Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘शिवाजीनगर’मध्ये दोन्ही पक्षांना अपेक्षित ‘यश’
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

 

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ११ हजार मतांची आघाडी देत काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यशाची भावना आहे. तर भाजपाने जेवढी पीछाडी येथे अपेक्षित धरली होती, त्यापेक्षाही थोडी कमी पीछाडी राहिल्यामुळे या मतदारसंघात ‘यश’ मिळाल्याची भावना भाजपामध्येही आहे.
विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर कोणाचे प्राबल्य आहे, याची पहिली चाचणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली आणि या चाचणीत ‘शिवाजीनगर’वर काँग्रेसची मोहोर उमटली. भाजपा-सेना युतीचा हा हक्काचा मतदारसंघ आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे गेला आहे. युतीचा कोथरूड हा बालेकिल्ला या मतदारसंघातून वगळला गेला असून बोपोडीसह काँग्रेसचे प्राबल्य असलेले अनेक भाग या मतदारसंघात नव्याने समाविष्ट झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथून कोणत्याही परिस्थितीत किमान १० हजार मतांची आघाडी मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते तर भाजपाला या मतदारसंघात सुमारे १५ हजार मतांची पीछाडी अपेक्षित होती.
या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये सरासरी ५० ते ६० टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदान ४० टक्के झाले. झालेल्या एक लाख ११ हजार ३८८ मतदानापैकी सुरेश कलमाडी यांना ४४ हजार ३३४, तर अनिल शिरोळे यांना ३३ हजार ११४ मते (कलमाडी यांचे मताधिक्य-११ हजार २२०) मिळाली. याशिवाय मनसेचे रणजित शिरोळे यांना १२ हजार २४८, डीएसकेंना १२ हजार ७०४ आणि अरुण भाटिया यांना पाच हजार ५४ मते मिळाली.
जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघातील ५५ टक्के भाग या मतदारसंघात आल्यामुळे औंध ते साप्रस, बोपोडी या पट्टय़ात तसेच खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात काँग्रेसला मताधिक्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे या भागात मताधिक्य मिळविण्यात पक्ष यशस्वी झाला, तर डेक्कन जिमखाना व परिसर, मॉडेल कॉलनी परिसर, शिवाजीनगर गावठाण ते कर्वे रस्ता या भागात भाजपाला चांगली मते मिळाल्यामुळे कलमाडींची आघाडी १० हजारांवरच रोखली गेली. अन्यथा, ती आणखी वाढली असती. सध्या तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत; पण कार्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये असलेले आमदार विनायक निम्हण, तसेच आमदार चंद्रकांत छाजेड आणि या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले दत्ता गायकवाड या तिघांनी इथे चांगली बांधणी करत युतीला मताधिक्यापासून रोखले. अनेकविध कार्यक्रमांतून त्यांनी काँग्रेसची चांगली हवा इथे निर्माण केली.
गायकवाड यांनी राष्ट्रकुल स्पर्धापासूनच इथे सुरू केलेला संपर्क कलमाडींना उपयुक्त ठरला, तसेच अनुकूल भाग जोडला गेल्यामुळे कार्यकर्त्यांनाही इथल्या लढतीसाठी उत्साह मिळाला. या सर्वाचा फायदा काँग्रेसला झाला.
भाजपाची कोणतीही संघटनात्मक रचना इथे नव्हती. माजी शहराध्यक्ष विजय काळे यांना निवडणुकीसाठी इथे पाठविण्यात आल्यानंतर मग यंत्रणा कशीबशी उभी राहिली. त्यातून जे काही साध्य झाले ते यशच म्हटले पाहिजे.

माझ्या मते..
दत्ता गायकवाड (माजी महापौर, काँग्रेस)- काँग्रेसला मानणारा मतदार आणि बोपोडीसह विविध भागांतील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते यांच्यामुळे आम्ही अपेक्षित आघाडी मिळवू शकलो. मी, आमदार चंद्रकांत छाजेड आणि विनायक निम्हण असे आमचे तिघांचे ‘टीम वर्क’ तसेच मनीष आनंद यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची साथ यामुळे अपेक्षित मताधिक्य मिळाले.
नीलेश निकम (अध्यक्ष स्थायी समिती, राष्ट्रवादी काँग्रेस)- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्राबल्य इथे सिद्ध झाले आहे. आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच आम्ही लढलो, तर १०१ टक्के विजय आमचाच आहे.
नाना मोरे (पदाधिकारी, भाजपा, शिवाजीनगर मतदारसंघ)- आघाडीला कमी पीछाडी मिळावी यासाठी सर्व ते प्रयत्न आम्ही केले आणि त्यामुळेच काँग्रेसला फक्त अकरा हजारांची आघाडी मिळाली. काही भागात आम्ही कमी पडलो, हे नक्की; पण यापुढे त्या भागातही लक्ष केंद्रीत करून कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे विधानसभेच्या वेळी चित्र वेगळे दिसेल, हे नक्की.