Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९


अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उन्हात होरपळून निघणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीटीसह पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी, वातावरणातील उष्म्यात काहीशी का होईना घट आली आहे. मंगळवारीसुद्धा आभाळात ढगांची अशी गर्दी झाल्याने नाशिकसह ठिकठिकाणी ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याचे दृश्य पाहावयास मिळत होते.

‘सुरत-नाशिक-पुणे मार्गासह रेल्वेचे सर्वच प्रश्न आपल्या रडारवर’
प्रतिनिधी / नाशिक

रेल्वेशी निगडित अनेक लहान-मोठे प्रश्न नाशिककरांना वर्षांनुवर्ष भेडसावत असले तरी दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या स्थानिक नेतेमंडळींनी आजवर त्याकडे म्हणावे तसे लक्ष्य दिलेले नाही. अलीकडील काळात शहराचा विस्तार ज्या झपाटय़ाने होत आहे त्याच प्रमाणात येथील व्याप वाढत असल्याने वाहतूक आणि दळणवळण हा विषय पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने सामान्यांसाठी जिव्हाळ्याचा ठरू लागला आहे. लोकसत्ता नाशिक वृत्तान्तच्या माध्यमातून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे.

प्रसारमाध्यमांकडून मारहाणीच्या घटनेचा निषेध
प्रतिनिधी / नाशिक

शहरात गोंधळ घालणाऱ्या प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याऐवजी पोलीस यंत्रणेने या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करून दडपशाहीचे धोरण स्वीकारल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याच्या या घटनेचा राज्य मराठी पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ व छायाचित्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नाशिकच्या औद्योगिक जीवनरेखेतील अडथळा दूर, आता पथ्य गरजेचे
नाशिकच्या औद्योगिक विश्वाची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्र अँड महिंद्र मध्ये कामगारांनी पंधरवडाभर पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले गेल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांकडून सहा लाख रूपये दंड वसूल
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील वाहतूक समस्या लक्षात घेत बेशिस्त रिक्षा चालकांविरूध्द तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर वाहन चालकांविरूध्द वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत सहा हजार २१८ रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा लाख २१ हजार ८०० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीपान कांबळे यांनी दिली. कांबळे, जयवंत कढेरे, सुरेश भाले आदींनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मोहीम राबवून संबधितांवर कारवाई केली. फ्रंटशीट प्रवासी नेणाऱ्या ७८ चालकांकडून ७८ हजार रूपये दंड सोमवारी वसूल करण्यात आला. एक जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत फ्रंट शिट विरोधात १६४७ चालकांकडून एक लाख ६४ हजार ७०० रूपये, नियमापेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीबद्दल ५२२ चालकांकडून ५२ हजार २०० रूपये, स्टॅन्ड सोडून इतरत्र रिक्षा उभी करणाऱ्या ९११ जणांकडून ९११०० रूपये, गणवेश परिधान न करणाऱ्या दोन हजार ९४९ चालकांकडून दोन लाख ९४ हजार ९०० रूपये, बॅच न लावणाऱ्या २१ जणांकडून २१०० रूपये, जादा शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या १६८ जणांकडून १६ हजार ८०० रूपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे रिक्षा चालकांना गणवेश परिधान करणे, फ्रंटशिट वाहतूक न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी न बसविणे, तसेच वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्र सतत जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी घेणार हॅम रेडिओची मदत
प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेषत: पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीच्या मुकाबल्यासाठी पालिका क्षेत्रात हॅम रेडिओची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे, तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्तीच्या मुकाबल्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त व्यंकटेश भट यांनी दिली. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. त्यानुसार शहरात ८५३ धोकादायक इमारती असून, त्यापैकी ४४ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारती २५ मेपर्यंत रिकाम्या करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सर्वच संपर्क यंत्रणा कोलमडून पडतात. अशा परिस्थितीत त्वरित संपर्क साधता यावा, यासाठी सर्व प्रभाग समित्या, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, आयुक्त आदींच्या कार्यालयात ‘हॅम’ रेडिओ यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्याद्वारे कोठेही सहज संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे जिथे मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही, तेथेही ही यंत्रणा उपयोगी ठरते.
पावसाळापूर्व तयारी म्हणून रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, संक्रमण शिबिरांची तयारी, रुग्णालयीन व्यवस्था याबाबत युद्धपातळीवर तयारी केली जात असून, आतापर्यंत केवळ आठ टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता धोकादायक इमारती खाली करा, नालेसफाईची कामे पूर्ण करा, असे आदेशही जंत्रे यांनी दिले आहेत.

मुख्य अभियंतापदी सुरेश वलेकर
नाशिक / प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सुरेश वलेकर यांनी सोमवारी सूत्रे हाती घेतली. प्रभारी मुख्य अभियंता दत्तात्रेय तेल्हारकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे मुख्य अभियंता टेहरे यांनी नागपूर ग्रामीण परिमंडल येथे बदली झाली आहे. १९८२ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून वलेकर लोणीकंद उपकेंद्रात रुजू झाले होते. त्यानंतर सहाय्यक, उपकार्यकारी, कार्यकारी, अधीक्षक अभियंता अशा पदोन्नतीनंतर मार्च २००९ मध्ये मुख्य अभियंतापदी (वितरण) म्हणून मुख्यालयात ते रुजू झाले. वलेकर यांनी महावितरणचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांचे विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अधीक्षक अभियंता म्हणून त्यांच्या कार्यकाळात पुणे ग्रामीण मंडळाला सर्वाधिक महसूल वसुलीसाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यांनी मुंबई, वसई, पिंपरी, भोसरी, भांडुप आदी ठिकाणी काम केले आहे. नाशिक परिमंडलात ग्राहकाभिमुख सेवेसह अचूक मीटर रिडींग व वीज देयक, १०० टक्के वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. वीजगळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे वलेकर यांनी सांगितले.