Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

खरीप हंगाम : खतटंचाईवर मात करण्यासाठी खास नियोजन - थोरात
नाशिक / प्रतिनिधी

 

खतांच्या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी शासनाने जिल्हावार ‘बफर स्टॉकिंग’ पद्धती सुरू केली असून त्यामुळे खरिपाच्या हंगामात खतांचा तुटवटा भासणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. नाशिक विभागाची खरीप हंगाम आढावा व नियोजन संबंधीच्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी वित्तमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जलसंधारण व परिवहन राज्यमंत्री सतीश पाटील, कृषी खात्याचे सचिव नानासाहेब पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम देशमुख, कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी किड व रोग सव्‍‌र्हेक्षण नियंत्रण योजना राबविण्यात येत असल्याने त्याचा कपाशी व सोयाबीन उत्पादनाच्या वाढीवर निश्चितपणे चांगला परिणाम होईल, असे थोरात यांनी सांगितले. विभागातील मोठय़ा प्रमाणावरील क्षेत्र मान्सूनवर अवलंबून असल्याने शेततळ्यांचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. मूलस्थानी जलसंधारण सारख्या योजनांचा अधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त पिकांसाठी देण्यात येणारी मदत वाढवून मिळावी, असा आग्रह कृषीमंत्र्यांनी अर्थमंत्री वळसे पाटील यांच्याकडे धरला.
नाशिक विभागात २००९-१० या खरीप हंगामात तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १२ लाख ७५ हजार ८०० हेक्टर असून ११ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दीष्ट आहे. यामधून २० लाख ६२ हजार ८०० मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कडधान्यासाठी सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ६१ हजार ५०० असून तीन लाख ८४ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट आहे. यामधून दोन लाख ५८ हजार ५०० मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित आहे. तर गळीत धान्याचे सुमारे दोन लाख दोन हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून तीन लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दीष्ट आहे. त्यामधून चार लाख ६३ हजार ४०० मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित आहे. कापसाचे सुमारे पाच लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र असून सात लाख १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट आहे. यातून १६ लाख ३७ हजार ९०० मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. उसाचे सुमारे एक लाख ८ हजार १०० हेक्टर क्षेत्र असून एक लाख २६ हजार ६०० हेक्टरवर पेरणीचे उद्दीष्ट आहे. त्यातून ९४ लाख २४ हजार ५०० मेट्रीक टन उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
खरीपासाठी खते व बियाणे पुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात वाटप करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
नाशिक विभागात एकूण १९२२ सहकारी संस्था असून आठ लाख ७८० इतक्या सभासदांचे १२ लाख ९९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रासाठी २५५ कोटी रूपयांचे कर्ज मागणी अर्ज मंजूर करण्यात आले आहे. २००९-१० अंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रमासाठी जिल्ह्य़ास ३९६० हेक्टर, धुळे जिल्ह्य़ास १३६० हेक्टर, जळगाव जिल्ह्य़ास २५१० हेक्टर व नगर जिल्ह्य़ास ३०८५ हेक्टर असे एकूण १२ हजार २२५ हेक्टर लागवडीचा लक्षांक देण्यात आला आहे. या बैठकीचे प्रास्ताविक महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे यांनी केले. विभागातील खरीपाच्या नियोजनाची माहिती त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. देशमुख यांनी विद्यापीठातर्फे विकसित करण्यात आलेल्या विविध वाणांबाबत माहिती देवून पूर्णत रोगमुक्त डाळींब उत्पादन घेण्यासाठीचे विद्यापीठातील संशोधन प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील खरीपासंबंधीच्या अडचणी मांडल्या.