काम त्वरित व्हावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. नालेसफाईचे काम वेळीच न झाल्यास त्यास सिडकोच जबाबदार असेल आणि नागरिकांना त्याचा त्रास झाल्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना मनसे पद्धतीने धडा शिकविला जाईल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.दरम्यान बाग-बगीचे, शाळा, महाविद्यालय, मैदाने यासाठी आरक्षित ठेवलेले भूखंड सिडकोतर्फे मोठय़ा शैक्षणिक संस्थांना दिले जात असून, या संस्था देणग्यांच्या नावाखाली भरमसाठ रकमा उकळत आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.

घारापुरी-राजबंदर स्मशानभूमीची दुरवस्था
उरण/वार्ताहर - घारापुरी बेटावरील राजबंदर येथील स्मशानभूमीची पार दुरवस्था झाली असून, नव्याने सुरू करण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम मागील दोन वर्षांंपासून रखडले आहे. यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रा. पं. कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घारापुरी बेटावर मोराबंदर, शेतबंदर व राजबंदर अशी तीन गावे आहेत. या तिन्ही गावांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. या तिन्ही गावांपैकी राजबंदर गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे आहे. या राजबंदर गावासाठी समुद्रकिनाऱ्यावरच स्मशानभूमी आहे. जुन्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे, मात्र मागील दोन वर्षांंपासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मशानभूमीतील लोखंडी पोल गंजून जीर्ण झाले आहेत. त्याजागी नवीन लोखंडी पोल टाकण्याचे काम मागील दोन वर्षांंपासून ग्रामपंचायतीला अद्याप जमले नसल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्य शोभा म्हात्रे, अजय म्हात्रे आणि ललिता शेबेकर यांनी केला. स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामामुळे मात्र ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीचे काम त्वरित व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. लोखंडी पोल मिळण्यास विलंब झाल्याने स्मशानभूमीचे काम झाले नसल्याची माहिती ग्रा. पं. कार्यालयातून देण्यात आली.