Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

प्रसारमाध्यमांकडून मारहाणीच्या घटनेचा निषेध
प्रतिनिधी / नाशिक

 

शहरात गोंधळ घालणाऱ्या प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याऐवजी पोलीस यंत्रणेने या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करून दडपशाहीचे धोरण स्वीकारल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याच्या या घटनेचा राज्य मराठी पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ व छायाचित्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला होता. संबंधितांवर येत्या २४ तासात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
देवळाली येथील तोफखाना स्कूलचे सुमारे १०० प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकारी सोमवारी सायंकाळी शहरात गोंधळ घालत असताना या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार व छायाचित्रकारांशी मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापनाने वाद घातला. यावेळी पोलीस यंत्रणेने लष्करी अधिकारी व मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याऐवजी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना लक्ष्य बनविले. या घटनेच्या निषेधार्थ पत्रकारांनी रात्री उशिरापर्यंत आंदोलन छेडल्याने छायाचित्रकारास मारहाण करणाऱ्या विनायक खांडरे या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी मीडिया सेंटर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांनी दुचाकींवर हुल्लडबाजी करत रॅली काढली होती. वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघालेल्या या अधिकाऱ्यांनी कोणतेही तारतम्य न बाळगता महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड, पोलिसांशी अरेरावी केली; एवढेच नव्हे तर कॉलेजरोडवर वाहने उभी करून वाहतूक बंद पाडली. मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापनाशी वाद घातले. वाहतूक पोलिसालाही त्यांनी जुमानले नाही. घटनास्थळी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी लष्करी अधिकारी आणि मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापनाने हुज्जत घातली. छायाचित्रण करण्यास मज्जाव करून कॅमेरा फोडण्यात आला.
कॉलेजरोडवरील या घटनेत पोलीस यंत्रणेने पत्रकार व छायाचित्रकारांना केलेल्या मारहाणीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कॅमेरामन व छायाचित्रकार संघटना, नाशिक तालुका पत्रकार संघ आदी विविध संघटनांनी निषेध केला आहे. या बाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देशपांडे, अभय ओझरकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असणाऱ्या समितीची बैठक अनेक महिन्यांपासून झालेली नाही. ही बैठक त्वरित घेण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे.