Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

यंत्रणा निवडणूक कामात गढल्याने निवृत्तीवेतन मिळण्यास विलंब
प्रतिनिधी / नाशिक

 

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने कोषागार विभागातील संपूर्ण कर्मचारीवर्ग जुंपल्याने त्याचा परिणाम जिल्ह्य़ातील हजारो सेवा निवृत्तांचे एप्रिल महिन्यातील निवृत्ती वेतन विलंबाने मिळण्यात झाला आहे. शहरी भागात काहीशा विलंबाने का होईना हे वेतन मिळाले असले तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही ते मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा परिणाम निवृत्ती वेतनधारकांचे वेतन विलंबाने मिळण्यात झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात निवृत्तीवेतनधारकांची संख्या तब्बल ३५ हजारहून अधिक असून या सर्वाचे निवृत्तीवेतन दर महिन्याच्या एक तारखेला त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा होत असते. एक तारखेला शासकीय सुट्टी असल्यास निवृत्ती वेतन एक दिवस अगोदर जमा केले जाते असा आजवरचा अनुभव आहे.
तथापि, मे महिन्याच्या एक तारखेला या प्रक्रियेत खंड पडला. कोषागार विभागातील जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने निवृत्तीवेतनाचे काम रखडल्याचे सांगण्यात येते. एप्रिलच्या अखेरच्या सप्ताहापर्यंत कोषागार कार्यालयात कर्मचारी नव्हते.
निवडणुकीच्या कामातून सुटका झालेल्या कर्मचारी वर्गाकडून शेवटच्या दोन दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य होते. बिले तयार करणे, प्रत्यक्ष धनादेश काढणे, ते बँकेत पाठविणे ही कामे पूर्ण झाल्यावर बँकेकडून तो धनादेश पुन्हा मंजुरीसाठी कोषागार कार्यालयात येत असल्याने या सर्व प्रक्रियेत निवृत्ती वेतन अदा करण्यास उशीर झाल्याचे सांगितले जाते. परिणामी, निवृत्ती वेतन धारकांना ताटकळत रहावे लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना सात ते आठ दिवस विलंबाने हे वेतन मिळाल्याचे सांगितले जाते. तथापि, ग्रामीण भागातील अनेकांना निवृत्तीवेतन अद्यापही प्राप्त झाले नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामागे ग्रामीण भागातील बँकांना धनादेश पोहोचण्यास आणि नंतर पुन्हा तो मंजुरीसाठी येण्यास विलंब झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.