Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्पच कचऱ्यात !
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

 

दहा वर्षांपूर्वी उभारलेला बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प आर्थिकदृष्टया तोटय़ाचा ठरत असल्याने पूर्वीच्या हवेली आणि सध्याच्या पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला तो बंद करावा लागला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने वा प्रशासकांनी त्याकडे लक्ष न देता डोळेझाक केल्याने हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महात्मा गांधी स्मारक निधीच्या संयुक्त विद्यमाने मार्केट यार्डाच्या गेट क्रमांक चार जवळील (गुरांच्या बाजाराशेजारी) जागेत हा मार्केट यार्डातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला होता. काही महिने हा प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पाद्वारे रोज काही किलो गॅस तयार होऊन तो पाईपद्वारे मार्केट यार्डातील हॉटेल्सला पुरविला जात होता. मात्र या गॅसला फारशी मागणी होत नव्हती. या प्रकल्पामध्ये बाजार समितीने संपूर्ण खर्च केला होता. गांधी स्मारकाच्या वतीने या प्रकल्पाचे केवळ नियोजन आणि देखरेख केली जात होती. मात्र या प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस कमी असल्याने, तो पुरवठा व्यवस्थित नसल्याने आणि
आर्थिकदृष्टय़ा त्याची निर्मिती बाजार समितीला परवडणारी नसल्याने तो अखेर बंद करावा लागला, अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली.
मार्केट यार्डाच्या आवारात रोज सुमारे तीन ते चार टन ओला कचरा निर्माण होतो. मात्र त्याचा कोणताही उपयोग न करता तो खासगी ठेकेदारांमार्फत शहराबाहेर टाकण्यात येतो. एकीकडे शासनाने प्रत्येक संस्था, व्यक्तींनी बायोगॅस निर्मिती करण्याची सूचना आता केली आहे. त्याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होऊ लागली आहे. एक तर मार्केट यार्डात आयता तीन ते चार टन ओला कचरा तयार होऊन त्याचा योग्य तो विनियोग न करता उलट शहराबाहेर विल्हेवाट लावली जात असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांनी सांगितले, की ‘‘ मार्केट यार्डात निर्माण होणाऱ्या तीन ते चार टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती चांगल्या पद्धतीने तयार करता येईल. त्यासाठी सुरुवातीला यंत्रणेत शेण टाकावे लागेल. मात्र त्यानंतर ते पुन्हा टाकण्याची गरज नसते. ओल्या कचऱ्यात ८० टक्के पाणी असते. एका टनाच्या कचऱ्यातून वीस किलो मिथेन मिळतो. मिथेन वायू हा एलपीजी गॅसच्या योग्यतेचा असतो. त्यामुळे तीन ते चार टनातून सुमारे साठ ते ऐंशी किलो गॅस निर्मिती होऊ शकेल.’’ यासंदर्भात बाजार समितीचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी संपर्क साधला असता, या बंद पडलेल्या प्रकल्पाबाबत आपल्याला माहिती नाही. तो का बंद पडला, त्याची कारणे काय, तो कसा राबविला जात होता याची माहिती घेऊन तो राबविता येईल का किंवा कसे याबाबत माहिती घेऊनच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.