Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वीच टोल वसुली
खंबाटकी घाटाजवळील टोल वसुलीचा उफराटा प्रकार
सुनील कडूसकर
पुणे, १९ मे

 

सातारा रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वीच त्यासाठीची टोल वसुली सुरू करण्याचा उफराटा प्रकार खंबाटकी घाटाजवळील टोल वसुलीच्या निर्णयामुळे घडला आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येत असून त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खंबाटकीजवळील टोल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. खर्च वसुलीनंतर पुन्हा ही टोल वसुली कशासाठी असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.
खंबाटकी घाट रस्त्याला पर्यायी बोगदा तयार करण्याचे तसेच घाट रस्त्याच्या मजबुतीकरणाचे व रुंदीकरणाचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुमारे दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यासाठी ४०.७५ कोटी रुपये खर्च आला होता. या खर्चाच्या वसुलीसाठी आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) यांना ५ सप्टेंबर २००० पासून ९ वर्षे ९ महिने कालावधीसाठी टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतरही सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या किरकोळ डागडुजीचे व विकासाचे काम याच व्यावसायिकाकडून करवून घेण्यात आल्याने टोल वसुलीची ही मुदत ३ मे २००९ पर्यंत वाढविण्यात आली.
टोलवसुली संदर्भात केलेल्या सवलतीच्या (कन्सेशन) कराराची मुदत संपल्यानंतर आयआरबीने खंबाटकी घाटाजवळील टोल नाका बंद केला. त्यानंतर रस्त्याचा व तेथील टोल नाक्याचा ताबा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द केला. हाच नाका आता पुन्हा सुरू करुन तेथे पूर्वीच्याच दराने टोल वसूल करण्याचा निर्णय आता प्राधिकरणाने घेतला आहे.
कोणतेही नवे विकासकाम करण्यापूर्वीच सुरू करण्यात येत असलेल्या या टोल वसुलीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कर्नल अनिलकुमार गर्ग यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, या रस्त्याच्या दुरुस्ती, देखभाल व विकासाच्या कामासाठी टोल वसुली पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्राधिकरणाच्या मुख्यालयाने दिले आहेत. वास्तविक आयआरबीकडून टोल वसुली बंद होताच दुसऱ्या दिवसापासून प्राधिकरणाच्या वतीने ती करण्यात येणार होती. शिवापूर ते अणेवाडी या ४७ किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिकिलोमीटर ५३ पैसे इतका टोल आकारला जातो. तर, खंबाटकी घाटातील आठ किलोमीटरच्या मार्गासाठी सुमारे १ रुपया ७५ पैसे आकारले जातात. त्यामुळे आताही पूर्वीच्याच दराने टोलवसुली का, याचेही समाधानकारक उत्तर गर्ग देऊ शकले नाहीत. टोल रूपाने गोळा होणारा सर्व पैसा केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणार असल्याने नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकषानुसार दोन टोल नाक्यांमध्ये किमान पन्नास किलोमीटर अंतर असणे अपेक्षित आहे. त्यामुळे खंबाटकी घाटाजवळचा टाका नाका पुन्हा सुरू करण्याने प्राधिकरणाकडूनच या निकषाची पायमल्ली होणार नाही का, असे विचारले असता ते म्हणाले की, लवकरच हा नाका अणेवाडी येथील नाक्यात विलीन करण्यात येणार आहे. त्यामुळे या निकषाची पूर्तता होईल.

सातारा रस्ता आता सहापदरी
पुणे-सातारा रस्ता आता सहापदरी होणार असून त्यासाठीचे भूसंपादन व निविदांची पूर्वपात्रता पडताळणीही नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या वर्षांभरात रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होईल. सातारा रस्ता चौपदरी करण्याकरिता केलेल्या भूसंपादनाच्या वेळीच सहा पदरी रस्त्यासाठी आवश्यक असणारी ६० मीटर जागा संपादन करण्यात आली आहे.