Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘सुरत-नाशिक-पुणे मार्गासह रेल्वेचे सर्वच प्रश्न आपल्या रडारवर’
प्रतिनिधी / नाशिक

 

रेल्वेशी निगडित अनेक लहान-मोठे प्रश्न नाशिककरांना वर्षांनुवर्ष भेडसावत असले तरी दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या स्थानिक नेतेमंडळींनी आजवर त्याकडे म्हणावे तसे लक्ष्य दिलेले नाही. अलीकडील काळात शहराचा विस्तार ज्या झपाटय़ाने होत आहे त्याच प्रमाणात येथील व्याप वाढत असल्याने वाहतूक आणि दळणवळण हा विषय पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने सामान्यांसाठी जिव्हाळ्याचा ठरू लागला आहे. लोकसत्ता नाशिक वृत्तान्तच्या माध्यमातून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिककरांनी त्यांच्या दिल्लीतील प्रतिनिधित्वाची जबाबदारी समीर भुजबळ यांच्यावर सोपवली आहे. त्या पाश्र्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार समीर भुजबळ यांच्याशी केलेली बातचीत..
दिल्लीत नाशिकचे प्रतिनिधित्व करताना मुख्यत: कोणत्या विषयांना आपले प्राधान्य असेल?
केंद्र शासनाशी म्हणून निगडित स्थानिक पातळीवरील जे जे प्रश्न आहेत ते सर्वच लोकांच्या म्हणजे पर्यायाने माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे शहर विकासासाठीचे महत्वाचे प्रकल्प असोत, ग्रामीण भागाच्या विकासासंबंधित योजना असो, विमान वाहतूक असो की रेल्वे वाहतूक असो अशा साऱ्याच मुद्यांकडे आपण लक्ष पुरविणार आहोत. किंबहुना, माझ्या निवडणूक जाहिरनाम्यातही या मुद्यांचा ऊहापोह झालाच आहे.
सर्व प्रश्न मांडणार हे ठीक, पण सध्या रेल्वे विषयक समस्या नाशिककरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनत चालला आहे..
साहजिक आहे. निवडणूक काळात माझी विविध क्षेत्रातल्या मंडळींशी या संदर्भात चर्चा झाली आहे. त्यातून रेल्वे संबंधित विविध प्रश्न आहेत हे तर जाणवलेच, शिवाय त्याबाबत लोकांच्या भावना किती तीव्र आहेत ते ही लक्षात आले. त्यामुळे रेल्वेशी संबंधित सर्वच विषय माझ्या रडारवर असणार आहेत.
नेमक्या कोणत्या समस्या या संदर्भात आपल्याला जाणविल्या?
सर्वसामान्य प्रवाशांच्या अनेक लहान-मोठय़ा समस्या आहेत. त्यातील अनेक बाबी स्थानिक पातळीवरील रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नियोजन करून सहज सुटण्यासारख्या आहेत. त्यामुळे त्या प्रधान्याने करता येतील. तथापि, अन्य काही मोठय़ा आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबतही नियोजनबद्धपणे पाठपुरावा करण्याचा माझा मानस आहे.
रेल्वेशी संबंधित कोणत्या मोठय़ा योजना आपल्या मनात आहेत?
नाशिक आणि मुंबई या दोन्ही शहरांच्या वाढीचा अफाट वेग आणि दिवसेंदिवस त्या दरम्यान वाढणारी कनेक्टिविटी लक्षात घेता पंचवटी एक्स्प्रेसप्रमाणेच नाशिककरांना मुंबईसाठी आणखी एक हक्काची रेल्वेगाडी उपलब्ध करून देण्याबाबत आपण लगेच पाठपुरावा सुरू करणार आहोत. पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे गाडी असावी अशी सर्वच स्तरातील मंडळींची अपेक्षा आहे आणि एकूणात स्थिती पाहता त्याची निकडही आहे. त्यामुळे शक्य तेवढय़ा लवकर अशी गाडी सुरू व्हावी म्हणून मी प्रयत्नरत असेन. त्यासाठी नवीन रेल्वे मंत्र्यांच्या संपर्कात राहून, मागे लागून आपली मागणी मान्य करून घ्यावी लागेल.
आर्थिकदृष्टय़ा रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने ते शक्य होईल का?
वाढत्या गरजा लक्षात घेता अशा गाडीला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आर्थिक निकषाचा फारसा प्रश्न येईल असे वाटत नाही.
अनेकदा मागण्या रास्त असल्या तरी तांत्रिक बाबी पुढे करून त्या टोलविल्या जातात..
खरे आहे. म्हणून केवळ मागणी करून भागणार नाही तर त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या तांत्रिक बाबीबी तपासून पहाव्या लागतील. त्यासाठी जाणकार मंडळींकडून अधिक माहिती घेवून आराखडा तयार करावा लागेल.
भविष्यात जरी अशी गाडी सुरू झाली तरी ती नाशिककरांची राहणार का?
म्हणजे?
नाशिकरोड वा देवळाली कँम्प स्थानकांवर रेल्वे गाडय़ांच्या देखभाल, दुरूस्ती, साफसफाईची व्यवस्था नसल्याचे कारण देवून प्रत्येकवेळा या गाडय़ांचा पल्ला विस्तारण्यात येतो..
खरे आहे. त्यामुळे या दोन पैकी एखाद्या ठिकाणी कारशेड अथवा तत्सम व्यवस्था उभारण्यासाठी काय करावे लागेल त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागेल. एकदा त्याबाबतची स्पष्टता झाली की, जे अडथळे आहेत ते दूर करण्यास वेळ लागणार नाही. शिवाय ओढा स्थानकाचा विकास करून त्याला टर्मिनसचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठीही प्रयत्न करावे लागतील.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत..
हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तथापि, त्याची व्याप्ती पाहता तो चुटकीसरशी मार्गी लागेल असे नाही. त्यासाठी सगळ्याच बाजूने सातत्याने पाठपुरावा करणे क्रमप्राप्त आहे. केवळ नाशिक-पुणेच नव्हे तर सुरत-नाशिक-पुणे हा रेल्वे मार्ग व्हावा यावर आपला भर असेल. त्यामुळे गुजरात तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी थेट रेल्वेमार्ग उपलब्ध होईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीच्या दृष्टीनेही ते अत्यंत लाभदायक ठरणार आहे. व्यापार वृद्धीसाठीही त्यामुळे चालना मिळणार असल्याने हा मुद्दा सर्वासाठीच महत्वाचा आहे. तो मार्गी लागावा याला आपले प्राधान्य राहीलच पण हा मुद्दा लगेच निकाली निघेल एवढा सहजसाध्यही नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळेच आतापासून त्याबाबत अभ्यास करून आणि पाठपुरावा करून शक्य तेवढय़ा लवकर हा प्रकल्प मार्गी लावणे याला माझे प्राधान्य राहील.