Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

छळास कंटाळून जुळ्या मुलींसह विवाहितेची आत्महत्या
प्रतिनिधी / नाशिक

 

विवाहितेने आपल्या जुळ्या मुलींसह स्वतला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव रेल्वे क्वॉर्टरमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी पतीच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार चाळीसगाव पोलिसांकडे दिली आहे. तर पतीनेही माहेरी अपमान झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.
रोहिणी किरण सोनवणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नांव असून तिने आपल्या दीक्षा व साक्षी या जुळ्या मुलींसह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्य़ाच्या चांदवड तालुक्यातील गणूर येथील रहिवासी साहेबराव भीमराव गांगुर्डे यांची मुलगी रोहिणी हिचा चाळीसगाव येथे रेल्वेत नोकरीस असलेल्या किरण सोनवणे याच्याशी विवाह झाला होता. सोनवणे दांपत्याला तीन वर्षांपूर्वी दीक्षा व साक्षी या जुळ्या मुली झाल्या. उभयतांच्या संसारात मेव्हणीच्या लग्नात पत्रिकेत नांव न टाकल्याने वाद-विवाद निर्माण झाले. पत्रिकेत नाव न टाकून आपला अपमान केला गेल्याची भावना बाळगून किरणने रोहिणीचा छळ करण्यास सुरूवात केली. बहिणीच्या लग्नालाही पत्नीला जावू दिले नाही. या कारणावरून घरात नेहमी वादावादी सुरू झाली. या छळास वैतागलेल्या रोहिणीने किरण नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर घरातच स्वतच्या व लहान मुलींच्या अंगावर घासलेट टाकून पेटवून घेतले, अशी तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. आसपासच्या नागरिकांनी तातडीने या घटनेत भाजलेल्या तिघींनाही रुग्णालयात दाखल केले. परंतु, १०० टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रोहिणीचे वडील साहेबराव गांगुर्डे यांनी तक्रार दिली आहे. पतीच्या छळास कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याची या तक्रारीत म्हटले आहे. तर किरण सोनवणे यांनीही माहेरी अपमान झाल्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.