Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

शिवाम्बु चिकित्सा मंडळाच्या अभियानाचा प्रदूषण रोखण्यास मदत
नाशिक / प्रतिनिधी

 

शिवाम्बु चिकित्सा व संशोधन मंडळाने ४४ हजार खेडय़ांमधून मूत्रदान अभियान सुरू केले असून ग्रामीण विकासाचा हा कार्यक्रम राज्याला नवी दिशा दाखविणार असल्याचा दावा मंडळाचे का. का. चव्हाण यांनी व्यक्त केला. सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेतीमध्ये हा उपक्रम प्रमुख भूमिका निभावत असून जमिनी व नद्यांचे प्रदूषण कमी करण्यास त्याची मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील निर्मल हास्य केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हे अभियान दोन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मानवी मूत्र अखंड मिळणारा ठेवा असून त्यापासून उत्तम खत व औषधांची निर्मिती करून दर्जेदार व कसदार शेती करता येते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या उपक्रमामुळे रासायनिक खते व औषधांना पर्याय उपलब्ध झाला आहे. शहरवासीयांनीही आपल्या परस बागेतील फळाफुलांसाठी मानवी मुत्राचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मानवी मूत्रात आरोग्याला घातक असे कोणतेही सूक्ष्म जिवजंतू नसतात. त्यापासून माणसाच्या आरोग्यासाठी मौल्यवान औषधे केली जातात. गोमूत्र, मेंढय़ाचे मूत्र व मानवी मूत्राचे रासायनिक घटक जवळपास सारखेच असल्याचे ते शेतीस उपयुक्त ठरणार आहे. देशात मागील वर्षी एक लाख पाच हजार कोटी रूपयांची रसायने खत निर्मितीसाठी आयात केली गेली आहे.
या रसायनापासून खते बनतील, ती जमिनीत टाकली जातील, त्यामुळे जमिनीचे प्रदूषण वाढेल. कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होईल, त्यातून वातावरणाचे तापमान वाढेल. परंतु, आपल्या देशातील ११५ कोटी लोकांचे मूत्र गोळा करून वापरले तर २३० कोटी एकर क्षेत्रासाठी एक वर्षांचे खत तयार होईल असे समीकरण चव्हाण यांनी मांडले. यामुळे रासायनिक खत व औषध वापरण्याची गरज भासणार नाही. नाशिक शहरात महापालिकेने हा उपक्रम राबविल्यास एक टँकरपासून ३३ एकर जमिनीला वर्षभराचे खत मिळू शकते. पालिकेला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल. शिवाय, पाण्याची मोठय़ा प्रमाणावर बचत होणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदर्शनकुमार घेवडे होते. शिवाम्बु मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब अहिरे, उपाध्यक्ष बाबा हुदलीकर, जी. बी. पाटील आदी यावेळी उपस्थित
होते.